वेश्या म्हणून हिणवलं गेलं, पण त्याच सितारा देवी भारताच्या ‘कथ्थक क्वीन’ म्हणून नावाजल्या…
सितारा देवी भारताच्या नृत्य कलेतलं असं नाव जे कायमचं अजरामर झालं. आज जगभरात म्हणा किंवा भारतात म्हणा जिथं जिथं कथ्थक हा नृत्य प्रकार शिकवला जातो तिथं तिथं सितारा देवी यांचा फोटो असतो म्हणजे असतोच.
एखाद्या कलेवरचं प्रेम आणि त्या अनुषंगाने आयुष्याला मिळणारी कलाटणी काय काय उलथापालथ घडवू शकते याचं उदाहरण म्हणजे सितारा देवी.
बर एकतर आपल्याला कथ्थक हा नृत्य प्रकार एकदम अवघड वाटतो पण यातले जे अट्टल महापंडित आणि ज्यांचा कान तयार झालेला असतो असे प्रेक्षक आवडीने आणि बारकाईने हा नृत्य प्रकार पाहतात. परंपरा कायम ठेवण्यासाठी हा नृत्य प्रकार भारतीय कलाविश्व आणि साहित्यविश्वात महत्वाचा मानला जातो.
तर सितारा देवी यांना आपण पाहिलेलं नसलं, तरी त्या ग्रेट का आहेत हे सांगणारा त्यांचा जीवनपट आहे. तेही त्या काळात जेव्हा एखादी महिला कलेसाठी सर्वस्व पणाला लावते आणि समाज तिची फरपट करू पाहतो.
मुघल ए आजमचा दिग्दर्शक नुसत्या अदाकारीने वेडा झाला होता तर अंदाज लावा सितारा देवी यांचं प्रस्थ कसं वाढलं असेल.
सितारा देवी यांचं आयुष्य कसं होतं किंवा त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना काय होत्या ते पाहूया कारण सितारा देवी हे नाव जरी ऐकलं तरी भले भले कथ्थक नृत्य करणारे आदराने कानाला हात लावतात आणि मान खाली झुकवतात.
8 नोव्हेंबर 1920 साली कोलकातामध्ये सितारा देवी यांचा जन्म झाला. वडील सुखदेव महाराज हे त्या काळातले मोठे कथ्थक नृत्य करणारे कलाकार होते. घरात नृत्यमय वातावरण असल्याने संस्कारच तसे झाले होते.
सितारा देवी यांचं मूळ नाव धनलक्ष्मी असं होतं त्याच्यामागे कारण काय होतं तर सितारा देवी या धनत्रयोदशीच्या दिवशी जन्मल्या होत्या म्हणून धनलक्ष्मी नाव ठेवण्यात आलं पुढे ते लाडाने धन्नो झालं.
वडीलांनी सितारा देवी आणि त्यांच्या भावंडांना पूर्ण शिक्षण दिलं होतं पण त्याकाळी यावर बंधन होती आणि मुलींनी असं काही करणं म्हणजे पाप समजलं जायचं.
त्याकाळात मुलींचं लवकर लग्न लावून दिलं जायचं आणि तेच सेम घडलं सितारा देवी यांच्यासोबत.
सितारा देवी यांनी वडिलांना सांगितलं की मला शिकायचं आहे पण वडिलांनी लग्नाचं पक्कं केलं. पण इथ एक ट्विस्ट आला की आदल्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात सितारा देवी यांनी आपल्या अदाकारीने लोकांची मने जिंकली होती आणि सगळीकडे त्यांचीच चर्चा होती, मुलीची प्रगती बघून वडिलांना चांगलं वाटलं आणि त्यांनी शिक्षण पुढे चालू केलं आणि धनलक्ष्मी नाव बदलून सितारा देवी असं केलं.
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी व्यावसायिकरित्या सितारा देवी कथ्थक क्षेत्रात उतरल्या.
