अर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो होता

२०१४ च्या अगोदरचा काळ. मोदी गुजरातच्या बाहेर नव्हते. अडवाणींच्या नेतृत्वात विरोधी पक्ष काम करुन थकलेला होता. कॉंग्रेसला पर्याय नाही हेच वातावरण होतं. पुढचे वीस वर्ष तरी कॉंग्रेस जात नसतं यावर लोकं ठाम होती.

मोदींना देखील आपण सत्तेत येऊ अस वाटतं नव्हतं अशा काळात एक माणूस मात्र हिंदूत्त्ववाद सत्तेत येणार आणि भारत हिंदूराष्ट्र होणार या गोष्टीवर ठाम होता.

बिझनेस असो वा राजकारण खिश्यात रुपाया असताना २०० कोटींचा कॉन्फिडन्स असणारा हा माणूस म्हणजे,

शिर्डीचे सुरेश चव्हाणके !!!

प्रसंग दूसरा, अण्णा हजारेंच आंदोलन सुरू झालं. नॅशनल मिडीया म्हणावा तसा हे आंदोलन कव्हर करत नव्हता. तेव्हा अण्णांचा आंदोलन कुठल्या चॅनेलवर दाखवायला लागलेत म्हणून माणसांनी हिंदी चॅनेल सर्च करायला सुरवात केली आणि चोवीस तास अण्णा दाखवणारा चॅनेल लोकांना सापडला.

तो चॅनेल म्हणजे सुदर्शन न्यूज.

आज गोदी मिडीया म्हणून मिडीयाचा उल्लेख केला जातो. प्रोपोगंडाची भाषा समजावून सांगितली जाते. झी न्यूज पासून ABP पर्यन्त प्रत्येक चॅनेल मोदींच्या फेवरमधला आहे म्हणून टिका केली जाते. खरं सांगायचे तर मिडाया फक्त सत्ताधाऱ्यांच्या बाजूने अधिक असतो. अशा वेळी विरोधाचं राजकारण करणं अवघड जात असतं. अशा वेळी सुदर्शन न्यूज हा एकमेव चॅनेल अजेंडा सेट करायच्या नादाला लागला होता.

सुरेश चव्हाणके शिर्डीचा माणूस कसा झाला नॅशनल स्टार.. ?

सुरेश चव्हाणके अस्सल मराठी माणूस. बऱ्याच जणांना त्यांच आजचं हिंदी ऐकून ते मराठी असतील अस वाटत नाही. पण गावची भावकी जपणारा हा माणूस. नगर जिल्ह्यात असणारे पाहूणेरावळे आजही जपणारं हे व्यक्तिमत्व.

त्यांचे वडिल शिर्डीच्या लक्ष्मीनगरमध्ये राहणारे. वडिल धार्मिक मनोवृत्तीचे. त्यांचा लायटिंगचा व्यवसाय होता अस सांगितलं जातं. घरची परिस्थिती म्हणावी इतकी गरिबीची देखील नव्हती. दोन वेळचं खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या मिडल क्लास मधलं हे कुटूंब. त्यांचे वडील जनार्धन स्वामी आश्रमांचे ट्रस्टी असल्याचं सांगण्यात येत.

अशा या कुटूंबातला सुरेश चव्हाणके हा पोरगा.

शिक्षणाच्या बाबतीत लॉ पर्यन्त शिक्षण पूर्ण केल्याचं सांगण्यात येत. तर झालं अस की जेव्हा मोबाईल क्रांन्ती होऊ लागली तेव्हा या माणसाला मोबाईलचं महत्व कळालं. त्या काळात मोबाईल नवीन गोष्ट असताना नाशिक जिल्ह्यात त्यांनी BPL ची एजेंन्सी घेतली.

या काळाच चार पैसे हाताला आले आणि पोराचं नाव होऊ लागलं. लहानपणापासून संघाचा प्रभाव असल्याचं खुद्द सुरेश चव्हाणके सांगत असले तरी कॉलेजच्या जीवनापासून ABVP सोबत त्यांचा संपर्क वाढला. या काळात राजेश पांडे, विनोद तावडे, शाम जाजू यांच्यासारखी माणसे त्यांची मित्र झाली. धार्मिक असणारा हा माणूस पहिल्यापासूनच हिंदूत्वाचा नारा देणाऱ्यातला होता.

अशातूनच हिंदूत्ववादी मिडीया असावं हा निर्धार झाला.

यातूनचं पुढे मराठीतलं पहिलं पोर्टल बातमी डॉट कॉम सुरू करण्यात आलं. हे पोर्टल पुण्यातून सुरू झालं. २००२ चा तो काळ होता. विचार करा आज आपण पोत्याने पोर्टल पाहतोय. पण तेव्हा सकाळ, लोकसत्ता सारखी माध्यमे देखील पोर्टलचा विचार करत नव्हती तेव्हा त्यांनी फक्त पोर्टलचा बिझनेस सुरू केलेला.

त्यानंतर मिडीया ही एक डायरेक्टशन पक्की झाली. कालांतरातच तत्कालीन केंद्रीय मंत्री एम.के. अण्णा पाटील, चंद्रकांत खैरे यांच्यासोबत संबंध प्रस्थापित झाले. दूसरीकडे शांतीगिरी महाराज यांच्यासोबत गुरू शिष्य हे नातं पक्क होत गेलेल.

सुदर्शन चॅनेल नावाचा पाया पुण्यातच रचण्यात आला.

पुण्यातून काहीजणांची टिम हे काम पाहू लागली. चोवीस तास हिंदी चॅनेलचा जोर वाढू लागलेला.  अशा वेळी चोवीस तास न्यूज म्हणून सुदर्शन पाऊले टाकू लागलेलं.

