नेपोलियन पेक्षाही पराक्रमी असणाऱ्या राजानं जगाला भारताचं सुवर्णयुग दाखवलं

सम्राट समुद्रगुप्त हा गुप्त वंशाचा दुसरा राजा होता. ‘भारताचा नेपोलियन’ म्हटला जाणारा हा शासक देशातील ‘सुवर्णयुगाचा’ जनक मानला जातो.

देशातील चलनात त्याची महत्त्वाची भूमिका मानली जाते. त्याने आपल्या कारकिर्दीत तांब्यापासून सोन्यापर्यंत चलन सुरू केले. त्याने आपल्या कारकिर्दीत प्रामुख्याने सात प्रकारची नाणी सुरू केली, जी नंतर आर्चर, बैकल एक्स, अश्वमेध, टायगर स्लेअर, राजा आणि राणी आणि लैस्टर म्हणून ओळखली जाऊ लागली.

समुद्रगुप्ताने आपल्या कौशल्याने संपूर्ण भारत जिंकला होता आणि तो कधीही युद्धात हरला नाही. यामुळे ब्रिटिश इतिहासकार व्ही.ए. स्मिथने त्याला ‘भारताचा नेपोलियन’ म्हटले होते.

भारतातील मौर्यकालीन अधोगतीनंतर अनेक राज्ये उदयास आली आणि पडली. आपल्या साम्राज्यवादी आकांक्षा पूर्ण करण्यासाठी राज्यकर्त्यांनी बरेच प्रयत्न केले, परंतु कोणीही मौर्यांच्या जवळ जाऊ शकले नाही. तथापि, इसवी सनाच्या चौथ्या आणि सहाव्या शतकाच्या दरम्यान, गुप्त घराण्याने भौगोलिक विस्तार आणि राज्यकारभारात मौर्यांपेक्षा जास्त यश मिळवले होते. गुप्त घराण्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसली तरी अनेक इतिहासकार लोकांनी लोकसाहित्य प्रकारातून त्यांच्या विविध छटा लोकांसमोर आणल्या.

सम्राट समुद्रगुप्ताने सुरू केलेले सोन्याचे नाणे

तज्ञांचा असा विश्वास आहे की हे वंशज बहुधा श्रीमंत जमीनदारांचे कुटुंब होते, ज्यांचा प्रभाव मगधमध्ये हळूहळू वाढला आणि चंद्रगुप्त पहिला 319-20 च्या काळामध्ये पहिला शासक बनला. आपला प्रभाव वाढवण्यासाठी त्याने शक्तिशाली लिच्छवी घराण्यातील कुमारदेवीशी लग्न केले. चंद्रगुप्त पहिला आणि कुमारदेवी यांनी एका मुलाला जन्म दिला, त्याचे नाव समुद्रगुप्त होते. समुद्रगुप्ताची बुद्धी अतिशय तीक्ष्ण होती आणि त्याच्यात राजाचे सर्व गुण होते. त्यानंतर, चंद्रगुप्त प्रथमने त्याला इसवी सन 335 मध्ये त्याचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. पण, त्याचा निर्णय त्याच्या भावांना मान्य नव्हता. त्यामुळे समुद्रगुप्ताच्या भावांनी त्याच्याविरुद्ध युद्ध पुकारले. पण समुद्रगुप्ताने त्यांचा पराभव केला.

सत्ता हाती घेतल्यानंतर, समुद्रगुप्ताला असे साम्राज्य हवे होते ज्याचे संपूर्ण नियंत्रण गुप्त घराण्याची राजधानी पाटलीपुत्र येथे असेल आणि येथून संपूर्ण भारतीय उपखंड नियंत्रित करता येईल. अशा प्रकारे समुद्रगुप्त मौर्यांच्या हेतूंचा पुनरुच्चार करत होता. समुद्रगुप्ताने उत्तरेकडील हिमालयापर्यंतचे सर्व राज्ये जिंकली , दक्षिण-पूर्वेकडील राज्यकर्त्यांना त्याच्या राज्यात सामील होण्यास भाग पाडले. त्याचे सैन्य कांचीपुरमपर्यंत प्रभावी होते असे मानले जाते.

समुद्रगुप्तने आर्यावर्त येथे आपल्या नऊ विरोधकांना चिरडले आणि मध्य भारतापासून संपूर्ण दख्खनपर्यंतच्या कुळ सरदारांना कर भरण्यास भाग पाडले. त्याची वृत्ती पूर्वेकडेही तशीच राहिली आणि त्याने पश्चिमेकडील नऊ राज्येही गुप्त वंशात विलीन केली. एवढेच नाही तर समुद्रगुप्ताने देवपुत्र शाहनुशाही म्हणजेच कुशाण, शक आणि श्रीलंकेच्या राजांनाही कर भरण्यास भाग पाडले. मालदीव आणि अंदमानमध्येही त्याचा प्रभाव असल्याचे मानले जाते.

समुद्रगुप्ताने सुमारे 40 वर्षे राज्य केले. पण त्याला फक्त युद्ध आणि विजयाचीच तळमळ होती असे नाही. त्याला संगीताची खूप आवड होती आणि त्याने सुरू केलेल्या अनेक नाण्यांमध्ये वीणा वाजवताना दाखवण्यात आले आहे. संस्कृत कवी आणि प्रयाग प्रशस्तीचे लेखक हरिशेन हे त्यांच्या दरबारात काम करायचे, ते त्यांचे महत्त्वाचे मंत्रीही होते. समुद्रगुप्तानेही धर्म, साहित्य आणि कलेचा भरपूर प्रचार केला आणि सर्व धर्म आणि जातींशी एकता राखली. असे मानले जाते की श्रीलंकेचा राजा मेघवर्मन याने त्याच्याकडे बोधगया येथे बौद्ध विहार बांधण्याची परवानगी मागितली होती आणि त्याने हो म्हटले होते. आज इतिहासात त्याचे उदाहरण म्हणून पाहिले जाते. समुद्रगुप्ताने, त्याच्या लष्करी मोहिमेद्वारे, प्रवासाची सोय सुलभ केली. त्यामुळे भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात माल सहज पोहोचू शकतो.

यामुळे लोकांचे राहणीमान खूप उंच होते आणि त्यांच्याकडे चांगल्या अन्नाशिवाय चांगले कपडे, हिरे, दागिने अशी सर्व चैनीची साधने होती. या सुविधा केवळ वरच्या वर्गापुरत्याच मर्यादित होत्या असे नाही. पुरातत्त्व अभ्यासक म्हणतात की उत्खननात सापडलेल्या मातीची भांडी, तांबे आणि लोखंडी वस्तूंवरून असे दिसून येते की शुद्र किंवा ग्रामस्थ, सर्व त्यांच्या कारकिर्दीत सगळेच खूप समृद्ध होते.

समुद्रगुप्ताने आपले साम्राज्य उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत विस्तारले. छोटी-मोठी राज्ये जिंकून त्याने अखंड भारताची स्थापना केली. समुद्रगुप्ताचा शासनकाळ राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. समुद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा चंद्रगुप्त दुसरा याने गुप्त साम्राज्याचा ताबा घेतला. इतिहासात त्याला ‘विक्रमादित्य’ म्हणून ओळखले जाते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.