अमरावतीमध्ये एक असा ‘बाप’ आहे ज्याची तब्बल १२३ मुलं अंध, अपंग किंवा मतिमंद आहेत

महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये एक असा ‘बाप’ आहे ज्याची तब्बल १२३ मुलं अंध, अपंग किंवा पुर्णंतः मतिमंद आहेत. यातील अनेक मुलं तर अशी आहेत की, ज्यांना अन्न आणि माती यातील फरक समजत नाही. काही मानसिकदृष्ट्या विकलांग, काहींना शारीरिक व्याधी आहेत तर काहींचे जीवन कायमचे अंधारमय आहे

अशा मुलांना ‘शंकरबाबा पापळकर’ या अवलिया बापाने मागील जवळपास ३० वर्षांपासून आपल्या मायेच्या पंखाखाली घेतले आहे.

विशेष म्हणजे यातील एकही मुलगा त्यांचा पोटचा नाही.

कोणी सार्वजनिक संडासच्या टाकीत, मुंबईच्या फलाटावर, अकोल्याच्या स्टेशनलगतच्या नाल्यात किंवा कचरापेटीत फेकून दिलेली अशी आहेत. काही तर चक्क मायबाप सरकारनेच स्वतःहून त्यांच्याकडे पाठविली आहेत. या अनाथ मुलांच्या संगोपनाची आणि पुनर्वसनाचे काम बाबा करत आहेत.

१९९० साली सुरु झालेल्या त्यांच्या या नंदनवनाचं नाव आहे स्व.अंबासपंत वैद्य अंध, अपंग, मतिमंद, बेवारस मुलांचा आश्रम. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-चिखलदरा रोडवर वझ्झर फाटा येथे शंकरबाबांचा हा आश्रम आहे.

बाबांनी इथल्या मुलांना आपलं स्वतःच कायदेशीर नाव दिले. विदुर शंकरबाबा पापळकर, झेबुन्निसा शंकरबाबा पापळकर, रेहमान शंकरबाबा पापळकर असेच नाव सगळी मुलं लावतात.

इस्त्रीवाला ते १२३ मुलांचा पालक व्हाया संपादक 

बाबा एके काळी धोब्याचे काम करायचे. रस्त्याच्या कडेला टेबल टाकून त्यावर लोकांच्या कपड्यांना इस्त्री करायचे. त्यांना ठिगळे लावायचा आणि ती धुवायचाही. कामातच ते कविता गुणगुणायचा. भटांची गझल, केच्यांची ओवी आणि शिरवाडकरादिकांच्या ओळीही त्यात यायच्या.

मीरपासून गालिबपर्यंतचे सगळे गझलनवाज त्याला तेव्हाही मुखोद्‌गत होते.

कविता शेर म्हणता-म्हणता ते दारिद्र्य, कष्ट आणि घाम अश्या साऱ्या अनुभवांवर ते लिहू लागले. पुढे ‘देवकीनंदन गोपाला’ या नावाचे साप्ताहिकच काढले आणि त्याचे संपादक झाले. गाडगेबाबांविषयीचा विचारांच्या आणि भक्तिभाव प्रभाव त्यांच्या नियतकालिकावर होता.

हे नियतकालिक ते अमरावतीहून प्रकाशित व्हायचे. त्यात राजकारण थोडे आणि साहित्य अधिक असायचे. त्याला खप जेमतेमच होता पण त्यात जाहिराती असायच्या. त्याही मुंबई, पुणे, नाशिक इथल्या बड्या व नामवंत कंपन्यांच्या. या मोठ्या कंपन्यांच्या ऑफिसात जाहिरात हाती येईपर्यंत ठाण मांडून बसायचे.

त्याच काळात एकदा मुंबईला गेले असताना त्यांना फलाट वर मतीमंदामधील शक्तीची ओळख झाली न् या अवलियाचा प्रवास सुरु झाला.

पुढे १९९१ च्या दरम्यान नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये मुलगी सापडली. त्यांनी तिला आश्रमात आणले. कांतीसारखी गोरीपान होती म्हणून कांती हेच नाव ठेवले. २०१५ मध्ये कांतीचे धनंजय डोळसकर या तरुणाशी अकोल्यात लग्न झाले.

मोठे केले, शिकवले आणि आयुष्याचा जोडीदार शोधून जन्मदात्याचे कर्तव्य पूर्ण केले.

शैलजा या मूकबधिर मुलीची गोष्ट अशीच. आई-वडिलांनी तिला फेकून दिले. भंडाऱ्यातील एका नालीत ती पडून होती. बाबांनी तिला आणले. कु. शैलजा शंकर पापळकर हे नाव दिले. मूकबधिर विद्यालयात ती शिकली. त्याच विद्यालयात शैलजा नोकरीला आहे. तिला पहिला पगार मिळाला तेव्हा त्यांनी तिच्या अभिनंदनासाठी एक खास कौतुक सोहळा आयोजित केला होता. तिचे लग्नही लावून दिले.

