पुण्याच्या मावळपासून सुरू झालेली “टाटा पॉवर” आज जगभरात वीज पुरवते
जगात नुकतीच पाण्यापासून वीजनिर्मिती करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. १८८२ साली फॉक्स नदीवर २०० किलो व्हॅट क्षमतेचा प्रकल्प नुकताच सुरु झाला होता. मात्र जमशेदजी टाटांच्या मनात १८७५ पासूनच आपल्या एम्प्रेस मिलसाठीची वीज जलविद्युत उर्जेने बनायला हवी ही इच्छा रेंगाळत होती.
१८९७ साली दार्जिलिंग जवळच्या भागात चहाच्या वसाहतीला योग्य विजेचा पुरवठा व्हावा यासाठी ब्रिटीश सरकारने इथल्या एका धबधब्यावर टर्बाईन बसवून हा प्रकल्प सुरु केला.
तेव्हा मुंबईतही काळोखाचे साम्राज्य होते. तिला वीज पुरवठा करणारी कंपनी इंग्लंडची ‘ब्रश इलेक्ट्रिक कंपनी ऑफ लंडन’ ही भारतीय व्यवसायांसाठी वीज पुरवायला नाखूष असे. मुंबईत ट्राम पासून ते सर्वच उद्योगांना हीच एकटी कंपनी वीजपुरवठा करत असे.
एव्हाना टाटांच्या ताज हॉटेलमध्ये वीज देण्यासाठीही ह्या कंपनीने दिरंगाई केली होती.
मुंबई ब्रिटीशांच्या काळात गिरणी उद्योगाचे केंद्र बनली होती आणि सगळ्या शहरात गिरण्या सुरु झाल्या होत्या. दिवसभर हे शहर त्यांच्या आवाजाने आणि त्यासाठी लागणाऱ्या बॉयलरच्या धुराने काळवंडून जात असे.
दुसऱ्या देशातून येऊन मुंबईला आपले घर बनवणाऱ्या पारशी लोकांचे म्होरके म्हणजे जमशेदजी टाटा. त्यांनी आपल्या उद्योगातून देशाच्या आणि मुंबईच्या भविष्याची पायाभरणी केली होती. बंगलोरला सुरु केलेलं “इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स असुदे कि मग पहिल्यांदा उभारलेली स्वदेशी गिरणी- त्यांनी आपल्या व्यवसायाचा आणि समाजकार्याचा भाग कधीही वेगळा करून पाहिला नाही.
वेगाने वाढत चाललेल्या मुंबईला तेव्हा विजेची समस्या भेडसावत होती.
येथे कोळश्यावर चालणारे केंद्र उभारायचे म्हणजे ह्या प्रदूषणात अजूनच भर पडली असती. मुंबई आणि गोव्यातील दुधसागर धबधब्यावर (चेन्नई एक्सप्रेस पिच्चरचं शुटींग झालं तोच) हा जलविद्युत प्लांट बसवावा असं त्यांच्या मनात होतं.
ह्या कामी त्यांनी आपले इंजिनियर डेव्हिड घोस्टलिंग अन रोबर्ट मिलर यांचाही सल्ला घेतला होता. पण त्याला अडचण होती ती म्हणजे शेजारच्या पोर्तुगीजांची. त्यामुळे हा प्रकल्प असाच बारगळला होता.
एकदा जमशेदजी आणि घोस्टलिंग साहेब सुट्टीसाठी लोणावळ्यात गेले असताना तेथील पाण्याचा साठा पाहून त्यांना हि कल्पना सुचली कि ह्या पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती करता येईल का?
त्यापूर्वी केवळ धबधबे आणि मोठमोठ्या जलाशयात जलविद्युत निर्मितीचे प्रकल्प चालत असत. खोपोलीमध्ये असणारे पाणी म्हणजे एक नदीच होती. ह्या नदीपासून वीज बनवणे हे जिकीरीचे काम होते. मात्र जमेशेद्जी यांनी हे आव्हान स्वीकारले आणि योजना बनवायला सुरुवात केली.
कोकणच्या घाटांचे वैशिष्ट्य म्हणजे घाटमाथ्यावरून पुढे जाताना लागणारा तीव्र उतार.
हा घाट मुंबईपासून १८०० फुट इतक्या उंचावर आहे. ह्या उतारावरून हे पाणी खाली गेले तर त्याला पुरेशी गती मिळणे शक्य होते. त्यांनी साधनांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली व आपली कल्पना माडली ज्यातून मुंबईच्या विजेचा प्रश्न सुटणार होता, शहरात पाण्याची उपलब्धता वाढणार होती आणि हि उर्जा पूर्णपणे नैसर्गिक असणार होती.
खुल्या प्रवाहापेक्षा ह्याला नैसर्गिक उताराचा वापर करून मुंबईत उतरवण्याची योजना आखली गेली. मात्र हि बनवलेली उर्जा तब्बल ५० किलोमीटर दूर मुंबईत न्यावी लागणार होती. त्या काळात इतक्या दूरवर वीज नेणारी लाईन कुठेही नव्हती.
