महेश बाबूची मेव्हणी शिल्पा एकेकाळी बॉलिवुड, टॉलीवुडची क्रश होती.

साऊथमध्ये मराठी माणसं फार कमी वेळा आपल्याला दिसून येतात पण जिथं जिथं मराठी माणसं दिसतात तिथं तिथं त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलेलं दिसून येतं. त्यात साऊथचा महाराजा रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड असो किंवा अस्सल मराठमोळ्या बाजाचा रांगडा हिरो सयाजी शिंदे असो या सगळ्यांची प्रचंड फॅन फॉलोइंग भारतभर दिसून येते.

पण जेव्हा अभिनेत्री हा विषय येतो तेव्हा आपल्याला कोणती मराठी हिरोईन टॉलीवूडमध्ये होती हेच आठवत नाही.

पण एक अभिनेत्री अशी होती तिने 80-90 च्या दशकात टॉलीवुड आणि बॉलीवूडला वेड लावलं होतं. महाराष्ट्राचा जावई असलेल्या महेश बाबूची बायको नम्रता शिरोडकरची बहिण म्हणजे शिल्पा शिरोडकर. एकेकाळी बॉलिवुड आणि टॉलीवुडची क्रश ती होती.

20 नोव्हेंबर 1969 रोजी मुंबईत एका मराठी कुटुंबात शिल्पा शिरोडकरचा जन्म झाला. घरात लहानपणापासूनच सिनेमाचं वातावरण असल्याने साहजिकच शिल्पाला सिनेमाची आवड निर्माण झाली.

शिल्पा आणि नम्रता या दोघी बहिणींची सुरवात एकत्र झाली पण नम्रता मॉडेलिंगकडे गेली तर शिल्पाने सिनेमातून सुरवात केली. जेव्हा मॉडेलिंग करून नम्रता शिरोडकर सिनेमात आली तोवर शिल्पाने सिनेक्षेत्राला रामराम ठोकला होता. शिल्पा आणि नम्रता शिरोडकर यांची आजी मिनाक्षी शिरोडकर या मराठीतल्या नावाजलेल्या अभिनेत्री होत्या ज्यांनी पहिल्यांदा स्विम सूट घालून पडद्यावर अभिनय केला होता.

शिल्पा शिरोडकरने आपल्या अभिनय करिअरची सुरवात केली ती म्हणजे 1989 साली आलेल्या भ्रष्टाचार या सिनेमातून. या सिनेमात शिरोडकरने एका अंध मुलीची भूमिका साकारली होती आणि हा सिनेमा चांगला चालला होता. यानंतर शिल्पा 1990 ची सुपरहिट फिल्म किशन कन्हैयामध्ये झळकली. अनिल कपूर आणि शिल्पा शिरोडकरची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली.

आपल्या करिअरमध्ये शिल्पा शिरोडकरने दमदार हिट सिनेमे दिले त्यात हम’ (1991), ‘खुदा गवाह’ (1992), ‘आंखे’ (1993), ‘गोपी किशन’ (1994), ‘बेवफा सनम’ (1995) यांचा समावेश होतो. साऊथमध्ये सुद्धा शिल्पा शिरोडकरची चांगलीच फॅन फॉलोइंग होती. गजगामीनी हा तिचा शेवटचा सिनेमा होता.

नंतरच्या काळात मनासारख्या भूमिका न मिळाल्याने आणि सारख्या सारख्या त्याच भूमिका ऑफर होऊ लागल्याने शिल्पा सिनेमातून बाहेर पडली आणि लग्न करून ती लंडनला राहायला गेली. नंतर तब्बल 13 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर काम करायची टीव्ही इच्छा झाली आणि एक मुट्ठी आसमान या सिरियलमध्ये ती अभिनय करू लागली.

शिल्पा शिरोडकर जास्त लक्षात राहिली ती म्हणजे खुदा गवाहसाठी. या सिनेमाने तिला लोकांच्या मनामनात पोचवलं. अजूनही तिची फॉलोइंग दर्दी लोकं आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.