बालीचे नावाच्या मुलीचे ११ वर्षांपूर्वी लग्न झाले. तिच्या साखरपुड्याच्या दिवशी शंकरबाबांची पत्नी पंचफुलाबार्इंचे निधन झाले. आपली पत्नी आता या जगात नाही, ही दु:खद वार्ता त्यांना सकाळीच समजली होती. पण ती सर्वांपासून लपवून ठेवली. मुलीला आयुष्याचा साथीदार मिळवून दिल्याच्या इतरांच्या आनंदावर त्यांना विरजन टाकायचे नव्हते बहूदा.

पण हे दु:ख घेऊन हा माणूस सर्वांसोबत अगदी सहज वावरत होता.

सार जग नाव, गाव, जात, धर्म यात अडकून पडलं असताना शंकरबाबा मात्र यापैकी काहीच ठाऊक नसलेल्या या मुलांच्या आयुष्यात आनंद घेऊन येण्यासाठी धडपडत असतात. म्हणूनच कचरापेटीत सापडलेल्या ज्योतीला एक दिवस कलेक्टर बनविण्याचे स्वप्न ते पाहत आहेत. ‘रोजी’ या ख्रिश्चन मुलीला शंकलबाबा जसा आपला बाप वाटतो, त्याच वेळी ते ‘रामचंद्र आणि रहेमानला जीव लावतात.

बाबा केवळ या मुलांच्या संगोपनासाठीच झटत असतात असं नाही तर त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचेही सांगतात. त्यासाठीच ‘१८ वर्षांवरील अनाथ मतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी भारत सरकारने कायदा करावा’ ही त्यांची स्वच्छ आणि स्पष्ट मागणी आहे. यासाठी ते मागील २ तपापासून संघर्ष करत आहेत.

वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा मुलांना अनाथाश्रमात ठेवता येत नाही.

देशात दरवर्षी अशी एक लाख मुले अनाथ आश्रमाबाहेर पडतात. ती मग कुठे जातात? ईश्वराच्या चुकीची आणि समाजाच्या दुर्लक्षाची शिक्षा अकारण नशिबी आलेल्या या मुलांचा व विशेषतः मुलींचा वापर बाहेरची माणसे कसा करतील? आपण गेल्यानंतर या मुलांचे कसे होईल, अशा प्रश्नांनी ते व्याकुळ होतात. त्यामुळे शंकरबाबांचा संताप सहाजिक आहे.

एकदा एका धनवंताने त्यांना थेट अकरा लाखांचा चेक मदत म्हणून पाठवला होता. शंकर बाबांनी तो उलट टपाली परत केला. बाबांना त्या कृतीविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले,

‘हे श्रीमंत लोक स्वतःला समजतात काय? माझी मुले रस्त्यावर पडली आहेत काय? भीक दिल्यासारखे पैसे पाठवले त्याने. अरे, जरा  या, पाहा आणि त्यांना जवळ करा. एवढीच माझी माफक अपेक्षा. तसं नसेल जमत तर मला तुमची मदत ही नको, मी कष्ट करीन आणि त्यांना सांभाळीन”

न्यायालय आणि सरकार यांनी ही आज पर्यंत बाबांना मदत केली आहे.

२०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई व रोहित देव यांनी न्यायालयीन अवमानतेच्या एका प्रकरणातील दंडाचे चार लाख रुपये या बालगृहाला देऊन सामाजिक दायित्व जपले होते. तसेच या आश्रमाची कार्याची दखलही न्यायालय घेत असते असे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.

बाबांनी आज पर्यंत जवळपास ३० जणांची लग्न लावून देत पुर्नवसनाचे सर्वोत्तम उदाहरण जगासमोर मांडलं आहे. जानेवारी २०२० मधील एका लग्नावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यातील वधूच्या कन्यादानाची जबाबदारी घेतली होती.

मुलांच्या मदतीने फुलवले जंगल…

या अवलिया बापाने याच मुलांच्या मदतीने आश्रमाच्या आसपासच्या २५ एकरांमधल्या उजाड माळरानावर जवळपास १५ हजार झाडांचे जंगल तयार केले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून हा बाबा व त्याची ‘ग्रीनआर्मी’ कमालीची व्यस्त होतो. रोज पहाटे हे शेकडो हात नवनव्या प्रजातींची नवनवीन झाडे लावण्यासाठी झटत असतात. गेल्या दहा-बारा वर्षापासून प्रत्येक पावसाळ्यात बाबांनी स्वत: रोपटी विकत आणून लावली आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.