जयललितांची मैत्रीण जेलमधून बाहेर आलेय, आत्ता तामिळनाडूचा पुढचा पिक्चर कसा असणार..?

मार्च १९९९. दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये जनता पक्षाचे तत्कालीन नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी एका टी-पार्टीचे आयोजन केलं होतं. त्या पार्टीत सोनिया गांधी यांच्या सोबत विरोधी पक्षातील इतर नेते व खुद्द जयललिता देखील उपस्थित होत्या.

याच टी- पार्टी नंतर जयललिता यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार कोसळलं.

बहुजन समाज पक्षाचे नेते काशीराम केंद्रातील हे सरकार वाचवण्यासाठी मदत करतील अशी शक्यता वाटत होती. पण त्यांच्या बहुजन समाज पक्षाने अचानक भूमिका बदलली. मायावती आणि बसपाच्या इतर खासदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केलं आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना १ मत कमी पडल्याने राजीनामा द्यायला लागला.

इथे काशीराम यांनी बदलेली भूमिका बघून संपूर्ण देशाला धक्का बसला होता.

हि भूमिका बदलण्यामागे एक चेहरा होता तो म्हणजे जयललिता यांच्या अत्यंत जवळच्या मैत्रीण शशिकला नटराजन यांचा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या एका कार्यक्रमात कांशीराम आणि सुब्रम्हण्यम स्वामी हे दोघे एकत्र उपस्थित होते. या दोघांची एकत्र भेट घडवण्यासाठी कारणीभूत होते नटराजन, हे नटराजन म्हणजे शशिकला यांचे पती. नटराजन आणि काशीराम यांची त्याकाळी एका ट्रस्टच्या बैठकीत सतत भेट होतं असायची. गाझियाबादच्या संतोष मेडिकल कॉलेजला एक ट्रस्ट चालवत होता. याच ट्रस्टमध्ये हे दोघेही ट्रस्टी होते.

याच शशिकला कनेक्शनचा उपयोग करतं सुब्रम्हण्यम स्वामींनी कांशीराम यांना सरकारसाठीची भूमिका बदलण्यासाठी तयार केलं होतं.

शशिकला फक्त जयललितांच्या मैत्रिण नव्हत्या, तर आपल्या मैत्रिणीला विश्वासात घेवून केंद्रातली सत्ता पाडण्याची ताकद ठेवणाऱ्या एक नेत्या देखील होत्या.

शशीकला आणि जयललितांची ओळख कशी झाली होती…? 

शशिकला तमिळनाडूच्या मन्नारगुडी भागात ८० च्या दशकात एक व्हिडीओ पार्लर चालवायच्या. त्यांचे पती नटराजन कडलोरच्या जिल्हाधिकारी वी.एस. चंद्रलेखा यांच्या ऑफिसमध्ये काम करत होते. हेच चंद्रलेखा तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन (MGR) यांचे निकटवर्तीय देखील होते. साहजिकच कलेक्टर चंद्रलेखा यांच मुख्यमंत्री MGR यांच्याकडे सातत्याने येण-जाणं असायचं.

तर दूसरीकडे एमजीआर यांच्या निकटवर्तीय होत्या जयललिता. त्यांच देखील MGR यांच्या ऑफिसमध्ये येणं जाणं असायचं. कलेक्टर चंद्रलेखा आणि जयललिता यांच्यातला कॉमन दुवा होते ते MGR.

दूसरीकडे कलेक्टर चंद्रलेखा यांचे सहाय्यक नटराजन देखील अशा मिटींगमध्ये मदतीला यायचे. हेच नटराजन अनेकदा आपली पत्नी शशिकलाला सोबत घेवून यायचे.

शशिकला यांना व्हिडिओग्राफीचा छंद होता. बड्या-बड्या लोकांचे व्हिडीओ बनवणं त्यांना आवडत होतं. MGR यांच्या ऑफिसमध्ये जयललिता येत व कलेक्टर चंद्रलेखांच्या मदतीसाठी नटराजन व त्यांच्यासोबत शशीकला येत. इथेच जयललिता आणि शशिकला यांची ओळख झाली. ओळखीची मैत्री झाली..

इथंच या दोघींची चांगली ओळख झाली आणि पुढे घट्ट मैत्री.

१९८७ मध्ये एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांचं पक्षातील महत्व कमी झालं. इतकं कि त्यांना एमजीआर यांच्या अंत्ययात्रेत देखील सहभागी होऊ नये म्हणून सांगण्यात आलं होतं. पण त्यानंतर देखील जयललिता अंत्ययात्रेत आल्याने त्यादिवशी तिथं त्यांना जखमी होईपर्यंत मारलं होतं.

तो एमजीआर यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांचा काळ होता. पक्षात त्यांचा शब्द अंतिम होता.

अशावेळी जयललिता एकट्या पडल्या होत्या. पण याच एकटेपणात त्यांना साथ दिली ती शशिकला यांनी. दोघींच्या संबंधात एवढा घरोबा तयार झाला की, जयललितांनी शशिकला यांचा पुतण्या सुधाकरन याला दत्तक घेतलं.

