गांधींचा कॉम्रेड व टाटांचा भाच्चा ब्रिटनचा पहिला कम्युनिस्ट खासदार होता

कम्युनिस्टांना भारतीयांसाठी तिरस्करणीय म्हणून निकालात काढणाऱ्या गांधीजींना ‘डियर कॉम्रेड’ म्हणून हाक मारायची ताकद एकाच माणसात होती आणि तो म्हणजे,

 शापूरझी साकलतवाला

जगात सगळ्यात जास्त तुडवलं-बडवलं जाणारं ढोलकं म्हणजे भारतातली कम्युनिस्ट मंडळी. राजकीय चर्चेला बसलंय आणि त्यात ह्यांना चार शिव्या पडल्या नाहीत असं कधीच होत नाही. पारापासून ते दिल्लीपर्यंत, फेसबुकपासून ते पाठयपुस्तकापर्यंत, ब्राह्मणांपासून ते दलितांपर्यंत आणि मनमोहन सिंगांपासून ते मोदींपर्यंत सगळ्यांचं एका बाबतीत एकमतय की ही माणसं म्हणजे सगळ्यात नालायक जात !

“ह्यांना कळत तर काय नाय, कुठं लांबच्या देशात मॉस्को-क्युबाला पाऊस पडायला लागला की ही भारतात छत्र्या उघडून बस्त्यात. ह्यांना इथल्या वास्तविक जातीधर्माची रियॅलिटी माहीतच नाय”

असं सगळं आपण दर चौकात ऐकलंय.

पण ह्या भारतीय कम्युनिस्ट माणसानं भारताला पचवून ब्रिटनला पहिल्यांदा साम्यवादाला सिरियसली घ्यायला लावलं होतं.

आणि गांधीजींच्या होकाराने हा माणूस तिकडं निवडून गेला होता.

१९२७ साली भारताच्या राजकारणात सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू असे नवीन नेतृत्व पुढं येत असताना तयार झालेल्या फळीतला युवा नेता म्हणजे शापूरझी साकलतवाला.

ह्या तिघांची गांधीजींच्या तत्त्वज्ञानाकडे बघायची युनिक दृष्टी होती. तिघेही गांधीजींना मानायचे. भारतीय जनतेला कुठल्याही दिशेला घेऊन जायची ताकद गांधीजींच्या हातात होती हे तिघांना नीट कळायचं. त्याच्यामुळं ह्यांच्यातील प्रत्येक माणूस गांधीजींना आपापल्या बाजूला वढायला बघायचा.

गांधीजी जितके ज्याच्याकडं ओढले जायचे, तेवढं त्या माणसाचं वजन देशात-राजकारणात आणि काँग्रेसमध्ये वाढून जायचं. म्हणून सगळेजण गांधीजींना खिशात घालाय बघायचे. पण पुढं जात जात गांधीजी जगात जेवढ्या विचारधारांपर्यंत भारतीय  पोचले होते त्या अख्ख्या विचारांच्या माणसांना खिशात घालून पुढं निघायचे. बऱ्याच लोकांना हे पार पोचल्यावर कळून यायचं.

शापूरझी साकलतवाला यांनीही त्यांना असंच गुंडाळायचा प्रयत्न केला. आपल्या पत्रात त्यांनी गांधीजींशी दीर्घ बोलणी केली होती.

आपल्या पत्रात ते गांधीजींना किती सोप्यात म्हणतात बघा, 

“आपण दोघेपण एवढी चलबिचल करणारी माणसय की बोलताना संज्ञा आणि पुस्तकी भाषा वापरण्यापेक्षा सरळसोट दोन शिव्या देऊ. आणि तरीपण आपल्यातलं कुणीच वाईट वाटून घेणार नाय ह्याची मला खात्रीय!” 

शापूरझी साकलतवाला यांचा जन्म १८७४ साली मुंबईत एका गर्भश्रीमंत पारशी कुटुंबात झाला. त्यांचे फादर दोराबजी साकलतवाला त्याकाळचे मोठ्ठे व्यापारी होते. जमशेदजी टाटा ह्यांनी आपली बहीण जेरबाई दोराबजी साकलतवाला यांना दिली होती. म्हणजे हे कुटुंब त्याकाळी देशातलं सगळ्यात जास्त मनीपॉवर असणारं कुटुंब होतं.

