असा आहे तिरूपती बालाजी मंदीराचा इतिहास… 

तिरूपती बालाजी, हे नाव ऐकलं तरी कानाच्या एका बाजूला आपसूक गोविंदा गोविंदा असा आवाज घुमू लागतो. दक्षिण भारतातल्या या देवस्थानची हवा सगळ्या भारतभर आहे. जगभरातून कोटींच्या संख्येत हिंदू भाविक इथे येत असतात. प्रत्येकजण इथे आपले केस दान करतो. काहीना काही दानधर्म करुनच जात असतो. 

थोडक्यात काय तर तिरूपती बालाजी मंदीर हे दानधर्म आणि भाविक या दोन्हीच्या यादीत भारतात टॉपलाच आहे.. 

पण मुद्दा हा आहे की हे मंदीर कधी बांधण्यात आलं, कसं बांधण्यात आलं वगैरे वगैरे इतिहास आपणाला सहसा माहित नसतो. 

म्हणूनच तिरुपती बालाजी मंदीराचा इतिहास तुम्हाला सांगत आहोत.. 

तत्पूर्वी बालाजी मंदीर नेमकं कुठे आहे. तर सध्याच्या आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातल्या तिरूमाला अथवा तिरूमलय पर्वतरांगेत हे मंदीर आहे. पूर्व घाटातील शेषाचमल पर्वतमालेतील हा सात पर्वतांचा हिस्सा आहे. या सात पर्वतांचा आकार नागाच्या सात फण्यांसारखा आहे. बघताक्षणी एखाद्या नागाने वेटोळे घातले आहेत अस हे चित्र दिसत. 

तिरूपती मंदिराबाबत अनेक दंतकथा आहे.

पण मंदीराचा अगदी सुरवातीचा उल्लेख सांगायचा झाला तर इसवी सन पूर्वी दुसऱ्या शतकात असणाऱ्या ग्रॅंथ तोल्काप्पियम या ग्रॅंथात उल्लेख मिळता. यामध्ये श्री वेंकटेश्वर सात पर्वतांचे भगवान आहेत आणि ते विष्णूंचे अवतार आहेत अशी मांडणी आहे. यातच वेंकटेश्वरांबाबत अनेक कथा असून त्यापैकी एका कथेनुसार ही स्वयंभू मुर्ती आहे. 

तर दुसरीकडे वराह पुराणानुसार मंदीराची निरमाणी टोंडामन शासकांनी केलेली आहे. राजा टोंडामन याने हे मुर्ती एका वारूळातून बाहेर काढल्याची दंतकथा आहे. इथून मुर्ती बाहेर काढून मंदीर बांधण्यात आलं व नित्यनियमाने पूजाअर्चा केली जावू लागली. याच राजाने इथे उत्सव सुरू केले.

राजा टोंडामन यांच्या बाबतीत मात्र वेगवेगळ्या कथा आहेत. मान्यतेनुसार टोंडामन वैष्णव संप्रदायाचा प्रमुख होता आणि त्याच्याच नावाने या संपुर्ण भागाला टोंडेमंडलम नाव मिळाला. त्या काळच्या या क्षेत्रात आजचा कांचीपुरम, तिरूवल्लूर, चैन्नई, वैल्लोर, तिरुवन्नमलय असा भाग येतो. 

मंदीराच्या भिंती, खांब, गोपूर अशा ठिकाणी तामिळ, तेलगु आणि संस्कृतमध्ये ६०० हून अधिक शिलालेख आहेत. मात्र यामधून देखील मंदीराच्या निर्मितीचे ठोस असे पुरावे मिळत नाहीत. मंदीराचा विस्तार ९ व्या शतकानंतर पल्लव, चौल आणि विजयनगरच्या राजांनी केल्याचे पुरावे मात्र मिळतात. यातली ९ व्या शतकात पल्लव राज्यकर्त्यांद्वारे केलेल्या जिर्णोद्धारापासून ते १७ व्या शतकातील विजयनगरच्या राजा कृष्णदेवराय आणि त्यांचे उत्तराधिकारी अच्युतादेव राय यांच्यापर्यन्तचे संदर्भ मात्र मिळतात. 

एकंदरीत मंदीराच्या शैलीनुसार मंदीर कोणत्या काळात बांधले गेले असावे हे पाहिले जाते.

हे मंदिर द्रविड वास्तुकलेतून साकारले गेले आहे. गाभाऱ्याला आनंद निलायम म्हटले जाते. मंदीराला तीन प्रवेशद्वार असून ते तिन्ही प्रवेशद्वार गाभाऱ्याच्या दिशेने जातात. पैकी पहिल्या प्रवेशद्वाराच्या समोर गोपूर उभारण्यात आले आहे ज्याची उंची ५० फूट आहे.

