भारताला शुभमन गिल युवराज सिंगमुळं मिळाला…

२००० सालचा अंडर-१९ वर्ल्डकप, २००७ चा टी२० वर्ल्डकप आणि २०११ चा वनडे वर्ल्डकप. या तिन्हीमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे मॅचविनर युवराज सिंग.

भर मैदानात रक्ताच्या उलट्या होऊनही युवराज कायम लढत राहिला, त्याच्याविषयी ना वादाच्या बातम्या बाहेर आल्या, ना मोठ्या कॉंट्रोव्हर्सीज झाल्या, तो लक्षात राहिला तो सहा सिक्सेसमुळं, ऑस्ट्रेलियाला दिलेल्या खुन्नसमुळं आणि कॅन्सरला हरवून केलेल्या खतरनाक कमबॅकमुळं. पण या कमबॅकनंतरही युवराजला टीममधून साईड लाईन करण्यात आलं, आयपीएलमध्ये त्याला कोटीत पैसे मिळाले खरे पण त्याची जादू काही म्हणावी इतकी चालली नाही.

त्याच्या बॅचचे प्लेअर्स सध्या कमेंटरी बॉक्समध्ये आहेत, नायतर वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये, मग युवराज सध्या आहे कुठं असा प्रश्न पडला की त्याचं उत्तर मिळतं शुभमन गिलच्या परफॉर्मन्समधून.

अहमदाबाद टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलर्स खतरनाक बॉलिंग करत असूनही, गिलनं जबरदस्त बॅटिंग केली आणि सेंच्युरी मारली. पहिल्या दोन टेस्टमध्ये न मिळालेली संधी, तिसऱ्या टेस्टमध्ये आलेलं अपयश या सगळ्याला त्यानं महत्त्वाच्या मॅचमध्ये उत्तर दिलं, तेही सेंच्युरीनं.

मागच्या दोन महिन्यात गिलनं तीन फॉरमॅट्समध्ये मिळून ५ सेंच्युरीज मारल्यात, थोडक्यात करिअरच्या सुरूवातीलाच तो फ्युचर स्टार म्हणून पुढं येतोय आणि त्याचं क्रेडिट जातं, युवराज सिंगला.

आधी एज ग्रुप क्रिकेटमध्ये मिळालेलं यश, त्यानंतर अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान व्हर्सेस मारलेली सेंच्युरी यामुळं गिलची मजबूत हवा झालेली, आयपीएलमध्येही रग्गड पैसे मिळाले. पण पुढच्या स्टेजला जाण्यासाठी आणखी तयारी हवी होती आणि इथंच एंट्री झाली युवराजची. गिल आणि युवराज दोघंही पंजाबचे. जेव्हा युवराजचा डोमेस्टिक क्रिकेटमधला डाऊनफॉल सुरु होता, तेव्हा कुठं गिल फॉर्ममध्ये येत होता. युवराजनं त्याच्या बॅटिंगवर काम केलंच, पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या माईंडसेटवर काम केलं.

अंडर-१९ वर्ल्डकप, आयपीएलमुळं मिळालेलं स्टारडम कुणाच्याही झटकन डोक्यात जाऊ शकतं, याच वेळी या प्लेअर्सला टीम मॅनेजमेन्ट कंपन्या अप्रोच करतात. मग काँट्रॅक्ट्स, जाहिराती, पैसा असा सगळा कारभार. युवराजनं गिलला पहिला सल्ला दिला होता, तो या सगळ्यापासून लांब रहायचा. करिअरच्या सुरुवातीला त्यानं गिलला कुठल्याच प्लेअर मॅनेजमेंट कम्पनीसोबत डील करु दिलं नाही, त्यामुळं गिलचा फोकस फक्त क्रिकेटवरच राहिला.

करिअरच्या सुरुवातीला गिलच्या बॅटवर स्टिकर नसायचं आणि या गोष्टीची चर्चाही व्हायची. मग तिथं स्टिकर दिसलं ते युवी कॅन या युवराजच्या कॅन्सर फाउंडेशनचं.

