कहों ना प्यार हैं रिलीज झाला तेव्हा अजून एक सुपरस्टार जन्माला आला, लकी अली…
१४ जानेवारी २०००.
“कहो ना प्यार है” रिलीज झाला आणि चित्रपट सृष्टीत वादळच आलं. सगळे नवे चेहरे होते, टिपिकल मसाला हिंदी पिक्चर होता तरी हा पिक्चर पहिल्या दिवसापासून तिकीट खिडकी वर कमाल करू लागला. “कहो ना प्यार है” मधला ह्रितीकचा ग्रीक गॉड सारखा देखणा लूक, खास बनवलेलं फिजिक, नव्या स्टाईलचा डान्स हे सगळं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.
त्यामुळे भारताला नवा सुपरस्टार मिळाला असंच सगळ्यांना वाटत होतं. या पिक्चरची गाणी प्रचंड गाजली. राजेश रोशनच संगीत होत खरं पण हिरोचा आवाज म्हणून एक वेगळा आवाज वापरला होता तो म्हणजे लकी अली.
‘ईक पल का जीना’ सारखं क्लब मधलं डान्स नंबर असो की ‘ना तुम जानो ना हम’ सारखं हळुवार प्रेमगीत असो लकी अली न आपल्या खास शैलीत दोन्ही गाणी गायली. आता पर्यंत असा आवाज कधी गाण्यांमध्ये ऐकलाच नव्हता. हिरोची गाणी टिपिकल सुरेल गायकच गायचे. “लकी अली” च्या आवाजाने ही मान्यता मोडून काढली. अनेक रेकॉर्ड मोडले. त्यावर्षीचा बेस्ट सिंगर साठीचा फिल्मफेअर सुद्धा त्याला मिळाला.
विनोदाचा बादशाद मेहमूदचा लकी अली मुलगा.
लकी अली साठी बॉलिवूड नवीन नव्हता. त्याचा जन्मचं फिल्मी फॅमिली मध्ये झाला होता. विनोदाचा बादशहा सुपरस्टार मेहमूदच्या आठ मुलांपैकी हा दुसरा. त्याच्या आईने सुद्धा काही फिल्ममध्ये काम केलं होतं. फेमस मीनाकुमारी ही लकी अलीची सख्खी मावशी. अँकटिंग त्याच्या रक्तातच होती. लकी अलीने सुद्धा मेहमूदने दिगदर्शीत केलेल्या काही चित्रपटात छोटे मोठे रोल केले. शाम बेनेगल सोबत “त्रिकाल” हा चित्रपट आणि “भारत एक खोज” ही मालिका यात छोटे रोल केले.
वडिलांबरोबर त्याचे संबंध काही विशेष चांगले नव्हते. लहानपणा पासूनच तो बंडखोर होता. लकीच्या ड्रग्सच्या सवयीवर मेहमूद ने 1996 साली “दुष्मन दुनिया का” नावाचा पिक्चर बनवला.(सलमान आणि शाहरुख ने यात गेस्ट अपियरन्स दिला होता) लकीने त्यात नायकाचा रोल करायला नकार दिला. पण याच फिल्म मध्ये त्याने एक गाणे गायले. तिथून त्याच्या गायनाचा प्रवास सुरु झाला.
त्याच वर्षी त्याने एक म्युजिक अलबम बनवला “सुनो”. त्याच संगीत सुद्धा लकी नेच दिले होते. पण त्याला कोणी प्रोड्युसर मिळेना. बच्चनच्या ABCL च्या ऑफिस मध्ये सहा महिने हा अल्बम पडून राहिला. अखेर तो अल्बम लाँच झाला. त्यातली सगळी गाणी गाजली.
६० आठवडे MTV आशिया च्या चार्टवर एक नंबर वर हा अल्बम राहिला. बेस्ट पॉप सिंगरचा अवॉर्ड लकी ला मिळाला. लकी अली यशाच्या चढत्या कमानिवरच होता. “कहो ना प्यार है” ने तर इतिहास घडवला. पाठोपाठ आलेल्या “गोरी तेरी आंखे कहे” या अलबम च टायटल सॉंग भरपूर हिट झालं.
२००२ ला तो हिरो बनून आला. चित्रपट होता “सूर”. पिक्चर काही विशेष गाजला नाही पण गाण्यांनी धुमाकूळ घातला. त्यातल्या “आ भी जा” या गाण्यात तर ज्या आर्त पणे त्याने नायिकेला साद घातलीय त्याला कशाचीच तुलना होऊ शकत नाही. ए.आर. रेहमानने त्याचा आवाज युवा मध्ये, बॉईज या तामिळ मुव्हीत वापरला. प्रसिद्धी च्या शिखरावर असलेला लकी अली हळूहळू हिंदी मधून गायब होऊ लागला. त्याच्या कडे भरपूर ऑफर येत होत्या पण तो नाकारतच राहिला.
मागच्या दशकात “अंजाना अंजानी” “बचना ऐ हसिनो” असे अपवाद वगळता तो कुठे दिसलाच नाही.
तो करतोय तरी काय आशा चर्चा सुरू झाल्या तेव्हा कळले त्याने बंगळुरू जवळ शेती घेतलीय आणि तो शेती करतोय. बॉलिवूड वरून त्याचं मन उडलंय. तिथं कलेसाठी लागणारा प्रामाणिकपणा उरलेला नाही असं त्याला वाटतं.
मनाच्या शांती साठी तो शेती करतोय. साधी शेती नाही तर त्यात वेगळं करायचा त्याचा प्रयत्न आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून त्याने वेगवेगळ्या गोष्टीचा अभ्यास केलाय. यातूनच “ट्राईब नेशन फार्मर” नावाची संस्था सुरू केली आहे. तिथे शेतकऱ्यांना आपला माल ऑनलाइन विकता येतो. आशा ऑबिट गोष्टी करण्यात त्याला समाधान मिळतंय. गाणं तो गात नाही असं नाही.
काही वर्षापूर्वी तमाशा चित्रपटात त्यान “सफरनामा” गाणं गायलंय.
आता गाणी तो पैशासाठी नाही तर स्वतःच्या समाधानासाठी गातो.
कैलास खेर, अदनान सामी, रहात फतेह अली खान अशा सुफी गायकांना बॉलिवूड चे दार लकी अलीमूळे उघडले गेले. आजही त्याची गाणी पार आत पर्यंत घुसतात आणि खूप वेळ तशीच फिरत फिरत राहतात.
हे ही वाच भिडू .
- गोव्याच्या कानाकोपऱ्यात सिनेमा पोचविणाऱ्या अवलियाची गोष्ट !
- अजय देवगणनी वाट लावली.
- ऐ मेरे वतन के लोगों; हा आवाज कोणाचा ?