प्रोफेसर होत्या, पीएचडीही झालंय… दिल्लीच्या नव्या महापौर शेली ओबेरॉय

दिल्लीमध्ये महापौर म्हणून आम आदमी पार्टीच्या उमेदवार शेली ओबेरॉय यांची निवड झालीये. ७० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ही निवड प्रक्रिया पूर्ण झालीये आणि दिल्लीला महापौर मिळाल्यात. ६ जानेवारी, २४ जानेवारी आणि त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान प्रक्रिया झाली होती पण आप आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये झालेल्या वादामुळे प्रक्रिया पूर्ण झाल्या नाहीत.

आज ही निवडणूक पार पडली आणि आम आदमी पार्टीच्या शेली ओबेरॉय या ३४ मतांनी विजयी झाल्या. आम आदमी पार्टीला २६६ पैकी १५० मतं मिळाली.

७ डिसेंबर २०२२ रोजी भाजपची १५ वर्षांची सत्ता संपवून आपने सत्ता मिळवली. महानगर पालिकेतल्या २५० जागांसाठी ४ डिसेंबर रोजी निवडणूक झाली, ज्यामध्ये आपने १३४ नगरपालिका प्रभाग, भाजप १०४, आणि काँग्रेसचे ९ जिंकले होते. मात्र आम आदमी पार्टी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये होत मतदानावेळी होत आलेल्या संघर्षामुळे महापौरपदाची निवड तीनदा पूर्ण होऊ शकली नव्हती.

शेली ओबेरॉय कोण आहेत हे बघुया.

दिल्लीतच जन्म झालेल्या शेली ओबेरॉय यांचे वडील एक व्यावसायिक आहेत तर, आई हाऊसवाईफ आहे. यांनी मास्टर्सची डिग्री ही हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटीतून घेतली. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये त्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरतही होत्या. याशिवाय त्यांनी मुंबईतील नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज , इंद्रप्रस्थ विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासह इतर अनेक विद्यापीठांमध्येही प्रोफेसर म्हणून काम केलं आहे.

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या युविव्हर्सिटीमधून त्यांनी पीएचडीसुद्धा पूर्ण केली आहे.

त्या इंडियन कॉमर्स असोसिएशयनच्या लाईफटाईम मेंबरसुद्धा आहेत.

२०१३ साली आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी पक्षात प्रवेश केला होता आणि पक्षाचं काम करत होत्या. २०२० साली त्यांना आम आदमी पार्टीच्या दिल्लीच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष बनल्या.

२०२२ मध्ये झालेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकांसाठी त्यांना आम आदमी पार्टीकडून दिल्लीच्या वॉर्ड क्रमांक ८६ म्हणजेच पटेल नगर-पूर्व या भागातून नगरसेवक पदाचं तिकीट मिळालं.

आता दिल्लीतल्या वृत्तांनुसार हा पटेल नगर पूर्व म्हणजेच ८६ क्रमांकाचा वॉर्ड हा भाजपचा बालेकिल्ला होता. आयुष्यातली पहिलीच निवडणूक लढवत असलेल्या शेली यांनी या भाजपची ताकद असलेल्या वॉर्डातून निवडणूक जिंकली.

पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या शेली ओबेरॉय या आता दिल्लीच्या महापौरही झाल्यात. महापौर झाल्यास त्या कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतील असं विचारल्यावर त्या म्हणाल्या होत्या,

“निवडणुकीदरम्यान पक्षाने १० आश्वासनं दिली होती, ती पूर्ण केली जातील. दिल्ली स्वच्छ होईल आणि तिचा कायापालट होईल. मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. भाजपने कोणतंही काम केलं नाही आणि दिल्लीचं रुपांतर कचराकुंडीत केलं, त्यात आता आम्ही सुधारणा करू.”

आता या विजयानंतर अरविंद केजरीवाल, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी त्यांचं अभिनंदन केलंय तर, गुंडांचं राज्य गेलंय आणि जनतेचं राज्य आलंय असं म्हणत जनतेचंही अभिनंदन केलंय.

आता शेली ओबेरॉय यांनी आधी केलेल्या वक्तव्यानुसार दिल्लीतल्या जनतेची कामं होतील का? याकडे दिल्लीच्या जनतेचं लक्ष असणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.