गिलची बॅटिंग बघितली की एक गोष्ट लक्षात येते की त्याची टेक्निक वाढीव आहे. पण सुरुवातीला असं नव्हतं, गिलचा बॉटम हॅन्ड जरा जास्त टाईट होता. ज्यामुळं कट करताना फायदा व्हायचा, पण काही शॉट्सवर लिमिट यायचं. युवराजनं हेच ओळखून त्यावर काम केलं आणि त्याचे रिझल्ट गिलच्या करिअरच्या सुरुवातीलाच दिसून आले. पण प्रत्येक प्लेअरच्या आयुष्यात एक चेंजिंग पॉईंट येत असतोय, गिलच्या आयुष्यात तो आला २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमुळं.

कोहली नव्हता, निम्मी टीम इंज्युर्ड होती आणि गॅबावर जिंकणं अवघड वाटत होतं. पाचव्या दिवसाचं प्रेशर हॅन्डल करत गिलनं ९१ रन्सची बाप इनिंग्स खेळली. त्यामुळंच रिषभ पंतला येऊन तोडफोड करण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार झाला. गिलनं स्टार्क, हेजलवुड, कमिन्स सगळ्यांचे बाऊन्सर्स अगदी किरकोलीत खेळून काढले. त्या इनिंगनं सिद्ध केलं की, गिल लंबी रेस का घोडा आहे.

ऑस्ट्रेलिया टूरमध्ये चान्स मिळाला तर तो गिलच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरु शकतो हे युवराजनं ओळखलं होतं. त्यानं गिलसोबत सिमेंटच्या विकेटवर बाऊन्सर्सची प्रॅक्टिस केली. त्याला ऑस्ट्रेलियाच्या पेस फॅक्ट्री समोर खेळायला प्रॉपर तयार केलं. फ्रंट फूट डिफेन्स आणि स्विंगिंग डिलेव्हरीजसाठी तयारी करुन घेण्यासाठी युवराजनं गिलचं सचिन तेंडुलकरसोबतही बोलणं करुन दिलं.

त्या एका सिरीजसाठी जितकी जान गिलनं ओतली, तितकीच युवराजनंही.

इंटरनॅशनल सेटअपमध्ये गिल चांगले परफॉर्मन्स करत होता, पण सेंच्युरी येत नव्हती. त्यानं साहजिकच युवराजचा सल्ला घेतला आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या सिरीजमध्ये रिजल्टही मिळाला. युवराज नुकतंच म्हणाला की, पुढच्या १० वर्षात गिलचं नाव ग्रेटेस्ट क्रिकेटर्सच्या यादीत असेल आणि मागच्या काही मॅचेसची आकडेवारी बघितली तर त्याच्या बोलण्यात कुणालाही तथ्यच वाटेल.

पण युवराजनं एकट्या  गिललाच ट्रेन केलं अशातलीही गोष्ट नाही.

लॉकडाऊन लागलेलं तेव्हा पंजाबमधल्या प्लेअर्सच्या प्रॅक्टिसचा प्रश्न पुढं आला, आयपीएल काही महिन्यांवर होती त्यामुळं प्रॅक्टिस गरजेची होती. तेव्हा धावून आला युवराज सिंग. अभिशेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, अनमोलप्रीत सिंग आणि शुभमन गिल या सगळ्यांना युवराजनं स्वतःच्या घरी राहायला बोलावलं. त्यांची प्रॅक्टिस घेतली, मॅच सिच्युएशनच्या दृष्टीनं टार्गेट्स दिले, जेव्हा हे प्लेअर कमी पडू लागले तेव्हा स्वतः हातात बॅट घेतली आणि जे सांगतोय ते करुनही दाखवलं.

कॅन्सर सारखं आजारपण, स्वतःसोबत झालेलं राजकारण हे सगळं बाजूला सारत युवराज पुन्हा मैदानात उभा राहिला, तो या नव्या पिढीसाठी. आधी ग्राउंड आणि मग जाहिरातींमधून युवराज सिंग गायब झाला खरा, पण वनडे, टेस्ट, टी२० तिन्ही फॉर्मॅटसमध्ये सेंच्युरी मारणाऱ्या शुभमन गिलसारखा चेला देऊन.

गिल नेक्स्ट कोहली बनेल की नाही माहीत नाही, पण जे काही बनेल त्यात युवराज सिंगचा मोठा वाटा असेल, अगदी २०११ चा वर्ल्डकप जिंकण्यात होता तितकाच…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.