श्रीनिवास पाटलांच्या आतल्या गोष्टी.

काही वर्षांपुर्वीची गोष्ट. श्रीनिवास पाटील सिक्कीमचे राज्यपाल झाले होते. ते पुण्याच्या SP कॉलेजचे विद्यार्थी. आपला विद्यार्थी राज्यपाल झाला, त्यात कॉलेजचा कार्यक्रम देखील होता. SP कॉलेजमार्फत प्रमुख पाहूणे म्हणून श्रीनिवास पाटलांना बोलवण्यात आलं. 

उन्हाळ्याच्या दिवसात कार्यक्रम आयोजित केला होता. कॉलेजमध्ये चांगलीच हिरवळ होती. मुली आणि त्यांच्या केसातील गजऱ्यांनी वातावरणात उत्साह आणला होता.

प्रमुख पाहूण्याची ओळख करुन देण्याच्या हेतून एक सन्मानिय प्राध्यापक उभा राहिले आणि आपल्या भाषणात मुलींकडे पहात म्हणाले, 

उन्हाळा असला तरी छान मोगरा फुलला आहे. 

श्रीनिवास पाटलांच्या भाषणाची वेळ आली. श्रीनिवास पाटील उभा राहिले आणि पहिलच वाक्य म्हणाले, 

सन्मानीय प्राध्यापकांना माहिती नसावं की,

मोगरा उन्हाळ्यातच फुलतो. 

प्राध्यापकांसहीत विद्यार्थांच्यात हशा पिकला.

खूप कमी माणसं असतात जी कोणताही विषय आपल्या मातीवर आणू शकतात. श्रीनिवास पाटील त्यातलेच. श्रीनिवास पाटील म्हणजे खऱ्या अर्थाने मुलूख मैदानी तोफ.

भारदस्त आवाज, त्याच्यावर शोपीस असल्यासारख्या तितक्याच भारदस्त मिश्या. अंगापिंडाने एकदम राजामाणूस. हा माणूस बोलायला उभा राहिला की भल्याभल्यांना गार करतो. आपल्या भाषणात कधी विरोधकांवर टिका करणार नाही. आपली माती आपली माणसं हा त्यांचा बोलण्याचा विषय. सातारा, सांगली परिसरात असले की तिथली माती सांगणार. अगदी पुण्यात जेव्हा ते बोलतात तेव्हा भाषणाची सुरवात “अखिल भारतीय पुणेकर” म्हणून करतात.

श्रीनिवास पाटील उदयनराजेंना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकांचा अंदाज बांधणाऱ्यासाठी उदयनराजे की श्रीनिवास पाटील हा प्रश्न असेल. पण बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरुन गायब असणारे श्रीनिवास पाटील कसे आहेत याच व्यवस्थित उत्तर बोलभिडूच्या माध्यमातून मिळणं गरजेचं आहे.

एकदा शरद पवार आणि श्रीनिवास पाटील दोघजण अलका टॉकीजच्या चौकातून SP कॉलेजच्या दिशेने चाललेले.

फुटपाथवरून चालत असताना जवळून श्रीनिवास पाटलांच्या वर्गातली मुलगी सायकलवरून चालली होती. शेजारून सायकल जाताना अचानक पाठीमागून कुणीतरी सायकल ओढली. सायकल थांबली. पोरगीनं मागं बघितलं. शरद पवारांना ती बोलणार इतक्यात पवारांनी पाटलांकडे बोट दाखवलं. ती पाटलांच्याच वर्गातली. आपण काही केलं नसताना पोरगी सुनावत असल्यामुळे पाटलांना राग आला. रागाचा पारा चढला. दोघं एकमेकांच्या विरोधात आवाज चढवू लागले. ती पोरगी शास्त्रीय नृत्यात विद्यापीठात पहिली आली होती.

बोलता बोलता पाटील तिच्या नाचावर घसरले. झालं पोरगी म्हणाली,

नाचायला देखील अक्कल लागते. 

