पोरांना तारणाऱ्या वाघिणीचा जन्म झालाय…!

क्या बोलती पब्लिक..

विमल खाणारा मुलगा परवडला पण १० बॉयफ्रेंड असणारी पोरगी नाही.

बॉयफ्रेंड ठेवायची हौस आहे ना मग त्याचे लाड आणि शौक पुरवायची पण हिम्मत ठेवा, तो ठेका फक्त बॉयफ्रेंड ने घेतलेला नाही..  

वरचे डॉयलॉग वाचून अस वाटेल की हा कोणीतरी मुलगा आहे, पण भिडूंनो टिकटॉकवरची ही वाघिण आहे. जी मुलांच्या हक्कांसाठी लढते. ती एक व्हिडीओ काढते आणि तो व्हिडीओ लगेच व्हायरल होतो. हजारों पोरं ताई ताई म्हणतं तिचे धन्यवाद मानतात. कारण ती पोरगी असून पोरांच्या बाजूने बोलते. त्यांच्या हक्कांसाठी लढते.

काहीही करून या वाघिणीचा नंबर काढायचा आणि तिच्याशी बोलायचं अस बोलभिडूने ठरवलं. ठरवलं तस केलं मोठ्या कष्टाने तिचा नंबर मिळवला. तिला फोन केला तेव्हा फेमिनिझम प्रमाणे मेमीनिझमची वाघिण असणाऱ्या तिने पहिली अट घातली नंबर शेअर करू नका नाहीतर फॅन्स लोक त्रास देतात. तिच्या या अटीचा मान ठेवून तिच्यासोबत गप्पा मारल्या.

दीक्षिता दिनेश कासारे म्हणजे टिकटॉकवरची भीमाची वाघीण डिके.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फॅन आणि मुलांची ताई अशी तिची ओळख आहे. ती मूळची पनवेलची. शिक्षणात आवड नव्हतीचं त्यामुळं एफ.वाय. बीए मध्येच कॉलेजचा पत्ता थेट नोकरीत बदलला. आई घरीच तर बाबा सरकारी नोकरीत. लहानपणापासून शाळेपेक्षा acting आणि डान्स करायला तिला लै आवडायचं. कॉलेज सोडल्यावर पपांच्या ओळखीने एकाजागी नर्सिंगचं काम केलं, पण रोखठोक स्वभाव आणि तापट डोकं असल्यामुळं नोकरीला रामराम केला. सध्या ती ऐरोलीत एका कंपनीत बॅकऑफिसमध्ये काम करतेय.

वर्षभरापूर्वी सगळे बनवतात म्हणुन तिनंपण टिकटॉकवर व्हिडीओ सुरुवात केली.

आंबेडकरांच्या विचारावर प्रेम होत म्हणून त्यांच्या गाण्यावर व्हिडीओ केले. शिवाजी महाराजांची वाघीण असतेच तशीच भीमाची वाघीण म्हणून “भीमाची वाघीण डिके” या नावं प्रोफाईल काढली. काम बघत बघत विडिओ चालले होते, हळूहळू लोक ओळखायला लागली. पण त्यात म्हणावी इतकी मज्जा न्हवती. टिकटॉकच्या आयुष्यात ज्या कुरघोडी होतात त्या तिच्याबरोबर झाल्या. ज्या मित्राच्या मदतीने व्हिडीओ काढत होती त्यानेच तिची बदनामी सुरु केली. त्याच्यामुळे वाघिणीचे विडिओ चालतात अशी उपकाराची भाषा त्याने सुरु केली.

“माझ्यासोबत विडिओ काढते म्हणून तुला लोक बघतात”

ही तिची भाषा ऐकूण वाघिणीने ठरवलं आत्ता एकटी व्हिडीओ काढील आणि तुझ्या पुढे जावून दाखवेल.

दिक्षीतानं सुरूवात केली. एक दिवशी ट्रेनमधून येताना तिला विचार आला, आपल्या मित्रांचे प्रॉब्लेम्स कोणच मांडत नाही, जी काय सहानुभूती पाहिजे ती पोरींनाच..

झालं, जुईनगर स्टेशनवर थांबली. मोबाइल काढला आणि क्या बोलती पब्लिक…

“व्यसन करणारा मुलगा परवडला, पण १० बॉयफ्रेंड असलेली पोरगी नाही. व्यसन करणारा पोरगा व्यसन करुन पण लॉयल असतो, पण १० ठिकाणी तोंड मारणारी पोरगी सुधारत नाही. लग्नाआधी आणि लग्नानंतर पण ती तोंड मारणारच. टाळी एका हातानी वाजत नाही.”

व्हिडीओ शूट झाला. अपलोड झाला आणि बघता बघता फेसबुक, व्हाट्सअप स्टेटस, व्हाट्सप्प ग्रुपला व्हायरल झाला. समस्त पुरुष समाज एकवटला आणि,

एकच ताई…भीमाची वाघीण….

