या किल्ल्याविषयी शत्रूने एवढे भयंकर वर्णन करून ठेवले आहे, की ते वाचल्यास मराठ्यांची ताकद कळते

इसवी सन 1689.

छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मुघलांच्या फौजेने महाराष्ट्रात आक्रमक धोरण स्वीकारले. राजधानी रायगडाचा ताबा मुघलांच्या हाती गेला. स्वराज्याची घडी काहीशी विस्कटली होती.

मार्च 1689 ते नोव्हेंबर 1689 या सहा-सात महिन्यांच्या काळात रायगड, सिंहगड, तोरणा, राजगड, रोहिडा, पुरंदर, लोहगड, पन्हाळगड यांसारखे किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले. एकूणच मोठी बिकट परिस्थिती तयार झालेली होती.

स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज मात्र येसूबाईराणीसाहेबांच्या दूरदृष्टीमुळे जिंजीस सुखरूप पोहोचले. काहीशी गोंधळाची स्थिती तयार झाली होती.

याच कालखंडात मुघलांच्या दरबारात काम करणाऱ्या एका व्यक्तीने लिहिलेली काही पत्रे हैद्राबादच्या पुराभिलेखागरात सेतूमाधवराव पगडी यांच्या हाती लागली. मुळात इसवी सन 1689 हा काळ एवढ्या धामधुमीचा होता की या काळात लिहिण्यात आलेल्या दस्तावेजांची संख्या मोजकी आहे.

‘हातमखान’ नामक मुस्लिम सरदाराने आपल्या मुलाला, गुरूला, पैपाहुण्यांना लिहिलेल्या शंभर एक पत्रांचा संग्रह सेतूमाधवरावांनी अनुवादित केला. हातमखानला अखेरच्या काळात ‘किलेदारखान’ अशी पदवी देऊन तोरणा किल्ल्यावर पाठवले होते. तोरण्याचा संपूर्ण कारभार त्याच्याकडे सोपवला होता.

या किल्ल्यावर मात्र त्याला सुखाचे दिवस लाभले नाहीत. तोरणा किल्ल्याविषयी मराठ्यांच्या शत्रूने एवढे भयंकर वर्णन करून ठेवले आहे, की ते वाचल्यास आपल्याला तोरण्याची ‘ताकद’ काय होती हे लक्षात येते. पुढील वर्णन खुद्द ‘किलेदार खान’ याच्या शब्दात पाहू.

तो म्हणतो,

“आयुष्यभर मी धर्मनिष्ठ म्हणून राहिलो. पण देवाच्या तडाख्यामुळे मी तोरण्यात येऊन पडलो आहे. हे ठिकाण तिटकारा करण्यासारखे आहे. हे स्थळ भूतांचे आणि राक्षसाचे निवासस्थान आहे. मी अतिशय कष्टात आहे. या संपूर्ण क्षेत्रात मुसलमानांचा मागमूसही आढळत नाही.

अतिशय दुर्गम घाट पार करून मी या किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहे. किल्ल्यावर पाई जाण्याशिवाय पर्याय नाही. एका बाजूला असलेली दरी जणू ‘असफलुस्साफलीन’ (सात पाताळात अगदी खालचा असलेला नरक) आहे असे वाटते.

धडधाकट, चपळ आणि मजबूत माणसेही जेरीस येतील अशा भयंकर पायऱ्या या किल्ल्याला आहेत. मग माझ्यासारख्या दुबळ्या व्यक्तीची काय कथा? हा किल्ला आकाशाशी स्पर्धा करणारा आहे.

एवढ्या अवघड आणि वेड्यावाकड्या वाटेने किल्ल्यावर कुणीही चढून दाखवावे. संपूर्ण पृथ्वीवरील कोणताही डोंगर या किल्ल्याच्या पासंगालाही उतरू शकणार नाही, एवढा हा भव्य आहे.”

किल्ला पाहून हा किलेदार खान एवढा घाबरला होता की त्याला आपला मृत्यूच समोर दिसत होता. तो म्हणतो,

“तोरणा म्हणजे माझ्यासाठी मूर्तिमंत कैदखानाच आहे. माझे कुटुंब, नातेवाईक, पैपाहुणे इ. पासून दूर होऊन मी या काफरस्थानात येऊन पडलो आहे. समजा, येथेच माझ्या आयुष्याचा शेवट झाला तर शेवटच्या क्षणी माझ्यासोबत कुणीही नसणार.

मग माझ्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार कसे होणार?

या हिंदूंच्या देशात, या परदेशात अशा हीन परिस्थितीत दफन होणे माझ्याच नशिबी का यावे?”

अतिशय भीतीमध्ये हा किल्लेदार तोरण्यावर राहिला.दुर्दैव पहा.. संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे मराठे अधिक चवताळले होते. त्यांनी मुघलांच्या ताब्यात गेलेला मुलुख परत मिळवण्यास सुरुवात केली. तोरण्यावर मराठ्यांच्या फौजेने हल्ला केला. या लढाईत किलेदार खान खरंच मारल्या गेला. त्याची भीती सार्थ ठरली.

या पत्रांमधून आपल्याला मुघलांच्या फौजेत मराठ्यांच्या किल्ल्याविषयी कोणती भावना होती, याची झलक पाहायला मिळते. शिवरायांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे,

“एक दिवस खाशा औरंगजेब दक्खनेत उतरेल. तेव्हा माझा एक एक किला एक एक वरूस लढेल. आजमितीला हजरातीस साडेतीनशे किले आहेत. औरंगजेबाला माझे राज्य जिंकायला साडेतीनशे वर्ष लागतील..”

किलेदारखान उर्फ हातमखानाच्या हकिकतीवरून शिवरायांच्या बोलण्याची सत्यता आपल्याला सहज पटते.

हे ही वाच भिडू 

3 Comments
  1. Rohan Borane says

    केतन दादा खुप खुप धन्यवाद नवीन माहितीसाठी..❤🙏🏻

  2. Rohan Borane says

    दादा अप्रतिम लेख अशीच नवनीन माहीती देत रहा लिहत रहा..❤

  3. नितीन says

    मला समजून घ्यावयाचे आहे की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पेशवे होते की नाही जिंकले तर पेशवे हारले तर मराठे या इतिहासकारांनी पेशव्यांना केव्हा जिवंत केले?

Leave A Reply

Your email address will not be published.