या स्वराचा यथायोग्य वापर संगीतकारांकडून कधीच झाला नाही…

’शाम रंगीन हुयी हैं तेरे आंचल की तरह, सुरमई रंग सजा है तेरे काजल की तरह’ कैफी आजमी ची ही अप्रतिम गजल सी. अर्जुनने स्वरबध्द केली होती. ऐंशीच्या दशकात जेंव्हा अ‍ॅक्शन मारधाड सिनेमांनी हाईट गाठली होती, त्यावेळी कधीतरी ‘कानून और मुजरीम’ हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला हे कळालेच नाही.

फक्त त्यातील हि गजल तेवढी रेडिओच्या माध्यमातून कानावर येत होती. उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेली हि गजल खरं तर झाकलेलं माणिक होतं. प्रस्तुत सिनेमा डब्यात गेल्याने एक सुंदर गजल सुध्दा झाकली गेली.

उषा मंगेशकर यांचा स्वर असाच झाकलेल्या माणकासारखा होता. एक तर या स्वराचा यथायोग्य वापर संगीतकारांकडून कधीच झाला नाही. मंगेशकर घरातील सर्वच जण संगीताच्या धाग्याने बांधले गेले असले तरी उषाचा कल मात्र चित्रकला आणि नृत्याकडे होता. त्यातील चित्रकलेला त्यांनी आयुष्यभर जपले आणि फुलवले.

उषाचा स्वर १९५५ सालापासून  सिनेमात ऐकायला येवू लागला. अण्णांच्या ‘आजाद’ मध्ये लता सोबत गायलेलं ‘अपलम चपलम’ हे त्यांचं पहिलं गाजलेलं गीत.

लता आणि आशा हिदी सिनेसंगीताच्या दुनियेत तळपत्या तारकेसारख्या चमकत असताना उषाची कारकिर्द सुरू झाली त्यामुळे साहजिकच तिच्या वाट्याला तशी गाणी कमीच येत गेली. १९७२ सालचा ‘पिंजरा’, १९७५ सालचा ‘जय संतोषी मॉं’, १९७८ सालचा ’इन्कार’ आणि १९८० सालचा ’तराना’ हे त्यांच्या चित्रपट सांगितिक जीवनातले महत्वाचे पडाव.

गायिका उषा मंगेशकर यांना लता आणि आशाच्या तुलनेने हिंदी सिनेमा मध्ये कमी गाणी गायला मिळाली, परंतु काही गाण्यांसाठी आपल्याला उषा मंगेशकर यांचा स्वर आठवावा लागतो. विशेषतः १९५९  साली आलेल्या ‘मै नशे मे हू’ या चित्रपटातील ‘ये न थी हमारी किस्मत…’ हि मिर्झा गालिब यांची गझल मुजऱ्याचा रूपामध्ये या चित्रपटात उषा मंगेशकर यांनी गायली होती.

या चित्रपटाच्या चार वर्षे आधीच ‘मिर्झा गालिब’ नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटात देखील हीच गझल होती आणि ती सुरैय्या  यांनी गायली होती. तुलनेचा धोका असताना देखील उषाने अतिशय झोकात हे गीत गायले. १९७७ साली ‘इंकार’ हा चित्रपट आला होता.

या सिनेमातील ‘मुंगडा मुंगडा….’ या गाण्याने संपूर्ण भारत देशात मोठी धमाल केली होती. कुठलेही लग्न असो, कुठला ही सांस्कृतिक कार्यक्रम असो, कुठलेही ग्यादरिंग असो या गाण्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही! 

राजश्री प्रॉडक्शनचा ‘तराना’ हा चित्रपट १९८० साली आला होता. या चित्रपटातील सर्व गाणी उषा मंगेशकर यांनी गायलेली होती. यातील ‘सुलताना सुलताना मेरा नाम है सुलताना…’ या गाण्याने त्या काळात प्रचंड लोकप्रियता हासील केली होती.

हे जरी सर्व खरे असले तरी उषा मंगेशकर यांच्या स्वराचा खरा वापर हिंदी सिनेमात करता आला नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.

हिंदी सिनेमातील हा बॅकलॉग त्यांनी मराठीत भरून काढला. रामभाऊ कदमांकडे उषाताईंचा स्वर साठ आणि सत्तरच्या दशकात अनेक चित्रपटातून दिसला. विशेषत: लावणी या प्रांतात त्यांनी बाजी मारली. रामभाऊंकडील शंभरहून अधिक लावण्या उषाच्या स्वरात होत्या. शांताराम बापूंनी ज्या मराठी सिनेमाने सिनेमाच्या दुनियेत मोठे मन्वंतर घडवून आणले तो चित्रपट होता १९७२ साली प्रदर्शित झालेला ‘पिंजरा’ यातील सर्व लावण्या उषा मंगेशकरने आपल्या ठसकेबाज स्वरात गायल्या होत्या.

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, दिसला गं बाई दिसला, मला लागली कुणाची उचकी… या गाण्यांनी कहर दंगा केला!

राम भाऊ कदम यांच्या कडे उषाने गायलेल्या  कुण्या गावाचं आलं पाखरू,नाकात वाकडा नथीचा आकडा, मी नाही यायची शिनुमाला, एक हौस पुरवा महाराज, दिसला गं बाई दिसला, गोर्‍या गोर्‍या टाचत काटा रूतला, लाज लाजून मी गोरी मोरी झाले गं लावण्या अफाट गाजल्या. या शिवाय रूणझुणत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा, काय बाई सांगू कशी गं सांगू, गुज ओठांनी ओठांना सांगायचं एका पावसात, कल्पनेचा कुंचला, सख्या चला बागा मधी रंग खेळू चला, जीवन गाणे गातच रहावे, तुझ्या पंखावरूनी या मला तू दूर नेशील का, गोड गोजिरी लाज लाजरी हि चित्रपटातली गाणी गाजत होती.

उषाच्या स्वराची खरी भरजरी श्रीमंती भावगीत आणि भक्तीगीतातून दिसून येत होती. वेळ झाली भर माध्यान्ह माथ्यावर तळपे ऊन, केळीचे सुकले बाग ,जाऊ देवाचिया गावा घेवू तेथेचि विसावा,माझी रेणुका माऊली,कान्हू घेवून जाय, थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता, धुंदीत गंधीत होवून सजना,रचिल्या ऋशीमुनींनी या गाण्यातून उषाताई रसिकांना भेटत राहिल्या.

मराठी शिवाय अन्य प्रादेशिक भाषेतून त्यांनी भरपूर गायन केलयं.भूपेन हजारीका यांच्या संगीतात त्या असमी भाषेत गायल्या.पण खर्‍या उषाताई रंगल्या त्या चित्रकलेतच.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.