अमृता हॉस्पिटल सारखीच देशातली ही हॉस्पिटल्सही तोडीस तोड मोठी आहेत…

दिल्ली एनसीआर मधील हरियाणा राज्यातील फरिदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृता हॉस्पिटलचं उदघाटन केलंय. फरिदाबादमधील अमृता हॉस्पिटल हे देशातील सगळ्यात मोठं खासगी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलची निर्मिती अमृतानंदमयी माता यांच्या अमृतानंदमयी मठाने केली आहे. केरळच्या कोच्ची शहरात असलेल्या १२०० बेड्सच्या हॉस्पिटलनंतर अमृतानंदमयी मठाचे दुसरे मोठे हॉस्पिटल आहे. 

१३० एकर परिसरात असलेल्या या हॉस्पिटलमध्ये एकूण २६०० बेड्स असतील.

 त्यात ८१ स्पेशॅलिटीज आणि ८ सुपरस्पेशालिटी विभाग असतील. त्यात कार्डियाक सायन्स, न्यूरोसायन्स, गॅस्ट्रो सायन्स, रिनाला सायन्स, ऑन्कोलॉगी, हाडाचे रोग, आय बॉल्स प्रत्यारोपण, ट्रान्सप्लान्टेशन अशा विभागांचा समावेश आहे. 

या अमृता हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात ५३४ बेड्स असतील. हे भारतातील सगळ्यात मोठे अतिदक्षता विभाग असेल. या हॉस्पिटलमध्ये ८०० डॉक्टर्स आणि १० हजार कर्मचारी असतील. ऑगस्ट २०२२ मध्ये ५०० बेड्सची सुरुवात करण्यात आलीय. त्यांनतर पुढील दोन वर्षात ७५० बेड्स आणि पुढील पाच वर्षात १००० बेड्स सुरु करण्यात येतील. 

सर्व २६०० बेड्स सुरु करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाहीय. परंतु लवकरच सर्व बेड्सच्या सुविधेसह हॉस्पिटल सुरु करण्यात येणार आहे.त्यासोबतच या हॉस्पिटल्सही संलग्न असलेल्या मेडिकल कॉलेज मध्ये १५० एमबीबीएस विद्यार्थी आणि १०० एमएस आणि एमडी विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था असेल. 

परंतु अमृतानंदमयी मठाचं अमृता हॉस्पिटल हे देशातील एकमेव मोठं हॉस्पिटल नाही. या हॉस्पिटलसारखेच आणखी ५ मोठे हॉस्पिटल देशात आहेत.

१. सरकारी मेडिकल कॉलेज कोझिकोडे

सरकारी मेडिकल कॉलेज कोझिकोडे हे देशातील सगळ्यात मोठे हॉस्पिटल आहे. हे एक सरकारी रुग्णालय आहे. याची स्थापना १९५७ मध्ये केरळ सरकारने केली आहे. हॉस्पिटलची स्थापना १९५७ मध्ये करण्यात आली होती परंतु मुख्य हॉस्पिटलची सुरुवात ९ वर्षांनी १९६६ सालात करण्यात आली. १९६६ मध्ये एकूण ११८३ बेड्सचे मुख्य रुग्णालय सुरु झाले.

या हॉस्पिटलमध्ये १९७५ सालात ६१० बेड्सचे मॅटर्नल आणि चाईल्ड इन्स्टिट्यूट सुरु करण्यात आलं. तर १०१ बेड्सचं कँसर इन्स्टिट्यूट, १०० बेड्सचं चेस्ट हॉस्पिटल सुरु करण्यात आले. कालानुरूप वेगवेगळ्या प्रकारचे विभाग सुरु होत गेले. 

सद्यस्थितीला या हॉस्पिटलमध्ये ३०२५ बेड्स आहेत. त्यामुळे सरकारी मेडिकल कॉलेज कोझिकोडे हे देशातील सगळ्यात मोठे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये केरळ राज्यातील जवळपास ४० टक्के रुग्णांचा उपचार केला जातो.

२. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल

सरकारी मेडिकल कॉलेज कोझिकोडे नंतर देशातील दुसरे मोठे हॉस्पिटल म्हणून अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचं नाव घेतलं जातं. या हॉस्पिटलची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात १८५८ मध्ये झाली. तेव्हा हॉस्पिटलमध्ये केवळ १२ वार्ड होते. हे हॉस्पिटलच्या सुरु करण्यासाठी अहमदाबादचे व्यापारी प्रेमभाई झवेरी आणि हाथीसिंग झवेरी यांनी मदत केली होती. तेव्हा

१८७१ सालात हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्कूल सुरु करण्यात आलं ज्यात सुरुवातीला १४ विद्यार्थी होते. त्यांनतर वेळोवेळी हॉस्पिटलमध्ये वाढ होत गेली. शहराची वाढती गरज लक्षात घेऊन नोव्हेंबर १९५३ मध्ये बॉम्बे सरकारने अहमदाबादच्या असरव भागात नवीन सिव्हिल हॉस्पिटल सुरु केलं.