मंदीराच्या इतिहासातील काही महत्वाच्या टप्यांपैकी पहिला टप्पा पल्लव शासकांच्या काळात तीसऱ्या ते नवव्या शतकातला काळ मानला गेला आहे. तिरूमाला आणि तिरुपतीचा जो भाग आहे त्या भागाला मंदीराच्या निर्मीतीनंतर टोडेंमंडलम भागात सामाविष्ठ करुन घेण्यात आल होतं. याच काळात सातवाहन साम्राज्याचा नाश झाला आणि इतर राज्यांनी आपआपले राज्य घोषीत करुन सीमानिर्मीती केली होती. 

सातवहानांच्या काळात जाहगिरदार असणारे पल्लव पुढे कांचीपुरम पासून आपले साम्राज वाढवण्यास सुरवात केली. मंदिराच्या शिलालेखामध्ये पल्लव राज्यांनी सुरू केलील ज्योत, भोजन परंपरा मांडण्यात आली आहे. याच काळात राजाची प्रथम पत्नी सामावई यांनी इसवीसन ९६६ मध्ये मंदीराला जमीन दान व आपले सोन्याचे दागिणे दान केल्याचा उल्लेख आहे. 

१० व्या शतकात चोल राजा आदित्य प्रथम ने टोंडमंडलवर आक्रमण केलं. त्यानंतर १३ व्या शतकापर्यन्त मंदीर चोल साम्राज्याचा भाग होतं. चोल राजाच्या काळात देखील मंदीराची भरभराटच झाली. मंदिराचे प्रबंधन करण्यासाठी इथे लोकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. 

इसवी सन १३३६ मध्ये विजयनगर साम्राज्याचा हे मंदीर भाग झालं. या काळात मंदिराला एक सुरक्षितता मिळाली. मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जावू लागला. मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. विजयनगरच्या १४ ते १७ व्या शतकापर्यन्त संगम राजवंश, सालुव राजवंश, तुलुव राजवंश, अराविदु राजवंश यांच्या शासनकाळात तिरूमाला व तिरुपती मंदीराचा सुवर्णयुग झाला अस सांगण्यात येत. 

संगम राजवंशच्या प्रमुख जाहगिरदार असणाऱ्या महामंडेश्वर मांगिदेवने १३६९ मध्ये मंदीराच्या गाभाऱ्याला पुर्णपणे सोन्याचं केलं. सोबतच मंदीराच्या शिखराला देखील सोन्याने मढवण्यात आलं. १४९५ साली सलुव राजवंश च्या नरसिहां राय ने मंदिरात उत्सवांस सुरवात केली. तसेच एक बाग व गोपूराची निर्मीती केली. 

तुलुव राजवंश चे शासक कृष्णदेवराय यांनी मंदिरासाठी २० गावे दान केली.

याच काळात मंदिरासाठी दानधर्म करण्यास मोठ्या प्रमाणात सुरवात झाली. सैनिक, शेतकरी चांगल्या गोष्टी घडून याव्यात म्हणून दानधर्म करु लागले. यामध्ये सोन्याचे भांडे, दागिणे असत. 

१७ व्या शतकात जेव्हा विजयनगर साम्राज्य नष्ट झाले तेव्हा म्हैसुरच्या वाडियार आणि नागपुरच्या भोसल्यांकडे हा भाग येवून गेला. १७ व्या शतकाच्या मध्यात मंदिराचा हा भाग गोवळकोंडाच्या सुलतानांच्या ताब्यात होता. १७५८ सालात या भागावर फ्रान्सने कब्जा केला. नंतरच्या काळात म्हणजे १८०० त्या दरम्यान इथे कर्नाटकच्या नवाबांचे शासन राहिले. 

१९ व्या शतकात इंग्रजांच्या अधिपत्याखाली मंदिर आहे. १८०० नंतर इथे इस्ट इंडिया कंपनीने कारभार संभाळला. या काळात मंदिराचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये होते. 

१८३६ ते १८४२ च्या दरम्यान गव्हर्नर जनरल आकलॅंड ने एका नोटिसेद्वारे सरकारी अधिकऱ्यांना मंदिरातल्या धार्मिक दानातून मुक्त करण्याची सुचना केली. यास विरोध झाल्यानंतर प्रंबधन कमिटी स्थापन करण्याचा विचार पुढे आला व कोणत्याही एका व्यक्तीकडे मंदीराचा कारभार सोपवावा अशी निश्चिती करण्यात आली. 

१८४३ साली हातीरामजी मठ के महंताच्या ताब्यात मंदीर देण्यात आलं. सप्टें १८४३ साली महंत सेवादास या देवस्थानाचे इनजार्च झाले. १८४३ ते १९३२ पर्यन्त हीच व्यवस्था लागू करण्यात आली होती. 

१९३२ साली मद्रास सरकारने तिरूमाला तिरूपती देवस्थान कायदा पास केला. मात्र राज्यांच्या निर्मितीनंतर हे मंदीर आध्रप्रदेशच्या ताब्यात गेले. 

आज तिरूमला देवस्थान समितीच्या अंतर्गत फक्त देवस्थानच नाही तर संपुर्ण शहर व सात पर्वत येतात. वार्षिक दोन हजार कोटींचे उत्पन्न मंदीरातून होतं.. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.