त्यांनी टाटांच्या पोलाद कारखान्यासाठी ओडिशा आणि बिहारमध्ये काम केलं होतं तेव्हा गरीब मजुरांच्या दुःखाशी त्याचा थेट संबंध आला. पुढं ते मलेरियामुळं एवढे आजारी पडले की त्यांना दवाखान्याला इंग्लंडला हलवण्यात आलं. (मुंबईत दवाखान्यात ऍडमिट असताना ते थोडं बरं वाटलं की प्लेगच्या रुग्णांची सेवा करायचे.) बिघडत्या तब्येतीमुळं त्यांना कायमचं इंग्लंडमध्येच राहावं लागलं.

तिकडं त्यांनी टाटांचं मँचेस्टरमधलं हापिस चालवायला घेतलं आणि ब्यारीष्टरकी शिकल्यामुळं तिथल्या फेमस लिंकन इन बारमध्ये वकिली चालू केली.

ही गोष्ट झाली १९०५ ची.

आता कारण आजारपणाचं दिलं तरी गोची अशी होती की हा माणूस मजुरांसोबत राहून इतका कट्टर झाला होता की ब्रिटिश सरकारवर सडकून टीका करायला मागंपुढं पाहत नव्हता. पण त्यांच्या मामाला, जमशेदजी टाटांना आपला व्यापारपाणी जपायला ब्रिटिशांची मर्जी राखायची गरज होती. म्हणून त्यांना कायमचं तिकडच पाठवून दिल्याचं बोललं जातं.

ह्या माणसाला मजुरांबद्दल एवढी आपुलकी होती की त्याने लगीनही डेरीबीशायर गावातल्या हॉटेलात काम करणाऱ्या ‘सारा मार्श’ ह्या साध्या वेटरेससोबत केलं.

१९०७ साली हे करणं म्हणजे पारशी धर्मानुसार गुन्हा होता, पण साकलतवाला अशा कोणत्याच गोष्टी अध्येमध्ये येऊन देत नसत.

१९०९ सालीच त्यांनी तिथल्या ‘स्वतंत्र कामगार पक्षात’ भाग घेतला आणि कामगारांसाठी काम करायला सुरुवात केली. १९१७ साली जेव्हा रशियात कामगार आणि शेतकऱ्यांनी आपलं सरकार बनवलं तेव्हा युरोपभर तरुण पोरांच्या अंगात नवीन वारं शिरलं आणि त्यांनी आपल्या आपल्या परीनं कम्युनिस्ट पक्षाला मदत करायला सुरुवात केली. 

रशियातल्या लोकांची खासियत ही कि ते काहीच स्वतःपुरतं ठेवत नाहीत. आख्खाच्या अक्खा शेक्सपियर ते आपल्या गावचा असल्यागत सेलिब्रेट करतात. अण्णाभाऊ साठेंचा पवाडा गातात. कामधाम नसताना मराठीसकट जगातल्या भाषांमध्ये लहानमोठ्यांसाठी पुस्तकं छापून स्वस्तात वाटतात.

त्याच्यामुळं १९१९ साली त्यांनी “जगातल्या सगळ्या पैशावाल्या सरकारांना उलथून सरकार ही कल्पनाच नष्ट करायची आणि कामगार-शेतकऱ्यांचं राज्य आणायसाठी काम करायचं” ठरवलं; आणि ह्या कामात त्यांना सोबत होती शापूरझी साकलतवाला यांची.

आपल्या स्वतंत्र कामगार पक्षाला समाजवादीहून थेट कम्युनिस्ट बनवायचा त्यांचा प्रयत्न होता. (हिथच ही लाल माणसं चुकत्यात, ह्यांच्यात ‘कोण किती लाल’ ह्यातच कायम वाद आणि आपल्यासारख्या साध्या माणसांना नक्की काय चाललंय तेच कळत नाही.) पक्षासोबत त्यांचे वाद झाले आणि त्यांनी आपल्या टॉपच्या माणसांसोबत बाहेर पडून थेट नव्या “ग्रेट ब्रिटन कम्युनिस्ट पक्षात” प्रवेश केला.