कालांतराने जानकी रामचंद्रन यांनी तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार करून एक पाऊलं मागे घेत जयललिता यांचं नेतृत्व मान्य केलं. जयललितांचा काळ सुरू झाला. १९९१ च्या राज्याच्या विधानसभा निवडणूक जिंकत त्या सत्तेत आल्या. काँग्रेसच्या मदतीने जयललिता मुख्यमंत्री देखील झाल्या.

इथूनच शशिकला यांचे दिवस बदलले. जयललिता यांना अम्मा तर शशिकला यांना चिनम्मा म्हणजे मावशी म्हंटल जावू लागलं.

अचानकच शशिकला यांना कार्यकारी मुख्यमंत्री मानलं जावू लागलं. त्या ऑफिसर्सना ऑर्डर देवू लागल्या. मंत्रिमंडळातील मंत्री आणि सीनियर अधिकारी त्यांना सॅल्यूट करू लागले होते.

अपवाद होता IAS अधिकारी चंद्रलेखा यांचा. पण काही दिवसातच त्यांच्यावर ऍसिड हल्ला झाला. हा हल्ला एआयडीएमकेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप झाला पण हा आरोपच राहिला. पुढे चंद्रलेखा यांनी राजीनामा देत सुब्रम्हण्यम स्वामींच्या जनता पक्षात प्रवेश केला.

शशिकला यांचं हा बदलेल रुबाब बघून सुब्रम्हण्यम स्वामी त्यांना ‘मन्नारगुडी का माफिया’ म्हणत.

पण याच दरम्यानच्या काळात जयललिता आणि शशिकला यांचे ग्रहमान फिरले. १९९५ मध्ये सुधाकरन यांच्या लग्नात केलेला खर्च बघून दोघींवर भ्रष्टचाराचे आरोप होऊ लागले. याच आरोपांमुळे १९९६ सालच्या निवडणुकीत जयललितांचा पराभव झाला.

यानंतर चौकशीच्या नोटीस, कोर्ट कचेरीच्या फेऱ्या चालू झाल्या.

१९९८ च्या नंतर जयललिता यांनी भाजपच्या साथीनं जात केंद्राच्या राजकारणात पाय ठेवला.

२००१ साली जयललिता पुन्हा तामिळनाडूच्या सत्तेत परतल्या. शशिकला यांना पुन्हा जुना रुबाब मिळाला. २००६ मध्ये पुन्हा पराभव झाला. २०११ ला पुन्हा सत्तेत परतल्या. सत्तेची ही संगीत खुर्ची चालू असतानाच जयललिता-शशिकला यांच्या दरम्यानचे संबंध बिघडायला सुरुवात झाली.

त्याच कारण ठरलं अफवा.

शशिकला या पक्ष आपल्या ताब्यात घेत आहेत, सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याच कारण त्यावेळी शशिकला यांच्या कुटुंबातील एकूण १४ जण तामिळनाडूच्या राजकारणात होते. तर पक्षाची प्रतिमा शशिकला यांच्या भ्रष्ट पद्धतीने खराब होत आहे. असे देखील बोलले जावू लागले.

तिकडे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील जयललिता यांना सावध केलं की, शशिकला यांच्या मुळे व्यापारी तामिळनाडू सोडत आहेत. आणि हा शुभ संकेत नाही.

असं म्हणतात १ खोटं १०० वेळा सांगितलं कि खार वाटू लागतं. जयललिता यांनी या अफवांची दखल घेत शशिकला यांना पक्षातून आणि घरातून बाहेरचा रस्ता दाखवला. सुधाकरनला दिलेला दत्तक मुलाचा दर्जा देखील काढून घेतला.

पुढे राजकीय उलथापालथींमुळे पंख छाटून शशिकला यांना पुन्हा पक्षात घेतलं गेलं. पण काचेला तडा गेला होता. या घरवापसीची दोन कारण सांगितली जातात.

एक तर जयललिता यांची बिघडलेली तब्येत. त्यामुळे त्यांना आधाराची गरज होती. दुसरी म्हणजे तामिळनाडूमधील जातीय समीकरण. शशिकला या थेवर जातींमधून येत होत्या. त्यांची मोठी व्होट बँक होती.

२०१६ साली जयललितांचा पक्ष पुन्हा सत्तेत आला.

पण त्यांची तब्येत आता साथ देत नव्हती. त्यामुळे शशिकला यांना पुन्हा जुना दर्जा मिळाला. पण आरोप देखील तेवढेच होऊ लागले होते. यात मग भ्रष्टाचारापासून ते अगदी जयललितांना विष देण्यापर्यतचे आरोप झाले. पण जयललिता या गोष्टीकडे लक्ष देत नव्हत्या, कारण त्यांना त्यांची तब्येत असह्य झाली होती.

