नुसत्या वर्णनावर ते आरोपीचं स्केच काढतात ; त्यांच्यामुळे ४०० केसेस पोलिसांनी सोडवल्या आहेत..

काही व्यक्तींनी एक स्वप्न पाहिलं असतं. कधी घरच्या परिस्थितीमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे अशा व्यक्तींना स्वप्नाच्या दृष्टीने वाटचाल करता येत नाही. परंतु अशा व्यक्ती काही ना काही पर्याय शोधून डोळ्यांमध्ये जपलेल्या स्वप्नाच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतात.

ही कहाणी अशाच एका माणसाची.

या माणसाने पोलीस दला मध्ये जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं. परंतु काही कारणास्तव त्यांना हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही. तरीही गेली २५ वर्ष हा मराठी माणूस अनोख्या पद्धतीने पोलीस दलाची सेवा करत आहे. ही कहाणी नितीन महादेव यादव यांची..

कुर्ला येथील साबळे चाळीत नितीन यादव यांचं घर. त्यांना आसपासची माणसं पोलीस दलातले मानतात. नितीन यादव यांच्याकडे पोलिसांची कोणती वर्दी नाही. किंवा त्यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्वर सुद्धा नाही. तरीही शेजारी पाजारी त्यांचा पोलीस दलातील माणूस म्हणून आदराने उल्लेख करतात.

यामागचं कारण असं,

गेली २५ वर्ष नितीन यादव हे पोलिसांसाठी स्केच आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत. केवळ कागद, पेन्सिल आणि अंगभूत असणारी रेखाटनाची कला या जोरावर नितीन यादव मुंबई पोलिसांसाठी स्केच आर्टिस्ट म्हणून महत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. 

कौटुंबिक परिस्थिती 

नितीन यादव यांच्या कुटुंबाची आर्थिक अवस्था काहीशी डळमळीत होती. जेव्हा मुंबईत गिरणी कामगारांनी काम बंद आंदोलन केले तेव्हा नितीन यादव यांच्या घरावर या गोष्टीचा परिणाम झाला. नितीन यादव यांचे बाबा गिरणी कामगार होते. संपामुळे संपूर्ण यादव कुटुंबाला आर्थिक झळ बसली.

अशावेळी घराला आर्थिक हातभार लागावा म्हणून ७ वी मध्ये शिकत असताना नितीन छोटी मोठी कामं करू लागले. नितीनला लहानपणापासून स्केच रेखाटण्याची विशेष आवड होती. इयत्ता ४ थी पासून नितीन स्केच रेखाटू लागले. त्यांच्या वडिलांनी या गोष्टीत मुलाला खूप सपोर्ट केला.

नितीन ज्या काही गोष्टी काढायच्या त्या प्रत्येक कॅनव्हास वर वडील नितीनचं नाव लिहून तारीख लिहायचे. नितीन ची चित्रकला वडिलांनी एखाद्या खजिन्यासारखी जपली. ५ वी मध्ये असताना २० रुपयांच्या नोटेचं चित्र नितीनने हुबेहूब रेखाटलं होतं. 

अशी झाली सुरुवात

घरी परिस्थिती हलाखीची असल्याने नितीन रिक्षा चे नंबर प्लेट रंगवण्याचं काम करू लागले. यातून जे पैसे मिळायचे ते नितीन स्वतःच्या शिक्षणासाठी खर्च करायचे. याच काळात नितीन पोलीस चौकीत असलेले बोर्ड, अधिकाऱ्यांच्या नावाची प्लेट रंगवू लागले. त्यामुळे पोलिस दलातील अनेक ऑफिसर सोबत नितीन चा संपर्क वाढू लागला. 

ही गोष्ट १९८२ ची.

कुर्ला येथील प्रसिद्ध GSK हॉटेल मध्ये एका मर्डर ची केस आली. गुन्हेगार फरार झाला होता. या गुन्हेगाराला हॉटेल मधील केवळ एकाच वेटरने पाहिलं होतं. नितीन यादव त्यावेळी दहावीच्या बोर्डाला होते. नितीन यांचं त्या पोलीस चौकीवर येणं जाणं असायचं.

त्यांना हे प्रकरण कळलं. नितीनने आत्मविश्वासाने पोलिसांना सांगितलं,

“तुम्ही जर वेटरला बोलतं केलं तर वेटर जे वर्णन करतोय त्या आधारे मी आरोपीचं चित्र काढू शकेन.”

पोलिसांनी नितीन वर विश्वास ठेवला. नितीनने वेटरशी बोलून गुन्हेगारांचं चित्र काढलं. नितीनने रेखाटलेल्या चित्राच्या आधारे पोलिसांनी त्या गुन्हेगाराला ४८ तासांमध्ये गजाआड केलं. 

या घटनेनंतर नितीन यादव यांचं नाव सर्वदूर पसरलं.

नितीन यादव यांनी गेली २५ वर्ष अनेक महत्वाच्या केसेस मध्ये पोलिसांना सहकार्य केलं आहे. २०१३ च्या ऑगस्ट मध्ये शक्ती मिल बलात्कार प्रकरण, पुण्यातील जर्मन बेकरी मध्ये झालेला बॉम्बस्फोट, नरेंद्र दाभालकर यांचा खून अशा अनेक प्रकरणांमध्ये नितीन यादव यांनी स्केच काढून पोलिसांना मदत केली आहे.

मुंबईत २६/११ च्या हल्ल्यानंतर अजमल कसाब वर खटला सुरू होता. त्यावेळी फोटोग्राफर्सना कोर्टात जाण्यात बंदी होती. एका पत्रकाराने केलेलं वर्णन ऐकुन नितीन यादव यांनी कसाबचं चित्र रेखाटलं. पुढे हेच चित्र त्या काळात अनेक न्यूज पेपर मध्ये छापून येत होतं. 

एका मुलाखतीत आपल्या या अनोख्या कामाविषयी नितीन यादव म्हणाले,

“लहान असताना पोलिस होण्याचं माझं स्वप्न होतं. परंतु घरच्या परिस्थितीमुळे मला पोलीस दलात जाता आलं नाही. या कामामुळे मला माझं स्वप्न असं अनोख्या रीतीने पूर्ण करण्यात आलं.

जर मी पोलीस इन्स्पेक्टर असलो असतो तर मी जास्तीतजास्त १० – १२ केस सोडवल्या असत्या. आज पोलिसांसाठी स्केच आर्टिस्ट म्हणून काम करत असल्याने मी जवळपास ४००० स्केच काढले आहेत. या चित्रांच्या आधारे ४०० केसेस आज पोलिसांनी सोडवल्या आहेत.”

शेवटी भिडूंनो, नितीन यादव यांच्याविषयी एक विशेष गोष्ट अशी…

गेली २५ वर्षांहून अधिक ते पोलिसांसाठी स्केच आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत. परंतु या कामाचे त्यांनी आजवर कधीच पैसे घेतले नाहीत. चेंबूर येथील शाळेत नितीन चित्रकलेचे शिक्षक म्हणून काम करतात. पोलिसांसाठी हे काम करताना त्यांना अनेक अज्ञात व्यक्तींकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. कोणालाही न जुमानता नितीन यादव यांनी स्वतःचे काम सुरू ठेवले. आज मुंबई, पुणे, नाशिक अशा अनेक प्रमुख पोलीस स्टेशनमधील डायरी मध्ये नितीन यादव यांचा फोन नंबर रजिस्टर आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.