गुलीगत या एका शब्दावर सूरज चव्हाणने ११ लाख फाॅलोअर्स गोळा केलेत.

#कस_गुलीगत

भावड्यांनो हा जो वरती गुलीगत शब्द लिहलाय ना तो लय फेमस झालाय. मागचं वर्ष सरलं तेव्हा मी पुन्हा येईल हा शब्द फेमस झालेला.

आम्हाला ठाम विश्वास होता की एखादा शब्द फेमस करायचा असला तर त्यासाठी किमान मुख्यमंत्री तरी पाहीजे. गेला बाजार एखादा आमदार असले तरी शब्द फेमस करता येईल. पण एका टिकटाॅक स्टारने आमचं हे गृहितक फाट्यावर मारून संपूर्ण राज्याला दाखवून दिलं की गुलीगत कोणपण फेमस होवू शकतय.

आत्ता जे या सगळ्या राड्यात कुठेच नसतात त्यांच्यासाठी एका वेगळ्या जगाची माहिती करून देतो.

टिकटाॅक नावाचं एक समांतर जग आहे. तिथले सेलिब्रिटी, तिथली भांडणं ही वेगळीच दूनियादारी असते. म्हणजे तुम्ही सत्यशिल शेरकर आणि अक्षय बोऱ्हाडे या वादात असाल पण तुम्हाला पुणेकर ट्रिपल नाईन विरुद्ध सातपुते मॅडमची भांडण माहित नसतील तर तो तुमच्या आयुष्याचा सगळ्यात मोठ्ठा फाॅल आहे.

तर याच समांतर जगातला अर्थात टिकटाॅकचा राजा माणूस म्हणजे सुरज चव्हाण.

सुरज चव्हाण काय करतो, तर तो टिकटाॅक व्हिडीओ करतो. बाकी तो काहीही करत नाही. मध्यंतरी त्याला कुठल्यातरी कंपनीत कोणीतरी कामाला लावणार असल्याचं समजलं होतं पण त्यांचे दिवसाला दहा च्या सरासरीने व्हिडीओ पाहता तो कुठे काम करत असण्याची दूरदूरची शक्यता नाहीए.

सूरज चव्हाण हा आठवी पास व्यक्ती. निरागस, भोळाभाबडा, चौकट राजा, अल्लड अशी जी जी विशेषण असतील ती सर्व विशेषणे याला लागू होतात.

तो टिकटाॅक व्हिडीओ करतो. मुळात बोबडा असल्याने त्याचे सर्व डाॅयलाॅग गुलीगत असतात. तेलेंन्ट म्हणजे टेलेन्ट. जुम्मे की लात हैं डाटाडाटाडा सारखी गाणी तो फावल्या वेळात म्हणतो. ललालीलाला ला ला ला हे देखील तितकच फेमस आहे.

विशेष म्हणजे तो ही गाणी विथ म्युझिक म्हणून दाखवतो. आत्ता यात विशेष वाटत नसेल तर पुढचं सांगतो, तो डिजे अनिकेत, डिजे सौरभ अशाप्रकारे लिरिक्स गाण्यात आलेले शब्द देखील म्हणून दाखवतो.

सूरज चव्हाण बारामती तालुक्यातला मोढवे गावचा आहे. त्याला पाच बहिणी आहेत. आई वडिल वारल्यामुळे तो आपल्या बहिणीकडे राहतो. तो आठवी शिकला आहे. आणि त्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. ही झाली त्याच्याबद्दल सर्वसामान्य माहिती.

आत्ता त्याने व्हिडीओ करायला कशी सुरवात केली याबद्दल वेगवेगळ्या दंतकथा आहेत. पण खरी गोष्ट म्हणजे त्याच्या भाच्याने त्याचा व्हिडीओ केला. तो फेमस झाला. त्यानंतर हा कामाला जावू लागला.

पाट्या भरल्या दिवसाला ३०० रुपये हजरी गोळा केली आणि मोबाईल घेतला.

त्यानंतर गडी गुलीगत सुटला. आत्ता त्याला थांबवण अशक्य झालंय. तो कुणाच्या बापाचं ऐकत असण्याची देखील दूरदूरपर्यन्त शक्यता नाही.

आत्ता तुम्ही म्हणाल या गुलीगत माहितचं आम्ही काय करायचं. तर भावांनो काहीच करायचं नाही. कारण हे आम्ही का लिहलं ते आम्हालापण माहीत नाही.

#कस_गुलीगत #ब्रॅण्ड_इज_ब्रॅण्ड
#ललालीलाला_लाला_ला

Leave A Reply

Your email address will not be published.