हा जयघोष झाला. पोरांना तारणाऱ्या वाघिणीचा जन्म झालाय असा आनंद सगळ्यांना झाला आणि या सगळ्यात भीमाच्या वाघिणीचे फोलोवर्स २५ हजारांवरून थेट ५० हजार झाले. १० लाख view चा टप्पा पार झाला. एकच ताई भीमाची वाघीण, मेसेज, कंमेंट्सचा पूर आला. बघतात बघता महाराष्ट्रभर हा व्हिडीओ पोहोचला.

व्हिडीओ करत असताना आई पप्पा काही बोलले नाही का?

या प्रश्नावर भीमकन्या म्हणते, “माझे मम्मी पप्पा खूप सपोर्टिव्ह आहेत, पण एक असा व्हिडीओ होता ज्यामुळे खरच भिती वाटली होती, पोरांनी विमल खाल्लं तर काही होत नाही असा सांगणारा तो व्हिडीओ होता. तो व्हिडीओ पप्पानी बघू नये अशी तिची मनापासून इच्छा होती. व्हिडीओ व्हायरल झाला. पप्पा बघतील म्हणून मग तो व्हिडीओ प्रायव्हेट केला.

नेहमी रोखठोक आणि कितीपण बिनधास्त असलो तरी वडील म्हणलं कि भीती आलीचं. त्याच भीतीनं व्हिडीओ डिलीट केला खरा पण शेजारच्या एका काकांनी पप्पाना माझे प्रताप दाखवले. काहीतरी स्फोट होईल असा वाटलेलं पण पप्पा काहीच बोलले नाहीत. बाहेर गेले कि लोक भीमाच्या वाघाणीचे पप्पा म्हणून ओळखतेत, मावशीकडे गेले तेव्हा आनंद शिंदेनी टिकटॉक स्टार म्हणून सत्कार केला. अनेक इव्हेंटला लोक बोलवतेत. यातच घरच्यांना भारी वाटत कि पोरगी नाव कमावतीयं.

आपली पोरगी सगळ्यांना नडणारी आणि पुरून उरणारी आहे. मला हवं तस जगायला आवडत, कारण लोक काय म्हणतील याच आपण विचार करत नाही अस तिच तिच्या इतकत बिंनधास्त मत होतं.

वायरल व्हिडीओने आयुष्यात काय बदल झालाय?  

असं विचारलं तर ती म्हणते खूप बदल झालाय. हजारो मुलं मेसेज करतात. ताई तू मनातलं बोलते ग, तू खूप भारी आहेस, तुला भेटायचय पण दुसरीकडे मुलींच्या विरोधात बोलते म्हणून मुलींकडंनं शिव्या देखील पडतात. हि पोरांची लाल करते, मुलांची बाजू घेते, असल्या कंमेंट येतातच. काही घाणेरड्या कमेंट मुलींकडंनचं येतात पण आपल्या आयुष्याचा रूल हाय आपण सगळ्यांना फाट्यावर मारतो, माय लाईफ माय रुल्स..

बेस्ट फॅन मुमेंट कुठली याच उत्तर देताना भीमकन्या सांगते की, गेल्या रविवारी तिने तिच्या फॅन्ससाठी एक मीटअप ठेवलेला आणि सकाळी एक व्हिडीओ टाकला की आज चैत्याभूमीला भेटूया.

ओमी नावाचा एक मुलगा धावत पळत लालबाग वरून फक्त मला भेटायला आलेला तेपण सत्यनारायणाच्या पूजेला घालतात ती कपडे घालून. मी त्याला म्हणलं अरे तू असा का आलाय. तर तो बोलला अग ताई माझ्या घरी पूजा आहे आज पण आज तुझं मीट अप आहे म्हणून मी तसाच पूजेच्या कपड्यात तुला धावत पळत भेटायला आलोय. तुझ्या एका वाक्यासाठी मी तुझा फॅन आहे,

बॉयफ्रेंड ठेवायची हौस आहे ना मग त्याचे लाड आणि शौक पुरवायची हिम्मत पण ठेवा. तो ठेका फक्त बॉयफ्रेंड ने घेतलेला नाही.

मला त्यादिवशी इतकं भारी वाटलं, कि लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात.

एका मुलाने माझी बदनामी केली, पण बाकी मुलांनी मला आयुष्य जगायला शिकवलं. आज सगळ्या मुलांची ताई म्हणून मला मिरवायला भेटतय हेच काय कमीए. टिकटॉकसह फेसबुक व्हॉट्सएपवर व्हायरल होणारी ताई टिकटॉकसारखीच मनमोकळी आणि बिंनधास्त आहे हे पाहून बर वाटलं.

भिमाची वाघिण DK चे अन्य काही व्हिडीओ तुम्ही खालील लिंकवर क्लिककरून पाहू शकता.