पाटलांची अक्कल काढल्यामुळे पाटलांचा पारा चढला. प्रकरण निस्तरलं पण श्रीनिवास पाटलांनी एक गोष्ट ठरवली. आपण शास्त्रीय नृत्य शिकणार. SP कॉलेजचे श्रीनिवास पाटील रोज दोन तास शास्त्रीय नृत्य शिकायला जावू लागले. पाटील थकून आले की त्यांच अंग दाबून द्यायची जबाबदारी पवारांवर आली.

पुढच्या काही महिन्यातच कॉलेजने आंतरविद्यापीठ शास्त्रीय नृत्यात सुवर्णपदक पटकावलं.

श्रीनिवास पाटलांसोबत अलका टॉकीजच्या चौकात भांडलेली ती मुलगी आणि खुद्द श्रीनिवास पाटील अशा या जोडीने सुवर्णपदक आणलेलं.  पाटील हे असे, पवार सुरवात करणार आणि पाटील निस्तरणार अशी त्यांची कॉलेजची मैत्री. 

शरद पवार BMCC कॉलेजला आले ते साल होतं. १९५८ चं. आणि श्रीनिवास पाटील SP कॉलेजला आले ते सालं होतं १९५७ चं. श्रीनिवास पाटील हे शरद पवारांना सिनियर. पाटील SP कॉलेजचे CR होते. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून त्यांचा चांगलाच दबदबा होता. राजकारणात जायचं म्हणून पाटलांनी व्यवस्थित काम सुरू केलेलं. युवक कॉंग्रेसचा सक्रिय सदस्य आणि सातारा जिल्ह्यातील मुलांची संघटना. @copyright@bolbhidu.com

एक दिवस SP कॉलेजच्या रुम नंबर चौदा मध्ये श्रीनिवास पाटील बसले होते. तिथं शरद पवार नावाचा पोरगा आला.

तो म्हणाला तूम्ही सातारा जिल्ह्यातल्या मुलांचा ग्रुप केला आहे. आपण दोघं मिळून काहीतरी करुया. ठरलं. यात शेकापच्या नेत्यांचा तिसरा मुलगा धनाजी जाधव सामील झाला. तिघांचा ग्रुप. सायकलवरून रात्री अपरात्री फिरायचं. काम करायची. हा तिघांचा छंद. 

पुण्यात इलेक्शन चालू होत्या. तेव्हा शरद पवार आणि श्रीनिवास पाटील दिवसभर बुथ कार्यकर्ते म्हणून काम करायचे. पाटील आणि पवारांची गट्टी जमली. पाटील पवारांच्या घरी म्हणजे बारामतीला सुट्टीला जायचे. तिथं शारदाबाईंचा धाक असायचा. कॅनॉलच्या शेजारी असणाऱ्या बंगल्याच्या टेरेसेवर हे दोधं झोपायचे. श्रीनिवास पाटील सांगतात रात्रीचा पाऊस पडायला लागला की मी उठायला लागयचो. शरद पवार मला अडवायचे. ते काय म्हणायचे तर कमी पाऊस आला तर अंगावर संतरंजी घे आणि जास्त आला तर अंगावर गादी घे. पण पळू नको. झोप. @copyright@bolbhidu.com

असं या दोघांच राजकारण चालायचं. पुढे शरद पवार राजकारणात गेले. श्रीनिवास पाटील IAS झाले. पवारांच्या लग्नाच्या वेळी श्रीनिवास पाटील पन्हाळ्याचे प्रांताधिकारी होते. तेव्हा तुफान पाऊस सुरू झालेला. आजच्या सारख्या अक्षता तेव्हा मंडपात मिळत नव्हत्या. त्या पावसात कसेबसे सकाळच निघून पाटील संध्याकाळच्या वेळीस बारामतीत पोहचले. हातातल्या अक्षता टाकल्या. 

पवार राजकारणाच्या एक एक पायऱ्या वर चढत होते. इकडं श्रीनिवास पाटील प्रशासकिय अधिकारी म्हणून फेमस होते. पवार जेव्हा उद्योगमंत्री झाले तेव्हा पाटील MIDC चे डेप्युटी CEO होते. दोघांचे संबध यायचे ते नेता आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून. 