याच दरम्यानच्या काळात नाशिकचा कुंभमेळा आला. २००३ साली सुरू झालेला कुंभमेळा वर्षभर कार्यक्रमांनी गाजत होता. तेव्हा विश्व सांधुसंत नावाचा एक कार्यक्रम घेण्याचा प्रयोग सुरेश चव्हाणके यांनी घेतला. त्यासाठी भलमोठ्ठ स्टेज टाकून चॅनेल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

सुरेश चव्हाणके यांच्या दिल्लीच्या वाऱ्या वाढू लागल्या. मिडीयाची भाषा काही नवीन नेत्यांच्या पचनी पडल्याने त्यांनीही सुदर्शन न्यूजला सपोर्ट करण्यास सुरवात केली. काऊ बेल्टमधून योग्य ती रसद पुरवण्यात आल्याचं सांगण्यात आलं, आणि पुण्याचा हा चॅनेल २००५ सालातच दिल्लीला शिफ्ट झाला.

दिल्लीच्या दुनियेत कुठल्यातरी कोपऱ्यात जाऊन पत्रकारिता करावी अस मॉडेल कधीच नव्हतं. एक मेन स्ट्रीम चॅनेल म्हणूनच सुदर्शन मार्केटमध्ये उतरला. इंडिया टिव्हीच्या शेजारीच ऑफिस घेण्यात आलं. पैशाचं बोलायचं झालं तर देशात पहिल्यांदा फ्रन्चायझी सिस्टीमने पैसे गोळा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. तालुक्याच्या ठिकाणी चॅनेलची फ्रन्चायझी घ्यायची अस ते मॉडेल होतं. मॉडेल फेल झालं पण पैसे टिकले हेच काय ते गणित.

२००६ साली चॅनेल ऑन एअर करण्यात आला, आणि देशभरात हिंदूत्वाचा जोर सुरु झाला.

देव देश आणि धर्म, भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन, म्हणजे सुदर्शन

चॅनेल सुरू होताच संबंध वाढले. अजेंडा फिक्स असल्याने संघापासून भाजपर्यन्त उठबस सुरू झाली. अस सांगतात की त्या काळात संपूर्ण भारतभर ढोक महाराजांचे किर्तन लाईव्ह करण्यात आले होते. ते ही मराठीतून.

मोदी तेव्हा दिल्लीत नवीन होते. सुरेश यांच्या घरात राबता असणाऱ्या मंडळीत मोदी देखील असायचे. मोदी, जोशी, अडवाणी अशी मंडळी घरची झाल्यासारखी झाली होती. आपल्या विरोधी पक्षाच्या राजकारणाला आवाज देणारा एकतरी हक्काचा चॅनेल आहे म्हणून सुदर्शन नाव कमावू लागला.

जेव्हा अण्णा हजारेंच आंदोलन सुरू झालं तेव्हा सुदर्शन न्यूज TRP च्या आकड्यात मेनस्ट्रीममध्ये जाऊन बसला तो कायमचा. त्यानंतर थेट हिंदूत्ववादी भूमिका घेणं, तलवार नाचवणं असले उद्योग सुरू झाले.

एक किस्सा सांगायचा झाला तर १३ एप्रिल २०१७ चा.

लखनौ पोलीसांनी त्यांना अटक केली. आपल्या चॅनेलवरून संभलला जाऊन जल चढवण्याचं त्यांनी आवाहन दिलं होतं. या विरोधात कॉंग्रेस नेता इतरत हुसैन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. धार्मिक भावना भडकावणं, दोन धर्मात वितुष्ट निर्माण करणं आणि चॅनेलच्या माध्यमातून अफवा पसरवण्यावरून त्यांना अटक करण्यात आली.

देशाच्या इतिहासात एका चॅनेलच्या संपादकाला सांप्रदायिकतेच्या आरोपाखाली अटक करण्याची ही पहिली घटना होती. फक्त बोलणारा संपादक नाही तर करणारा संपादक म्हणून त्यांच नाव होऊ लागलं. नार्थ बेल्टमध्ये स्वत:च अस्तित्व निर्माण करण्यात या माणूस यशस्वी ठरला.

सुरेश चव्हाणके यांच बोलणं, त्यांचे विचार, त्यांचे निष्ठा, माध्यमातून एखादा विशिष्ट विचार पसरवण्याचे उद्योग हे सगळं एका बाजूला ठेऊन एक बिझनेसमॅन म्हणून बघायचं झालं तर हा माणूस शंभर टक्के ग्रेट माणसांच्या प्रकारात मोडतो.

खिश्यात रुपाया नसताना २०० कोटींच्या चॅनेलचं स्वप्न पहाणं, ते करुन दाखवणं आणि जिथे मराठी माणसाला राजकारण करणं जमत नाही अशा नॉर्थ बेल्टमध्ये सक्सेसफुल होणं याहून अधिक काय पाहीजे.. !

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Ninad Joshi says

    भिकारी डोक्याचा माणूस आहे, विचार भिकारी नाहीत तर वागणूकही भिकार आहे. २००कोटी रुपयांचं चॅनेल सुरू केलं म्हणजे तो काही फार प्रगल्भ म्हणता येत नाही. चाटुकारिता करून त्याने हर केलं याला कौशल्य नाही म्हणता येत, तर याला निव्वळ चमचेगिरी म्हणतात. आणि बोल भिडू हे सर्वांसमोर कौतुकाने मांडतो म्हणजे तू त्यापेक्षा जास्त भिकार आहेस…

Leave A Reply

Your email address will not be published.