मी युरोपमध्ये गुलाब विकत घेतलं तेव्हा समजलं ते महाराष्ट्रातल्या या ठिकाणाहून आलय

डब्लिनमध्ये रहाणारा मित्र महाराष्ट्राचं कौतुक करत होता. तिथले किस्से सांगता सांगता तो म्हणाला,

अरे इथे कोल्हापूरवरून फुलं येतात. मी जेव्हा इथे गुलाब घ्यायला गेला तेव्हा मला समजलं की कोल्हापूरच्या शिरोळमधून इथं फुले आलेली.

आत्ता बऱ्याच NRI लोकांच्याकडे फेकण्याची स्कील डेव्हलप झाल्याने आम्हाला वाटलं हा पण फेकत असेल. “आमचा जर्मनाचा भाच्चा, सातारा हायवेवर ट्रक दिसला” अशा ज्या फॉरेनच्या माणसांच्या नावाने थापा रचल्या गेल्या त्यातीलच ही पण एक थाप असावी अस वाटलं.

तरिही म्हणलं चौकशी केली पाहीजे. तेव्हा समजलं खरच कोल्हापूरात युरोप, आस्ट्रेलिया अशी दूरवर फूलं निर्यात केली जातात. ही फुलं निर्यात करणारी कंपनी आहे श्रीवर्धन बायोटेक. तब्बल ११० एकरात असणारे हरितगृह आणि विक्रमी शेतीचे झालेले असंख्य प्रयोग यामुळे श्रीवर्धन बायोटेकचं नाव आज जगभरात दरवळत आहे.

सा.रे. पाटील या व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. वयाच्या ९० पोहचूनही निवडणूकीचा फड गाजवणारे सा.रे.पाटील उभा महाराष्ट्राला माहित आहेत. 

सा.रे. पाटील ज्याप्रमाणे आपल्या राजकारणासाठी प्रसिद्ध होते तसेच ते शेतीच्या वेगवेगळ्या प्रयोगासाठी देखील प्रसिद्ध होते. हाच वारसा गणपतराव पाटलांनी घेतला. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी पारंपारिक शेतीतून बाहेर पडत फळबागांवर लक्ष केंद्रित केले. आंबा, बोर, चिकू, नारळ अशा विविध पिकांमध्ये त्यांनी विक्रमी उत्पादन घेण्यास सुरवात केली. या विक्रमातूनच शेतीत भविष्य आहे याचा विचार करून त्यांना हरितगृहाचा प्रयोग सुर करण्याची तयारी केली.

त्यांनी हरितगृहाची उभारणी केली ते सालं होतं १९९७-९८ चं. या काळात हरितगृह ही संकल्पनाच नवीन होती. सहजासहजी पारंपारिक शेतकरी असा प्रयोग करण्याचं धाडस करत नसत. त्या काळात त्यानी चार एकरात ग्रीनहाऊस उभा करून त्यामध्ये जरबेरा, कार्नेशन आणि सोबतच रंगीत ढोबळी मिरचीचे उत्पादन करण्यास सुरवात केली.

हरितगृहात प्रयोग करत असताना मातीचा उपयोग टाकून कोकापिटचा वापर करण्याचा विचार आला. कोकापिट म्हणजे नारळाच्या शेंड्याचा भूगा. त्यांचा हा प्रयोग पथ्यावर पडला आणि ग्रीनहाऊस रंगेबिरंगी फुलांनी नटू लागले. चार एकरातून ग्रीनहाऊस विस्तारत गेले. पुढील काळात २५ हेक्टर पर्यन्तचे क्षेत्र विस्तारले गेले. मातिविना शेती करत लाखोंच्या संख्येत गुलाब, ७०-८० हजारांचे जरबेरा, १०-१५ हजार कार्नेशन, आर्किड, शेवंती अशा फुलांचे उत्पादन करण्यास सुरवात करण्यात आली.

उत्पादन सुरू होते पण त्याचसोबत फुलांची विक्री जागतिक बाजारपेठेत विक्री करण्याचं देखील एक आव्हान होतं. अशा वेळी फक्त क्वॉलिटीवर विश्वास ठेवण्यात आला. त्यासाठी ग्रामिण भागातील मजूरांना शेतीचे उच्चतंत्रज्ञान समजून सांगण्यात आले. कुळपणी करणारे हात जरबेरा सारख्या फुलांवर लिलया फिरू लागले आणि स्थानिक लोकांसाठी रोजगारीचे एक नवीन क्षेत्र मिळू लागले.

क्वॉलिटीमुळे अल्पावधीतच जपान, युरोप, ऑस्ट्रेलिया अशा विविध भागातून फुलांसाठी मागणी येवू लागली. मिरॅकल, सनकिंग, शुना, पॉयझन, शकिरा, बिनाका, स्वीटनेस अशा एकूण ३० हून अधिक वेगवेगळ्या गुलांबाच्या प्रकारांचे उत्पादन घेण्यास सुरवात करण्यात आली.

विदेशासह भारतभरातल्या अनेक ठिकाणी फूले पाठवण्यात येवू लागली. फुल पॅकिंग करणे, योग्य आकारांची फुले निवडणे यासह निर्यातीच्या संपूर्ण प्रकिया संभाळण्यासाठी १०० कामगारांसह ६ हजार चौरस फुटांचा AC हॉल उभारण्यात आला.

योग्य कळी निवडून ती शिरोळमधून मुंबईत पाठवणे व मुंबईतून विदेशात पाठवणे हा गेल्या पंचवीस वर्षांचा दिनक्रम झालेला आहे. यामुळे परकिय पैसा भारतात येण्यास तर चालना मिळतेच पण ग्रामीण भागातून जगभरात पोहचू शकणारं एक बिझनेस मॉडेल उभा झाल्याचं समाधान देखील मिळतं. आज साधारण १५ लाख गुलाब इथून निर्यात केली जातात.

लंडनच्या शहरात एखादा पोरगा एखाद्या पोरगीला प्रपोज करतो तेव्हा त्याच्या हातात असणारा गुलाब कोल्हापूरचा असतो यात देखील एक अभिमानच आहे म्हणा.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.