दुसऱ्या बाजूला जयललिता यांची भाची दीपा जयकुमार आणि शशिकला यांचा आणखी एक पुतण्या टीटीवी दिनाकरन यांच्या राजकीय महत्वकांक्षा वाढीस लागल्या,

याच दरम्यान ५ डिसेंबर २०१६ साली जयललिता यांचं निधन झालं. तिथं अंत्यसंस्कार करताना पुन्हा एकदा कौटुंबिक वाद उफाळून आला. पण सगळे विधी शशिकला यांनीच पार पाडले

यानंतर सुरु झाली मुख्यमंत्री पदासाठीची रस्सीखेच. 

जयललिता यांच्या निधनानंतर ओ. पनीरसेल्वम यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनवलं गेलं. या आधी देखील त्यांनी एकदा हंगामी मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. पण शशिकला यांना पनीरसेल्वम मुख्यमंत्री पदी खटकत होते.

असं सांगितलं जात कि त्यांचे पती नटराजन यांना या पदावर बसवायचं होतं. त्यासाठी त्यांनी पक्षात फिल्डिंग लावायला सुरुवात केली. आमदारांना आपल्या बाजूने वळवलं. जयललिता यांच्या जागी स्वतःला पक्षाचे महासचिव म्हणून निवडून आणलं.

यानंतर पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्री पद सोडण्याचे आदेश दिले गेले.

त्याच दरम्यान बेहिशेबी मालमत्तेचं जुन प्रकरण समोर आलं. न्यायालयाने त्यांना ६६ कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीच्या आरोपात दोषी घोषित केलं. ४ वर्षाची शिक्षा देखील सुनावली आणि सगळं दृश्यच बदललं.

कारण त्यांना ४ वर्ष तुरुंगात घालवावी लागणार होती आणि सुटून आल्यानंतर ६ वर्षापर्यंत कोणतीही निवडणूक लढवु शकणार नव्हत्या.

पण यानंतर देखील पक्षाचा आदेश मानत पनीरसेल्वम यांनी राजीनामा दिला. तेव्हा शशिकला यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या गटाचे वरिष्ठ नेते ई. पलानीसामी यांना खुर्चीवर बसवलं.

पण यानंतर शशिकला जेलमध्ये जाताच पलानीसामी आणि पनीरसेल्वम यांच्यात मैत्री जमली. त्याचा परिणाम असा झाला की, शशिकला आणि त्यांचा पुतण्या टीटीवी दिनाकरन यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं.

यानंतर दिनाकरन यांनी अम्मा मक्कल मुनेत्र कडगम (AMMK) नावानं स्वतःचा पक्ष बनवला.

याच शशिकला आता ४ वर्षांची शिक्षा भोगून तामिळनाडूच्या राजकारणात परतल्या आहेत. आणि योगायोगाने यावर्षीच इथं निवडणूका होणार आहेत. त्यामुळे हे स्पष्ट असणार आहे की, त्यांची राजकीय इच्छाशक्ती पुन्हा जागी होणार. हे सांगायला कोणत्याही राजकीय तज्ज्ञांची गरज लागणार नाही.

पण नियमानुसार आता त्या पुढील ६ वर्ष कोणतीही निवडणूक लढवू शकत नाही. किंवा सार्वजनिक पदावर बसू शकत नाहीत.

त्यामुळे अशा परिस्थितीत आता शशिकला यांच्या पुढे कोणते पर्याय असतील असा प्रश्न पडणं साहजिक ?

पहिला पर्याय :

एआयडीएमके मध्ये पुन्हा परतण्याचा. आणि पलानीसामी-पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वात काम करण्याचा. पण दुसरीकडे असा देखील प्रश्न आहे की, निवडणुकीच्या तोंडावर पलानीसामी आणि पनीरसेल्वम भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या शशिकलाना पुन्हा पक्षात घेण्याची रिस्क घेणार का?

दुसरा पर्याय :

आपल्या घरच्या एएमएमके या पक्षात जावून तो पक्ष मजबूत करणे. आणि राज्यात डीएमके आणि एआयडीएमके यांच्या नंतर तिसरा पर्याय उभा करणे. कारण गत लोकसभेत एएमएमकेला तामिळनाडूमध्ये ४ टक्के मत मिळाली होती.

तिसरा पर्याय :

राजकारणापासून लांब राहणे. कारण तसं ही पुढचे ६ वर्ष त्या ना कोणत्या पदावर राहू शकणार किंवा कोणती निवडणूक लढवू शकणार. आणखी एक म्हणजे त्यांच्या विरोधात अजून एक परदेशी चलनाचा चुकीचा वापर करण्यावरून केस चालू आहे. ९०० कोटी रुपयांचा कोडानाडु टी इस्टेटची केस देखील न्यायालयात आहे.

आता जाता जाता अजून एक गोष्ट. ज्या प्रकरणातून शशिकला बाहेर पडलेत ते प्रकरण २० वर्षांपूर्वी सुब्रम्हण्यम स्वामी यांनीच बाहेर काढलं होतं. पण राजकारण हे असेच असते. कल का दोस्त आज का दुष्मन आणि आज का दुष्मन कल का दोस्त.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.