एकदा निरंजन शर्मा हे त्याकाळचे मोठे दिग्दर्शक सितारा देवी यांच्या घरी आले होते आणि एका सिनेमासाठी त्यांना बालकलाकार हवी होती तेही उत्तम नृत्य करणारी. सितारा देवी यांनी वडिलांच्या सांगण्यावरून निरंजन शर्मा यांना कथ्थक करून दाखवलं आणि हाच तो क्षण होता निरंजन शर्मा यांनी सितारा देवी यांना सिनेमासाठी सिलेक्ट केलं.
निरंजन शर्मा यांनी सितारा देवी यांना मुंबईला शूटिंगला बोलावलं तेव्हा बनारसच्या रेल्वे स्टेशन वर सगळा गाव उलटला होता कशासाठी तर सितारा देवी यांना निरोप देण्यासाठी. एखाद्या कलाकारावर आणि घराण्यावर लोकांचं किती प्रेम असू शकतो याचाच प्रत्यय म्हणजे ही घटना.
सिनेमा होता उषा हरण. सितारा देवी यांनी या सिनेमात अफाट काम केलं आणि लोकांची वाहवाही मिळवली. ही प्रसिध्दी इतकी मोठी होती की ठिकठिकाणाहून सितारा देवी यांना नृत्य सादर करण्यासाठी ऑफर येऊ लागल्या. मुंबईत या ऑफर आल्या खऱ्या पण तेव्हा कथ्थक नृत्य हे अजिबातच लोकप्रिय नव्हतं. एका कार्यक्रमाला तर रवींद्रनाथ टागोर आणि सरोजिनी नायडू उपस्थित होते त्या दोघांनीही सितारा देवी यांचं कौतुक केलं होतं.
एका बाजूला सितारा देवी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना काही लोकांनी त्यांच्यावर वेश्या म्हणून शिक्का मारला तर काहींनी त्यांचे शो बंद पाडले. स्त्रियांनी घरकाम करावं या मानसिकतेचा समाज होता. केवळ सितारा देवीच नाही तर त्यांच्यासोबत नृत्य करणाऱ्या महिलांनाही वेश्या म्हणून हिणवलं गेलं होतं.
अनेक आरोप लोकांनी त्यांच्यावर केले, पण सितारा देवींची कलेवर असलेली श्रध्दा अफाट होती. तेव्हा कथ्थक ही कला केवळ कोठ्यांवर सादर केली जायची पण सितारा देवी यांनी ती कला मोठ्या स्टेजवर आणली.
अलहीलाल, वतन और रोटी अशा जबरदस्त सिनेमात त्या झळकल्या. केवळ कथ्थक नाही तर भरतनाट्यम, लोकनृत्य आणि रशियन बॅले वर सुद्धा सितारा देवी यांचा अभ्यास होता. सिनेमांमध्ये सितारा देवी यांच्यावर जितके गाणे शूट झाले त्या प्रत्येक गाण्याच्या गायिका स्वतः सितारा देवी होत्या.
पद्मश्री पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता पण जेव्हा पद्मभूषण पुरस्कार त्यांना देण्यात आला तेव्हा सितारा देवी यांनी नकार दिला आणि सांगितलं की भारतरत्न सोडून दुसरा कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही म्हणून.
बऱ्याच लोकांच्या त्या गुरू झाल्या आणि हजारो शिष्य त्यांनी घडवले. वयाच्या 90 वर्षापर्यंत सितारा देवी नृत्य करत होत्या. 25 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांचं निधन झालं. पण सितारा देवी हे नाव अजरामर झालं. वेश्या म्हणून त्यांना हिणवलं गेलं, पण हार न मानता त्यांनी फक्त भारतातल्या घराघरांतच नाही, तर परदेशातही भारतीय नृत्यकला पोहचवली.
हे ही वाच भिडू :
- समाजाने बाहेर काढलं पण रामसहाय पांडेंनी बुंदेलखंडी लोकनृत्य सोडले नाही..
- आणि चक्क पंतप्रधान प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आदिवासींसोबत नृत्य करू लागल्या…
- महाराष्ट्रात शास्त्रीय नृत्यकलेचं बीज पं. रोहिणी भाटे यांनी रोवलं होतं…
- फक्त इंदिराजींना आदिवासी नृत्य दाखवण्यासाठी मराठवाड्यात विमानतळ तयार करण्यात आलं होतं…