७०० कोटींच्या चेकमधले नको असलेले ६३० कोटी परत करणारे शिवशंकरभाऊ.

मुळचे बुलढाण्याचे असणारे विक्रम पंडित तेव्हा जागतिक अशा सिटी बॅंकेचे चेअरमन होते. त्यांना भाऊंच काम माहित होतं. ते भाऊंना म्हणाले या कामासाठी किती पैसे हवेत. बॅकेच्या मार्फत ७०० कोटींचा चेक देण्यात आला.  विश्वस्त मंडळाने आराखडा तयार केला. किती खर्च येईल याचा हिशोब करण्यात आला. हिशोब लागला ७० कोटींचा संस्थानला ७० कोटींची आवश्यकता होती. ७० कोटी वापरण्यात आले आणि ६३० कोटी परत करण्यात आले. 

हे संस्थान महाराष्ट्रातलं अन् ६३० कोटींचा चेक परत करणारे ते व्यक्ती म्हणजे शेगाव संस्थानचे प्रमुख शिवशंकरभाऊ पाटील. 

श्री गजानन महाराज २३ फेब्रुवारी १८७८ रोजी शेगाव येथे प्रकटले. ८ सप्टेंबर १९१० रोजी ते समाधीस्थ झाले. त्यांच्या हयातीतच, १९०८ मध्ये श्री गजानन महाराज संस्थान नावाचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. ट्रस्टचे विश्वस्त म्हणून बारा विश्वस्थांची नियुक्ती करण्यात आली. 

यात्रा थांबू देवू नका, पैसा साचू देवू नका, निसिम्म भावनेने सेवा करा या तत्वांवर ट्रस्टचा कारभार सुरू करण्यात आला.

या संस्थानची सुत्रे पुढील काळात शिवशंकर भाऊ पाटील यांच्या हातात आली. त्या काळात संस्थानची वार्षिक उलाढाल ४५ लाख होती. भाऊंनी संस्थानमध्ये कामे करण्यास सुरवात केली. काही वर्षांमध्ये संस्थानची वार्षिक उलाढाल हि शिवशंकर भाऊंनी १३७ कोटींच्या घरात नेवून ठेवली.

पण या कोटींच्या व्यवहारात शिवशंकर भाऊंच्या कामांची किंमत करता येणार नाही, कारण अखेरपर्यंत संस्थानचा चहाच काय पाणी देखील शिवशंकर भाऊंनी प्यायले नाहीत. ते मंदिर परिसरात असत तेव्हा आपलं पाणी देखील घरातून आणत. 

आलेला पैसा साचू द्यायचा नाही या विचारातून शिवशंकरभाऊंच्या माध्यमातून मंदिर परिसराचा कायापालट करण्यात आला. आज शेगाव संस्थानबद्दल सांगायच झालं तर इथे सर्वात देखणं आणि तितकच  नावाजलेलं अस इंजिनियरिंग कॉलेज आहे, भक्तनिवासाची सोय कौतुकास पात्र अशी आहे आणि आनंदसागर सारखा ६५० एकर मध्ये पसरलेला परिसर असो या परिसरात आज कागदाचा एक तुकडा देखील पडलेला दिसत नाही. स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण या तत्वांवर त्यांनी संस्थानचा कारभार सांभाळला.  

शेगाव संस्थानचे भक्त निवासच्या खोल्या या पंचतारांकित हॉटेल्सना लाजवतील अशा आहेत. अवध्या पंधरा रुपयांमध्ये आनंदसागर पाहता येते. आनंदसागरची संपुर्ण संकल्पना शिवशंकर भाऊ यांनी उभा केली. महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळांसोबत मुख्य पर्यटन स्थळ म्हणून आनंदसागरचा उल्लेख केला जातो. विदर्भाच्या सांस्कृतिक अस्मितेते मानाचा तुरा खोवण्याच काम हे शिवशंकर भाऊंचीच कमाल आहे. इथे रुपया आणि रुपयांचा जमाखर्च लिहून ठेवण्यात येतो. 

संस्थानमार्फत ४२ पेक्षा अधिक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. आजूबाजूच्या १००० गावांमध्ये वैद्यकिय सेवा पुरवण्यात येतात. सामान वाहणाऱ्या ट्रालीपासून ते आपात्कालीन सुविधापर्यन्त सर्व गोष्टींनी अत्याधुनिक परिसर म्हणून शेगावचा परिसर ओळखला जातो. 

आज विदर्भात पाण्याचा प्रश्न भेडसावतो मात्र शेगाव नगरपरिषदेला ७ कोटी ७७ लाख रुपये दिल्यामुळे आज शेगावची नळयोजना सुरू होवू शकली. ते काम देखील शिवशंकर भाऊ यांच्या निर्णयांमुळे झाले. 

शेगाव संस्थानचा उल्लेख आज जगभर होत असतो, सांगली कोल्हापूर येथे झालेल्या पुरामध्ये त्यांनी एक कोटींचा धनादेश दिला. भारतभरच्या देवस्थानाच्या, संस्थानांच्या बाजारूपणामुळे देवाच्या सिंहानसापासून संपुर्ण देवच सोन्याचे झाले. सोन्या चांदीने देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करण्यात येतो, अशा वेळी मंदिर परिसर उभारणारे आणि अडल्यानडलेल्यांना मदत करुन एक आदर्श असे संस्थान उभा करणारे शिवशंकर भाऊ माणसातल्या देवाप्रमाणेच भासायचे. 

आज भाऊंचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने फक्त शेगावच नाही तर उभा महाराष्ट्र या देवमाणसाला पोरका झाला आहे.

copyright@bolbhidu.com

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. Dashrath Rama vaskar says

    मंदिराचे बांधकाम श्रीराम मंदिर पुन्हा बांधण्यासाठी मदत कुडगाव कोळीवाडा श्रीवर्धन तालुका

Leave A Reply

Your email address will not be published.