त्यांनी ह्यासाठी मोठमोठ्या आकाराचे पाईप अंथरण्याची आणि पाण्याचा प्रवाह नंतर खोपोलीच्या दरीत सोडून त्याद्वारे टर्बाईन चालवले जाणार होते.
याकामी त्यांना दोन देशांच्या सरकारशी बोलणी करावी लागली. प्रकल्पाचा काही हिस्सा गोव्याच्या पोर्तुगीज सरकारच्या सीमेला लागून होता आणि ब्रिटीश सरकारहि ह्या योजनेसाठी जास्त उत्सुक नव्हते. ह्या कामाची जुळवाजुळव करताना तर सुरुवातीला त्यांनी सरकारी अडथळा येऊ नये म्हणून काही बाबी गुप्तच ठेवल्या होत्या.
आपल्या इंजिनिअर रिची ह्यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारात त्यांनी म्हटले आहे,
की
“ह्या दरीमध्ये कुणी माणूस तळे बांधायचा विचार करेल आणि त्याची वीज बनवेल हे सरकारला समजलं तरी त्यांना खरे वाटणार नाही”.
इंग्लंडच्या दौऱ्याहून आल्यानंतर त्यांना ह्या कामाविषयी ठाम विश्वास वाटू लागला आणि त्यांनी मुंबईच्या गव्हर्नरकडे ह्याबाबत परवानगी मागितली. त्यांचे मित्र हैमिल्टन यांहीही त्यासाठी शिफारस केली. नव्या गव्हर्नर साहेब लॉर्ड नॉर्थकोट यांनी ह्या कामाला संमती दिली आणि ह्या प्रकल्पाला सरतेशेवटी सुरुवात झाली.
मात्र हि योजना पूर्णत्वास येत असतानाच १९०४ साली जमशेदजी टाटांचे निधन झाले.
अजून नवी कंपनी तयारही झाली नव्हती. गव्हर्नर साहेब लॉर्ड नॉर्थकोट यांचीही बदली झाली आणि नव्या गव्हर्नर साहेबांची तेथे नियुक्ती करण्यात आली. आता सरकारकडून जास्त मदत मिळण्याची शक्यताही नव्हती मात्र त्यांच्या दोन्ही मुलांनी दोराब आणि रतन (आताचे नव्हे) यांनी ही योजना पूर्णत्वास नेण्याचे ठरवले.
दोराब यांनी भारतातील जवळपास प्रत्येक प्रांतात जाऊन आपली योजना मांडली आणि त्यासाठी नवनवे गुंतवणूकदार शोधले. शेवटी टाटा पॉवर कंपनी सुरु झाली आणि ह्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये फक्त एकजण वगळता सर्व लोक भारतीय होते. त्या काळाच्या दृष्टीने हि मोठी झेप होती.
नोव्हेंबर १९१० पर्यंत हे सर्व सोपस्कार पार पडले. फेब्रुवारी १९११ मध्ये मावळ भागातील वलवण येथे धरणाचा पाया घालण्यात आला. ह्यावेळी दोराब टाटा यांनी आपल्या वडिलांचे स्मरण क्ररताना एक भाषण केले ज्यात ते म्हणतात की,
“संपत्तीचा साठा माझ्या वडिलांसाठी एक न्यूनतम गोष्ट होती. ह्या देशातील लोकांची व्यावसायिक आणि बौद्धिक क्षमता वाढवणे हि त्यांची खरी प्रेरणा होती.”
अनेक देशी-विदेशी तंत्रज्ञांच्या मदतीने कित्येक किलोमीटर लांब प्रचंड व्यासाच्या पाईपांची लाईन टाकण्यात आली व १९१५ साली टाटांनी हा प्रकल्प मुंबईस अर्पण केला.
७२ मेगावॉट क्षमतेची वीज मुंबईला सहजी मिळू लागली.
अजूनही हा प्लांट आणि लोअर परेल येथे असणारे विजेचे ग्रीड कार्यरत असून मुंबईच्या विजेची निकड भागवत उभे आहेत. लॉर्ड सिडनेहम ह्यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन करताना काढलेले शब्द अजूनही खरे ठरतात –
“भारतीयांना स्वतःवर असणारा दुर्दम्य विश्वास आणि स्वतःच्या बळावर जगात तंत्रज्ञानात पुढे जाण्याची क्षमता सोन्याचे दिवस आणील.”
हीच कंपनी आज आफ्रिका, युरोपसह कित्येक देशांत वीज पुरवत आहे.
हे ही वाच भिडू.
- ८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले?
- टाटांनी बदला म्हणून जग्वार कंपनी घेतली तसच छत्रेंनी बदला म्हणून विल्सनची सर्कस घेतली
- टाटा मोटर्सची सुरवात ट्रक बनवण्यापासून नाही तर स्वदेशी रणगाडे बनवण्यातून झाली.
- या पाटलांच्या वेटिंग रुममध्ये जे.आर.डी. टाटा देखील वाट पहात बसायचे
Wrong information about Tata Power.
The pioneering Dam is Lonavala Lake, which is on the way to INS Shivaji Naval base. And the projects name was Tata Hydropower Electric Company. Initially it was 6 MW, then gradually increased to 72 MW.