मनी हाईस्टपेक्षा वाढीव कांड मुंबईत झालेलं त्याचा हा खतरनाक किस्सा…

बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘स्पेशल 26’ ला जबरदस्त यश मिळालं होतं. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित होती. पण चित्रीकरणासाठी काही बदल करण्यात आले जे सहसा केले जातात. या चित्रपटात अक्षय कुमारने साकारलेली व्यक्तिरेखा त्याच्या खऱ्या नावाचा कोणताही पुरावा नाही. पण तपासात तो मोहन सिंग या नावाने ओळखला जात होता कारण त्याने छापेमारीत सीबीआय अधिकारी मोहन सिंग अशी ओळख दिली होती. या घटनेचे नाव ‘1987 ऑपेरा हाऊस हाईस्ट’ असे सरकारी कागदपत्रांमध्ये नोंदवल गेलं. त्याला ‘परफेक्ट क्राइम’ असही म्हणतात.

या घटनेची सुरुवात 17 मार्च 1987 रोजी झाली. एका नामांकित वृत्तपत्रात नोकरीची जाहिरात दिली गेली होती. त्यानुसार सुरक्षा अधिकारी म्हणून किंवा सीबीआय भरती म्हणून 50 ग्रॅज्युएट जागरूक पदवीधरांची गरज आहे आणि पात्र तरुणांना त्यांची कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचे फोटोही सोबत आणण्यास सांगितले होते. मुलाखतीचा पत्ता होता मुंबईचा प्रसिद्ध पंचतारांकित द ताजमहाल पॅलेस, कुलाबा.

18 मार्च 1987 रोजी मोठ्या संख्येने तरुण या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचले. इकडं तरुणांना मुलाखत शेजारच्या इमारतीत होणार असल्याचे सांगण्यात आले, तेथून सर्व तरुण दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. येथे प्रक्रिया सुरू झाली, काही तासांच्या खडतर प्रश्नांनंतर काही तरुणांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झाली. त्यानंतर या तरुणांनी स्वत:ला गुप्तचर अधिकारी म्हणून सांगणाऱ्या मोहन सिंग यांची भेट घेतली. चित्रपटात अक्षय कुमारने ही व्यक्तिरेखा साकारली होती.

मोहन सिंग हे अगदी अधिकाऱ्यांसारखे वागत होते. प्रत्येकाची फायनल मुलाखत झाली आणि शेवटी 26 जणांची निवड झाली. सर्वांना स्पेशल 26 असे सांगून दुसऱ्याच दिवशी छापे टाकण्याचे प्रशिक्षण दिल्याचे सांगण्यात आले. यानंतर या २६ जणांना पुन्हा हॉटेल ताज कॉन्टिनेंटलमध्ये बोलावलं गेलं. तिथे मोहन सिंग यांनी निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन करत एजन्सी कशी काम करते, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्यांच्या कामात कोणत्या प्रकारचे धोके आहेत हे सांगितले. यामध्ये मोहन सिंग यांनी सर्वांना सांगितले की, तुम्हा सर्वांना सकाळच्या टाकल्या जाणाऱ्या छाप्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.

19 मार्च रोजी सकाळी पुन्हा सर्वांना बोलावण्यात आले. सर्व निवडक तरुण वेळेवर हॉटेलवर पोहोचले. येथे सर्वांना कार्ड देण्यात आले. या कार्डावर गुन्हे अन्वेषण शाखेचे ( क्राईम ब्रँच ऑफ इन्वेस्टीगेशन ) नाव लिहिले होते. यानंतर लक्झरी बस बुक करण्यात आली. त्यात सर्व तरुणांना घेऊन मोहनसिंग दरोडा टाकण्यासाठी निघाला.

दुपारी अडीचच्या सुमारास ही टीम मुंबईतील प्रसिद्ध त्रिभुवन दास भीमजी झवेरी अँड सन्सच्या ऑपेरा हाऊस शाखेत पोहोचली. मोहन सिंग यांनी येथील दुकानाचे मालक प्रताप जवेरी ( सराफ ) यांना सर्च वॉरंट दाखवले आणि सांगितले की, तुमच्याविरुद्ध सोन्यात भेसळीची तक्रार आली आहे. प्रताप झवेरी यांनी पूर्ण खात्री झाल्यानंतर छाप्याला परवानगी दिली. परवानगी मिळताच मोहन सिंगने परवाना असलेली पिस्तुल ताब्यात घेतली, शटर खाली पाडले आणि कॅमेरे बंद केले. आणि येथून कोणीही बाहेर जाणार नाही, अशा सक्त सूचना दिल्या.

सुमारे 45 मिनिटे आरामात सर्व वस्तू गोळा केल्या गेल्या. सर्व दागिने वेगळ्या पॉली बॅगमध्ये व्यवस्थित पॅक केले गेले. त्यात सरकारी शिक्का मारून ते गायब झाले. शोरूममधून बाहेर पडल्यानंतर मोहन सिंगने सर्व तरुणांना बसमध्ये थांबण्यास सांगितले आणि मी कारवाईसाठी शेजारच्या दुकानात जात असल्याचे सांगितले. तिथून आल्यानंतर सर्वजण एकत्र पुढच्या कारवाईसाठी निघतील असंही सांगण्यात आलं.

काही वेळाने झवेरी यांना संशय आला, त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि सीबीआय अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोनं घेऊन निघून गेल्याच सांगितले. पोलिसांनाही संशय आला, जेव्हा ते दुकानात पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की दुकानासमोरील बसमध्ये 26 तरुण आहेत, जे सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत आहेत. चौकशीत संपूर्ण प्रकरण समोर आले, पोलीस तात्काळ त्या हॉटेलमध्ये पोहोचले पण तोपर्यंत मोहन सिंग कोणाला काही कळायच्या आत तिथून गायब झाला होता.

अत्यंत हुशार, दबंग आणि भाषेत दक्षिण भारताचा प्रभाव, एवढे मुद्दे सोडून मोहन सिंग बद्दल पोलिसांना काहीच माहिती नव्हती. काही गोष्टींच्या संशयाच्या आधारे पोलिसांनी केरळमधील एका व्यक्तीला अटक केली पण त्यालाही सोडून द्यावे लागले. एक टीम दुबईला पाठवली होता पण तीही रिकाम्या हाताने परतली. या घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी अरविंद इनामदार यांना आपण या दरोड्याचा पर्दाफाश करू शकलो नाही याची खंत आहे, त्यांनी सांगितल होतं की, जर आपण त्या आरोपी मोहन सिंगला पकडले तर त्याने एवढा परफेक्ट प्लॅन कसा केला याबद्दल नक्की विचारील.

हा किस्सा मुंबईत आणि भारतभर गाजला. असेही करामती लोकं भारतात आहेत ज्यांच्यासमोर मनी हाईस्ट किरकोळ आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.