आणि संजुबाबा शाहरुख खानला म्हणाला, “तुला कोणी हात लावला तर मला सांग”

बॉलिवुड म्हणल्यावर हिरो, हिरोईन, ग्लॅमर, कट , ऍक्शन ,गाणी, भव्य दिव्य सेट अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. बॉलिवुडमध्ये चालत आलेले हिरो हिरोंचे वाद म्हणा किंवा हिरॉईनमध्ये असलेले कोल्ड वॉर. या सगळ्यांच्या दुसऱ्या बाजूने बघितलं तर तिथं कामात येते ती म्हणजे दोस्ती. म्हणजे इंडस्ट्रीत तुमचे मित्र कोण यावरून तुम्हाला काम काम मिळतं.

असाच आजचा किस्सा आहे एका दोस्तीचा जो बऱ्याच लोकांना आपलासा वाटेल. स्ट्रगलच्या काळात जो आपल्याला साथ देतो, मदतीचे आश्वासन देत नाही तर मदतीला धावून येतो तो खरा मित्र. आपापसांत भांडणं करून संकट ओढवून घेणारे बरेच हिरो लोकं आहेत पण काहीजण स्ट्रगलर लोकांना मदत करणारेसुद्धा असतात त्याबद्दलचा हा किस्सा.

बॉलिवुडमध्ये तीन सुपरस्टार आपल्याला आवर्जून सांगितले जातात ते म्हणजे दिलीपकुमार, बिग बी अमिताभ बच्चन आणि बादशहा शाहरुख खान. आता पहिल्या दोन दिग्गजांचा विषय सोडा आपण बोलूया शाहरुख खान बद्दल. सुरवातीला बॉलिवुड मध्ये आलेला शाहरुख खान अगदीच किडकीडा आणि जास्त काही दुनियादारी माहिती नसलेला माणूस होता. त्या काळात नुकत्याच फॉर्मला असलेल्या सलमान खान आणि अमीर खान यांनी डर हा सिनेमा निगेटिव्ह भूमिका असल्याने नाकारला आणि हा नाकारलेला सिनेमा शाहरुख खानने स्वीकारला आणि तेव्हापासून बॉलीवूडला एक खंदा आणि जबऱ्या हिरो मिळाला.

डर, करण अर्जुन, बादशहा, कोयला, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे अशा अनेक हिट चित्रपटामुळे शाहरुख खान बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला. पण नवीन नवीन सुरवातीच्या काळात शाहरूख खानचे कोणी नवीन मित्र नव्हते कारण टिव्हीतून तो थेट सिनेमाकडे आला होता आणि छोट्या पडद्यावरचे मित्र सोडले तर बॉलिवुड सारख्या मोठ्या इंडस्ट्रीत त्याचे कोणी मित्र नव्हते आणि स्ट्रगलच्या काळात तुमच्या ओळखी मजबूत असायला हव्या नाहीतर आपला गाशा गुंडाळून आवरत घ्यावा लागतं. पण शाहरुख खान मोठा चिवट होता आणि तो मुंबईत तळ ठोकून बसला.

त्याचवेळी दुसऱ्या बाजूला एक इंडस्ट्रीचा दादा माणूस होता तो म्हणजे वन अँड ओन्ली संजय दत्त. आपल्या वेगळ्याच झोनसाठी आणि आपल्या बॉडी बिल्डिंगच्या नादामुळे कोणीही तेव्हा संजय दत्तच्या नादी लागायचं नाही कारण त्याला डीवचनं कोणालाही परवडणारं नव्हतं. तो तेव्हा तिसऱ्याच राड्यात अडकलेला होता पण तो बॉलिवूडमध्ये हिट हिट सिनेमे सुद्धा देत होता. वडिलांच्या पुण्याईवर नाही तर स्वतःच्या हिमतीवर संजुबाबा काम मिळवू पाहत होता आणि तो तेव्हढ्यापुरता यशस्वीही ठरत होता. मुडवर काम असलेला संजय दत्त खलनायक सिनेमांमुळे लोकांच्या हृदयात जाऊन बसला होता.

एका शोमध्ये शाहरुख खानने संजय दत्तच्या भक्कम पाठींब्याचा किस्सा सांगितला आणि केवळ संजुबाबा होता म्हणून तो बॉलिवूडमध्ये टिकून राहिला आणि नंतरच्या काळात तो बॉलिवूडचा बादशहा झाला. तर सुरवातीला शाहरुख खान इंडस्ट्रीत आला तेव्हा त्याचे कोणी मित्र नव्हते आणि त्याला दिशा दाखवणारं असं कोणी मुंबईत नव्हतं.

आता फ्रस्ट्रेशन टोकाला पोहोचलेलं होतं, काम मिळत नव्हतं पण नकार सगळीकडून मिळत होता. त्यामुळे वाद विवाद होणं साहजिकच होतं. पण वादविवाद पण तेव्हढेच करा जितके झेपतील नाहीतर कायमचं बाद असा तो काळ होता. त्यामुळे बॉलिवुड मध्ये सगळे गोडीगुलाबीने वागत असायचे.

मुंबईत आलेला नवखा शाहरुख काम शोध होता. त्यातही त्याचं एका मोठ्या व्यक्तीशी भांडण झालं, त्यावेळी शाहरुख कोणाला ओळखत नव्हता आणि शाहरुखला ओळखणारा कोणी नव्हता. त्या व्यक्तीसोबत भांडणं झाल्यानं मोठी संधी आपल्या हातून गेली असं शाहरुखला वाटू लागलं. तेव्हा असं कोणी जवळचं नव्हतं की त्याला जाऊन हे सगळं मनातलं सांगून टाकावं. शाहरुख विचार करत होता की परत दिल्लीला आपापल्या घरी निघून जावं, पण दिल्लीला जावं तर आईबाप नव्हते त्यामुळे शाहरुख मुंबईतच राहिला.

अशा वेळी एक माणूस आपली जीप घेऊन आला आणि शाहरुखला म्हणाला तुला जर कोणी हात लावला ना तर मला सांग….! आणि ती व्यक्ती होती संजय दत्त.

त्यानंतर संजय दत्त आणि शाहरुखची दोस्ती घट्ट झाली ती अजूनही टिकून आहे. दोघांनी बरेच मॉडेलिंग इव्हेंट एकत्र केले आणि त्यांची दोस्ती बॉलिवूडमध्ये चर्चिली जाते. एक बॉलिवूडचा बादशहा आणि एक बॉलीवुडचा संजुबाबा. संजय दत्तच्या भक्कम सपोर्ट मुळे शाहरुख खान टिकून राहिला आणि दोघांची मैत्री अजूनही अबाधित आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.