जिचकारांनी बजेटमधील बारीक नजरचुक शोधून काढली आणि मुख्यमंत्र्यांना वाचवलं.

आपल्या एका आयुष्यात त्यांनी ४२ क्षेत्रातील पदव्या घेतल्या. त्यापैकी २० हून अधिक पदव्या ते सुवर्णपदक घेवून पास झाले. ते IPS झाले, नंतरच्या दोनच वर्षात ते IAS झाले. वयाच्या २५ व्या वर्षी ते आमदार झाले.

फक्त राजकीय क्षेत्रच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात इतका हुशार माणूस कंदील घेवून गेलं तरी सापडणार नाही.

त्यांच नाव डाॅ. श्रीकांत जिचकार.

श्रीकांत जिचकार यांनी आपली पहिली पदवी मिळवली ती एम.बी.बी.एस. ची. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यात एल.एल.एम चं शिक्षण घेतलं. आर्ट्स, काॅमर्स आणि सायन्स अशा प्रत्येक शाखेतील पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेवून त्यांनी आपल्या नावावर रेकाॅर्ड रचला.

लोकप्रशासन, इंग्रजी साहित्य, मराठी साहित्य, संस्कृत, अर्थशास्त्र, पुरातत्व व मानसशास्त्र अशा विविध पदव्या मिळवल्या. यानंतरच्या काळात ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले.

IPS निवड झाल्यानंतर त्यांनी दूसऱ्यांदा परिक्षा दिली व IAS मिळवले. यानंतर चार महिन्यातच त्यांनी IAS चा राजीनामा देवून राजकारणात प्रवेश केला.

थोडक्यात सांगायच झालं तर डाॅ. श्रीकांत जिचकार हे वकिल, डाॅक्टर, पोलीस, पत्रकार, राजकारणी, तत्वज्ञ, अभ्यासक होते.

ते वयाच्या २५ व्या वर्षी सर्वात तरुण आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. १९८० ते १९९२ असे १२ वर्ष ते विधानसभेचे सदस्य होते. पुढे ते राज्यसभा सदस्य झाले. राज्यसभेचे सदस्य म्हणून काम करत असताना त्यांना युनो व युनिस्कोच्या व्यासपीठांवर भारताचे प्रतिनुधित्व करण्याची संधी मिळाली.

ते विधानसभा सदस्य होते त्या दरम्यानचा किस्सा प्रा. लक्ष्मण माने यांनी आपल्या विधिमंडळाच्या आठवणींमध्ये लिहला आहे.

प्रा. मानेंची विधानपरिषदेचे सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी प्रा. मानेंना बोलावून घेतलं व त्यांना विधीमंडळातल्या दोन अभ्यासू सदस्यांची ओळख करून दिली. या सदस्यांपैकी एकजण होते रा.सु. गवई तर दूसरे होते डाॅ. श्रीकांत जिचकार.

या वेळी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत पास होवून तो विधानपरिषदेत चर्चेसाठी आला होतां. जिचकारांनी लक्ष्मण मानेंना बजेट शिकवण्याचं ठरवलं व दोघे विधिमंडळातील एका टेबलवर अर्थसंकल्पाच्या बॅग मांडून बसले.

जिचकार बजेट समजावून सांगू लागले. हे करत असताना अचानक त्यांना बेरीज, वजाबाकीत तफावत आढळली. मानेंना घेवून त्यांनी पुन्हा ताळमेळ बसवला मात्र पुन्हा बेरीज चुकू लागली. जिचकारांनी लागलीच शिपायाकडून कॅल्क्युलेटर मागवून घेतला. तेव्हा हिशोबात फरक असल्याचं त्यांना कन्फर्म झालं.

त्यानंतर जिचकार तडकाफडकी ग्रंथालयात गेले व अर्थसंकल्पाची मुख्य पत्र पाहू लागले. या ठिकाणी देखील त्याच चुका होत्या. विधानसभेत पास झालेला अर्थसंकल्प चुकल्याची खात्री करून ते सभागृहात परतले.

तेव्हा लोकमान्य टिळकांचे नातू जयंत टिळक हे विधानपरिषदेचे सभापती होते.

जिचकरांनी प्रश्न विचारण्यासाठी टिळकांची परवानगी घेतली.

परवानगी मिळताच जिचकरांनी बजेटमधली चूक संपुर्ण सभागृहासमोर मांडली. जिचकारांचा प्रश्न ऐकून जयंत टिळकांनी तात्काळ १० मिनटांसाठी सभागृह तहकूब केलं. सभापतींनी जिचकरांना आपल्या चेंबुरमध्ये बोलावून घेतलं.

सभापतींच्या चेंबरमध्ये तात्काळ मुख्यमंत्री शरद पवार हजर झाले. जिचकरांनी मुख्यमंत्री व सभापतींना बजेटमधील चुका दाखवल्या. बजेट चुकल होतं हे कन्फर्म करण्यात आलं.

आत्ता प्रश्न होता काय करायचं ?

कारण विधानसभेमध्ये हे बजेट पास झालं होतं तर विधानपरिषदेला बजेट अडवण्याचा अधिकार नसतो. टिळकांनी बजेट सेशन परत बोलवण्याचा विचार मांडला. मात्र अस केल्यास संपुर्ण अर्थसंकल्प अधिवेशन परत घ्यावे लागणार होतेच सोबत राज्याची नाच्चकी देखील होणार होती.

टिळकांनी जिचकारांना पाईन्ट ॲाफ ॲार्डर मागे घेण्याची विनंती केली. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांवर ओढावलेली परिस्थितीत जिचकरांच्या मोठ्या मनामुळे मागे घेतली गेली. मुख्यमंत्री शरद पवारांनी देखील यानंतर श्रीकांत जिचकरांचे मोकळ्या मनाने कौतुक केले.

अशा या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वाचे २ जून २००४ रोजी कार अपघातात निधन झाले.

हे ही वाच भिडू. 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.