मुन्नाभाईमध्ये शाहरूख होता पण एक घोळ झाला आणि फिस्कटलं…

2014 साली सिनेमा आला होता पीके. पिच्चर इतका चालला की अनेक जणांचे धंदे धोक्यात आले होत आणि मग त्यावर न्युज चॅनलवर डिबेट झडू लागल्या की धर्माचं बाजारीकरण करण्यात आलेलं आहे, असे सिनेमे देशांत बॅन करायला पाहिजे.

आमिर खान तर नुसत्या पोस्टर वरून खतरनाक ट्रोल झाला होता पण पूर्ण सिनेमा जेव्हा लोकांनी पाहिला तेव्हा कुठं आमिर खान सुखावला आणि लोकांनी त्याचं कौतुक करायला सुरवात केली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तर तुफ्फान धिंगाणा घातला होता आणि बक्कळ गल्ला जमवला होता तेही कोटींमध्ये.

जितकी लोकांनी काँट्रोव्हर्सी केली तितकीच गर्दी सिनेमाला झाली आणि सिनेमा हिट झाला.

पण या सगळ्या वाद विवाद, टीका, समीक्षा आणि कौतुकाच्या पल्याड एक माणूस साधा फॉर्मल पांढरा सदरा घालून हे सगळं रामायण बघत होता आणि चेहऱ्यावर फक्त एक भारीवाली स्माईल होती आणि ती व्यक्ती होती

राजकुमार हिरानी.

पीके या सिनेमाचे दिग्दर्शक आणि कर्ते.

बर आता राजकुमार हिरानी सिनेमे बनवतात पण जास्त प्रमोशन करण्याच्या भानगडीत पडत नाही कारण त्यांचा फंडा असा आहे की काम करताना नीट केलं की ते लोकं माऊथ पब्लिसिटी करुन हिट करतात म्हणजे करतातच.

राजकुमार हिरानी म्हणजे सिनेमा वेगळा तर असतोच पण काहीतरी क्वालिटी कंटेंट पाहायला मिळेल याची लोकांना शंभर टक्के खात्री असते म्हणून राजकुमार हिरानी यांचे सिनेमे कोटिंमध्ये धंदा करतात.

आता राजकुमार हिरानी म्हणल्यावर सगळयात आधी नाव येतं ते म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस. संजय दत्तच्या बुडणाऱ्या जहाजाला या माणसाने किनाऱ्याला लावलं होतं तो हाच सिनेमा होता. आजही मुन्नाभाई एमबीबीएस लक्षात राहतो, या सिनेमातले प्रत्येक सीन्स लक्षात राहतात याचं श्रेय जातं ते म्हणजे राजकुमार हिरानी यांना.

सर्किट आणि मुन्नाभाईची हि जोडी काय इथच थांबली नाही तर राजकुमार हिरानी यांनी बॉलिवूडला गांधीगिरी शिकवत दुसरा पार्ट आणला होता तो होता लगे रहो मुन्नाभाई.

ही सिनेमा अजरामर झाला. राजकुमार हिरानी यांना मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यात महात्मा गांधी दिसले होते आणि तेच एकदम चपखल बसले सुद्धा यामागे व्हिजन होतं ते म्हणजे राजकुमार हिरानी यांचं.

पण या दोन पार्टपैकी म्हणा किंवा मुन्नाभाई सिरीज म्हणा पण मुन्नाभाई एमबीबीएसच्या मुख्य भूमिकेत तेव्हा किंग खान शाहरुख खान होता आणि राजकुमार हिरानी स्वतः याबाबत आग्रही होते की मुन्नाभाईची भूमिका शाहरुख एकदम भारी करेल पण नेमकं तेव्हा शाहरुख दुसऱ्या एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता आणि त्याने हा सिनेमा सोडला.

यात वर्णी लागली ती संजू बाबाची. संजू बाबा तेव्हा भलत्याच राड्यात अडकलेला होता. तेव्हा राजकुमार हिरानी यांनी त्याला बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात आणलं.

राजकुमार हिरानी यांच्या प्रत्येक सिनेमावर भरभरून बोलल जातं आणि लिहिलं जातं कारण त्यांचे सिनेमे लोकांना विचार करायला भाग पाडतात. त्यात येतो थ्री इडियट्स. ह्या सिनेमाने तर परदेशातल्या लोकांनाही चकित केलं होतं. व्हायरस, रँची, चतुर, राजू अशी सगळी पात्र अवतरली होती राजकुमार हिरानी यांच्या डोक्यात. हाही सिनेमा एपिक आणि कोटींच्या घरात होता.

संजू आला संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित तोही चालला आणि रणबीर कपूर जो पिकेत एकदम एंडला दिसला होता तो थेट इथ लीडला दिसला.

मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स, पीके, संजू या सगळ्यांचे दिग्दर्शक आहेत राजकुमार हिरानी स्वतः आणि या मधला एकही सिनेमा फ्लॉप नाही.

एवढा भाव वधारलेला आहे राजकुमार हिरानी यांचा.

आता नुकताच शाहरुख खानने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यात दिसतंय की शाहरुख खान राजू हिरानी यांच्या सिनेमांच्या फ्रेम्स कडे बघतो आहे आणि कौतुक करतोय. मग राजकुमार हिरानी येतात आणि एकत्र काम करण्याचा प्रस्ताव सांगतात. आता हा व्हिडीओ पाहिला नसेल तर पाहा.

राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान ही मुन्नाभाई एमबीबीएसच्या वेळी फिस्कटलेली जोडी आता डंकी नावाचा सिनेमा घेऊन येत आहे.

आता एकीकडे राजकुमार हिरानी आहेत तर दुसरीकडे स्वतः शाहरुख खान आहे म्हणजे राडा होणारं हे नक्की आहे. काहीतरी ब्लॉकबस्टर असेल पण ते पाहायला मिळणार थेट 2023 मध्ये.

राजकुमार हिरानी यांचं सिनेमाचं बांधकामचं असं असतय की लेट पण थेट संपला विषय…..!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.