हे घडलं १९२१ साली.

१९२७ साली त्यांच्यात आणि गांधीजींमध्ये झालेली चर्चा “भारत वेगळाय का?” नावानं प्रसिद्ध झालीय. त्याच्यात शापूरझी साकलतवाला गांधीजींना ‘इंग्रजांच्या कॉमनवेल्थ आणि स्वराज्याचा नाद सोडून आपण सेपरेट स्वतःला देश म्हणून स्वतंत्र करण्याकडं लक्ष दिलं पाहिजे’ अशी विनवणी करताना दिसतात. गांधीजी त्यांना सुरवातीला अजिबात बधले नाहीत पण काही वर्षांनी त्यांनी हीच मागणी पुढं करून आंदोलन उभारलं.

पक्ष बदलूनपण त्यांनी सगळ्या जुन्या माणसांची चांगले संबध ठेवले आणि बॅटरसी मतदारसंघात १९२२ च्या निवडणुकीत उभे राहिले.

एकटा हुजूर पक्ष सोडून बाकीच्या सगळ्या पक्षांनी शापूरझी साकलतवाला ह्यांना पाठिंबा दिला आणि ते इंग्लंडमध्ये निवडून येणारे पहिले कम्युनिस्ट नेते बनले.

त्यांच्या ह्या विजयाने इंग्रज माणसांच्या उरात धडकी भरवली होती कारण १९ हजार मतदारांच्या मतदारसंघात ते 11,311 मतं घेऊन निवडून आले होते.

स्वतःच्या प्रचारासोबत त्यांनी इतर मतदारसंघातसुद्धा आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि ह्या नवख्या पक्षाचे ४ खासदार (शापूरझी साकलतवाला धरून) निवडून आले.

१९२२ ला आलेलं सरकार १९२३ साली लगेच पडलं आणि पुन्हा नव्यानं निवडणूक घ्यावी लागली. ह्या वेळी मात्र कम्युनिस्ट पक्षाचे सगळे खासदार पडले. देशभर उजव्या विचारांची माणसं निवडून आली.

फक्त एकच टँकी माणूस (ब्रिटिश कम्युनिस्ट) परत निवडून आला आणि तो म्हणजे शापूरझी साकलतवाला!

हे सरकारही १९२४ साली लगेच पडलं आणि पुन्हा नव्यानं निवडणूक घ्यावी लागली. ह्या वेळी कोणत्याच डाव्या संघटनेनं टँकी कम्युनिस्ट माणसांना सपोर्ट केला नाही आणि त्यांना एकट्याच्या बळावर लढावं लागलं. ८ जणांना उभं करायची ताकद पक्षाकडं होती पण ह्याही वेळी कम्युनिस्ट पक्षाचे सगळे खासदार पडले.

फक्त एकच माणूस परत निवडून आला आणि तो म्हणजे शापूरझी साकलतवाला..!

आपल्या मतदारसंघात त्यांनी काय जादू केली असल हे ह्याच्यावरून आपोआप कळतं.

निवडून आल्यावर त्यांनी कामगारांचं हित आणि भारताचं स्वातंत्र्य ह्या दोनच गोष्टी पूर्ण ताकदीनं फोकस करून सरकारला झिणझिण्या आणल्या. ब्रिटिश सरकार त्यांना एवढं टरकायचं की १९२५ साली अमेरिकेला जाण्यासाठीही शापूरझी साकलतवाला याना व्हिजा नाकारण्यात आला होता. १९२६ साली त्यांनी केलेल्या भाषणामुळं त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला आणि त्यांना २ महिने अटक करण्यात आली.

१९३५ पर्यंत त्यांनी दर निवडणुकीत पक्षासाठी प्रचार केला. जगभरात फिरून कामगारांसाठी काम करण्याची त्यांची उमेद मोठी होती. तेव्हाच्या सोव्हिएत रशियात कम्युनिस्ट सरकार असूनही त्यांच्या चुकांवर ते तडाखे देत. दुसरा कुणी जाणार नाही अशा दुर्गम भागात दौरे करत आणि सामान्य लोकांशी आपुलकीने संवाद साधत. “गांधीजींची ‘स्पृश्यता’ ही देशातल्या ‘अस्पृश्यते’पेक्षाही निंदनीय आहे” इथपर्यंत त्यांची मते होती. गांधीजींच्या खादी चळवळीवरही त्यांनी टीका केली होती, तरीही गांधीजी त्यांना आपला जवळचा मित्र मानत. 