श्रीनिवास पाटील पुण्याचे जिल्हाधिकारी झाले. तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते.

शरद पवार पुण्यात आले की प्रोटोकॉल म्हणून पाटील दिवसभर पवारांच्या पुढे उभा असायचे. पवारांनी सांगितलेले टिपण काढत रहायचे. मुख्यमंत्र्यांच्या पुढे जिल्हाधिकाऱ्यांनी बसून राहणं हा शिष्टाचाराचा भंग होतो.  पण रात्रीचे आठ झाले की सगळे आपआपल्या मुक्कामाला जायचे आणि मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची दोस्ती जेवणाच्या टेबलावर सुरू व्हायची. 

श्रीनिवास पाटील एका आठवणीत सांगतात की,

पवार तेव्हा लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आले होते. ते मुख्यमंत्री होते. मी जिल्हाधिकारी. त्यांना पाहताच मी उठून उभा राहिलो. वास्तविक जिल्हाधिकारी अर्थात निवडणुक अधिकाऱ्यानं अर्ज स्वीकारताना उभा राहणं हा शिष्टाचार नसतो. पवारांनी मी उठून उभा राहतोय म्हणल्यानंतर लगेच हात दाबला आणि बसण्यासाठी खुणवलं. पवारांच राजकारण आणि पाटलांची प्रशासकिय सेवा अगदी उत्तम चालू होती. पाटलांची सुरवात राजकारणापासून झाली होती. त्यांच्या दोस्तीला देखील राजकारण कारणीभूत होतं.

श्रीनिवास पाटलांना राजकारणच करायचं होतं, पण..

कराडमध्ये यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, आनंदराव चव्हाण अशी नेतेमंडळी होते. त्यांच्यात आपला निभाव लागणं पाटलांना अशक्य वाटाचयं. म्हणून पाटलांनी MPSC चा मार्ग स्वीकारला. प्रशासकिय सेवेत आलं तरी आपलं राजकारण राहून गेल्याची खंत श्रीनिवास पाटलांना होतीच.

पुढे पुलाखालून बरच पाणी गेलं. १९९९ सालात पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. कराड लोकसभा मतदारसंघातून तेव्हा कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण उभा होते. त्याच वेळी पवारांनी नागपूर सुधार प्रन्यासचे सचिव असणाऱ्या श्रीनिवास पाटलांना मुंबईत बोलावून घेतलं. 

श्रीनिवास पाटील मुंबईत आले. पवारांना भेटले. पवार म्हणाले जा नोकरीचा राजीनामा देवून ये. श्रीनिवास पाटलांनी काहीही न विचारता राजीनामा दिला.

कराड लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटलांना उमेदवारी देण्यात आली. 

पाटील नवखे होते पण अस्सल होते. लोकांना पाटलांची ओळख देखील नव्हती. पण पाटलांनी मैदान गाजवलं. आपल्या धारधार मिश्यावर पिळ मारत पाटील मातीच्या गोष्टी सांगू लागले. विरोधक निवडणुका यांची चर्चा जावू असल गप्पांची मैफिल होवू लागली. लोक बोलायचे आणि फड रंगायचा. पाटलांनी तब्बल तीन लाखांच्या मताधिक्याने हा फड मारला. पवारांनी कॉलेजच्या वयात मित्राला दिलेला शब्द पुर्ण केला. मतदारपुर्नरचनेत हक्काचा मतदारसंघच गायब झाल्यानंतर ते सिक्कीमचे राज्यपाल झाले. ते राज्यपाल होते ते नॉर्थइस्ट फिरायला जाणाऱ्या मराठी माणसांसाठी त्यांच राजभवन उघड असायचं, असा पाटलांचा कारभार.

पवार सांगत गेले आणि मित्र करत गेला अशी हि दोस्ती. 

पण एक गोष्ट पवारांनी कधीच सांगितली नाही, त्या मुलीची सायकल पाठीमागून कोणी ओढली होती. आमच्या मते ते पवारच असावेत. 

@copyright@bolbhidu.com

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.