वर्तमान काळात या हॉस्पिटलमध्ये ४४ वार्ड आणि २८०० बेड्स आहेत. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दरवर्षी ९ लाख बाह्य रुग्णांचा आणि १ लाख भरती केलेल्या रुग्णांचा उपचार केला जातो.  

३. राजीव गांधी सरकारी सामान्य रुग्णालय चेन्नई

देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या या हॉस्पिटलची स्थापना नोव्हेंबर १६६४ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केली होती. सुरुवातीला या हॉस्पिटलमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या जखमी सैनिकांवर उपचार केला जायचा. वर्तमान जागेवरील हॉस्पिटल १७७२ मध्ये सुरु झाले.

१९२८ ते १९३८ या काळात रुग्णांची संख्या वाढायला लागली त्यामुळे रुग्णालयाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला. १९८७ पासून हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया सुरु करण्यात आल्या. तर १९९६ मध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले होते.

वर्तमान परिस्थितीत या हॉस्पिटलमध्ये २७२२ बेड्स आहेत. या हॉस्पिटलमध्ये दरवर्षी लाखो रुग्णांवर उपचार केले जातात.

४.  राजाजी सरकारी हॉस्पिटल मदुराई

तिसऱ्या क्रमांकाच्या राजीव गांधी रुग्णालयाप्रमाणेच सरकारी राजाजी रुग्णालय सुद्धा तामिळनाडू राज्यातच आहे. या रुग्णालयाही स्थापना १८४२ मध्ये करण्यात आली होती. तेव्हा या रुग्णालयाचं नाव एस्काइन रुग्णालय असं होतं. १९१८ मध्ये  राज्य शासनानं या रुग्णालयाला महानगरपालिकेच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेतलं.

रुग्णालय राज्य शासनाच्या ताब्यात गेल्यांनतर १९५४ मध्ये या रुग्णालयाला मेडिकल कॉलेज घोषित करण्यात आलं. १२.४७ एकर जागेवर पसरलेल्या या रुग्णालयात २५१८ बेड्स आहेत. तसेच रुग्णालयाच्या सर्व विशेष विभागांमध्ये २४/७ डॉक्टर उपलब्ध असणारे हे राज्यातील एकमेव रुग्णालय आहे.

या रुग्णालयामध्ये क्रिटिकल सर्जरी केल्या जातात त्यासोबतच दरवर्षी २० लाखाहून अधिक सामान्य रुग्णांचा उपचार केला जातो. सामान्य रुग्णाचे उपचार करणारे हे राज्यातील सगळ्यात मोठे आणि व्यस्त रुग्णालय आहे. 

५. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज.

ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हे देशातील पाचवं मोठं रुग्णालय आहे. तसेच हे हॉस्पिटल देशातील सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या हॉस्पिटलपैकी एक हॉस्पिटल आहे. देशातील सगळ्यात मोठ्या ५ हॉस्पिटल्सपैकी हे एकमेव खासगी हॉस्पिटल आहे.

या हॉस्पिटलची स्थापना १९०० मध्ये तामिळनाडू राज्यातील वेल्लूर शहरात करण्यात आली होती. १९४८ मध्ये या रुग्णालयात कृष्ठरोगावरची पहिली रिकन्स्ट्रक्टिव्ह शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांनतर १९७८ मध्ये नर्सिंग कॉलेजची सुरुवात करण्यात आली. 

या रुग्णालयात एकूण २३०५ बेड्स आहेत. या रुग्णालयात सामान्य उपचारांबरोबर हार्ट ट्रान्सपलण्ट तसेच किडनी ट्रान्सप्लांट यांसारख्या मोठ्या सर्जरी केल्या जातात.

नरेंद्र मोदींनी स्थापन उदघाटन केलेल्या अमृता हॉस्पिटलपूर्वी ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हे देशातील सगळ्यात मोठे खाजगी हॉस्पिटल होते.

करोना काळात देशात हॉस्पिटल्सचा कसा तुटवडा आहे हे आपण पाहिलं होतं त्यामुळं अशी मोठी हॉस्पिटल्स चालू होणं देशासाठी आनंदाची बातमी असणार आहे एवढं नक्की.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.