गांधीजींना आपल्या बाजूला आणण्यासाठी त्यांनी अफाट प्रयत्न केले. त्यांच्यातली जुगलबंदी बघण्यासारखी आहे – एका पत्रात शापूरझी साकलतवाला त्यांना म्हणतात,

” डियर कॉम्रेड गांधी,

यकदिवस तुम्ही झोपेतून उठासाल आणि कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फोकस करून माझ्या गोष्टींना “हो” म्हणाल अशी मला आशा वाटते. ह्यांच्यातच देशाचं आणि तुमच्या दारिद्रनारायणाचं कल्याण आहे हे कधीतरी तुम्हाला कळेलच.”

गांधीजींनी ह्याच्या उत्तरात बॉम्बे डेली मेल पेपरात डायरेक्ट लेख लिहिला, आणि म्हणले

“कॉम्रेड साकलतवाला हे प्रामाणिक माणूस आहेत. त्यांची तळमळ, त्याग आणि गरिबांसाठी दिलेला लढा ह्यावर कुणीच सवाल करू शकत नाही. माझीही त्यांच्या कम्युनिस्ट मागणीला ‘हो’ म्हणूशी वाटतं, पण मला ‘नाय’ म्हणणं भागय कारण मला माझ्या धर्म आणि प्रामाणिक बुद्धीनुसार ते गरजेचं वाटतं.”

ते जेव्हा जेव्हा संसदेत असत तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना फोडून काढत. “त्यांचे भाषण असले की संसदेत सत्ताधारी बाकडी रिकामी होतात” असं त्यांच्यासोबत काम केलेले खासदार रेनी स्मिथ ह्यांनी लिहून ठेवलं आहे.

भारतासाठी तिथं आवाज उठवणारा हा बाजिंदा माणूस भारताचं स्वातंत्र्य पाहू शकला नाही. १९३६ साली त्यांचं निधन झालं. “स्वातंत्र्यासाठी लढणारा शूर आणि निर्भय सैनिक” म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना श्रद्धांजली दिली. ब्रिटननेही त्यांच्या नावाने सैन्यात ‘साकलतवाला बटालियन’ उभारली होती.

आणि गांधीजींनीही आपल्या मृत्यूच्या काही दिवस आधी हरिजनमध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे – “मीही स्वतःला कम्युनिस्ट म्हणवून घेतो. पण माझा साम्यवाद हा समाजवादापेक्षा फार वेगळा नाही. ते या दोघांचं सुरेख मिश्रण आहे.”

I call myself a communist also… My communism is not very different from socialism. It is a harmonious blending of the two. Communism as I have understood is a natural corollary of socialism.

शेवटच्या टप्प्यावर असतानाही ते एका सुखी समाजाचं चित्र बघत आले. “मी आयुष्यातल्या दर वाटेवर जगातली सरकारं, कायदे, संसदा यांना माणुसकीला चिरडत, मोठ्यांना आणि श्रीमंतांना पाठीशी घालत माझ्या देशाच्या गरीब स्त्री-पुरुषांना गुलाम करून ओरबाडताना, शोषितांना धमकावताना आणि वंचितांचे हक्क लुबाडताना बघत आलुय.”

“एकदिवस कम्युनिझम हे सगळं बदलेल आंणि जग अजून सुंदर होईल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ब्रिटनच्या मार्क्स-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या ऑफिसच्या सभागृहाचं नाव “साकलतवाला हॉल” असं ठेवलं आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लालभाई अजूनही ह्याच सभागृहात चर्चा-बैठका करत असतात.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Madhavi Tambare says

    अप्रतिम लेख! गिरीश कर्नाड यांचे पुत्र आणि पत्रकार रघु कर्नाड यांच्या वर एक लेख लिहावा ही विनंती.

    इतकी दुर्मिल माहिती दिल्या बद्दल ख़ूप बा आभार

    शैली अगदी भन्नाट!

    Keep it up!

Leave A Reply

Your email address will not be published.