तेव्हाच्या पंतप्रधानांनी फक्त देखावा केला ; देहूत दलित मंदिर प्रवेश मोरेंनी कधीच घडवून आणला

साल होतं 1949 त्या काळात मुंबई प्रांताचे पंतप्रधान होते बाळासाहेब खेर. महात्मा गांधींच्या पश्चात गांधीवादाची काळजी वाहणारे नेते कॉंग्रेसमध्ये होते. गांधींनी सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार करत असे नेते हरिजन प्रवेश घडवून आणण्यात आग्रही असत. 

असाच एक कार्यक्रम 1949 साली आखण्यात आला.

या कार्यक्रमानुसार मुंबई प्रांताचे पंतप्रधान बाळासाहेब खेर यांच्या मार्फत हरिजन समाजाला मंदिर प्रवेश घडवून आणण्याचा हा कार्यक्रम होता. ठरल्याप्रमाणे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचा सोहळा झाला. 

तेव्हा तिथे उपस्थित असणारे देहू देवस्थानचे लोक बाळासाहेब खेर यांना सांगत होते की हे मंदिर कधीच हरिजन समाजासाठी खुले झाले आहे. पण बाळासाहेब खेर यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि कार्यक्रम पुर्ण केला. 

त्यानंतर देहूचं मंदिर दलित समाजाला खुले करण्याचं क्रेडिट गेलं ते बाळासाहेब खेर यांना.. 

पण या गोष्टीची सुरवात इथून सुरू झाली नाही तर त्याच्या एकवर्ष अगोदर गांधीहत्येच्या दिवशी सुरू झाली..

देहूच्या भूमीतले शामकांत मोरे. पक्के गांधीवादी नेते. इतके की जेव्हा गांधीहत्येची बातमी आली तेव्हा सकाळच्या नानासाहेब परूळेकरांनी त्यांना गांधीच्या अंत्ययात्रेत उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला पाठवलं होतं. 

गांधींच्या पार्थिवावर उधळण्यात आलेल्या गुलाबाच्या पाकळ्या शामकांत मोरे यांनी येताना सोबत आणल्या. या पाकळ्या एका कलशात ठेवून त्याची रथातून मिरवणूक काढली. इंद्रायणी नदीच्या डोहात त्या पाकळ्या विसर्जित करून तिथे शोकसभा घेतली.. 

शोकसभा झाल्यानंतर उपस्थित असणाऱ्या सर्वांना घेवून शामकांत मोरे विठोबा रुखमाईच्या मंदिराकडे गेले. इथे त्यांनी एका तरुणाला समोर बोलवलं आणि देवळात प्रवेश करण्यास सांगितलं. एक दलित मुलगा पहिल्यांदा मंदिरात गेला. त्याचं नाव होतं जयराम चव्हाण. 

शामकांत मोरे यांनी देहूच्या मंदिरात दलित प्रवेश करून दिला. महात्मा गांधींना देण्यात येणारी श्रद्धांजली म्हणून त्यांनी कोणत्याही रोषाचा विचार न करता हा प्रवेश घडवून आणला. 

मात्र त्यानंतर मुंबई प्रांताचे पंतप्रधान बाळासाहेब खेर यांनी दलित प्रवेशाचा घाट घातला. दलितांना मंदिरप्रवेश सुरू झालेला असूनही पुन्हा हा प्रवेशसोहळा घडवून आणण्यात आला. 

कोण होते शामकांत मोरे ? 

शामकांत मोरे हे 1957 आणि 1967 साली आमदार होते. ते समाजवादी पक्षातून आमदार झाले होते. लोकांची सेवा करणं, दलितांचे हक्क मांडण यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. जेव्हा ते आमदार होते तेव्हा फक्त आपल्या तालुक्याचे प्रश्न त्यांनी मांडले नाहीत तर लातूर, बीड अशा भागात होणाऱ्या दलित हत्यांना त्यांनी विधानसभेपर्यन्त पोहचवलं. 

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी ज्या महाराष्ट्र गाजवणाऱ्या बुलंद तोफा होत्या त्यातील एक म्हणजे शामकांत मोरे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चांदा ते बांदा सभा घेवून भाषणे दिली. पुढे जेव्हा महाजन आयोग जाहीर झाला तेव्हा या अहवालाची चिरफाड करण्याच काम देखील त्यांनीच केलं. 

१९७० साली आस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ अधिवेशनात त्यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. या अधिवेशनात त्यांनी चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची दुखे जगासमोर मांडली व त्यासाठी दवाब गट बनवण्याची सांगितली होती.. 

ही माहिती लक्ष्मण कंद यांच्या धन्य देहूगाव या पुस्तकात देण्यात आलेली आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.