बाहेरून आलेल्या लोकांनी स्थापन केलेल्या शहराला आज महाराष्ट्राचा ब्रॅण्ड म्हणून ओळखल जातं.
बाहेरच्या लोकांनी देशामध्ये फक्त गर्दी करण्याचं काम केलं आहे. दूसरी गोष्ट म्हणजे कॉंग्रेसने साठ वर्षात काहीही केलेलं नाही. आपण सहजपणे या दोन वाक्यांवर विश्वास ठेवून बसतो. एखाद्या राजकीय पक्षावर टिका जरूर करावी पण काय केलं हा प्रश्न विचारताना जून्या काळात सर्वस्व पणाला लावून काम करणाऱ्या माणसांबद्दल आपण सहज प्रश्नचिन्ह उभा करतो हे देखील विसरू नये.
आत्ता एक साधी गोष्ट पाटणच्या बाळासाहेब देसाई यांनी शिक्षणात EBC सवलत आणली. त्यामुळे गरिबाची पोरं शिकू शकली. वि.स.पागे यांनी रोजगार हमी योजना आणली त्यामुळे गरिबाला काम मिळालं. हे कॉंग्रेसचेच नेते होते.
असो तर बाहेरची माणसं आणि कॉंग्रेस यांच्या एकत्रित येण्यामुळे झालेली चांगली गोष्ट तुम्हाला सांगण हा आजचा विषय आहे.
महाराष्ट्रात एक गाव आहे. त्या गावाच नाव ब्रॅण्ड म्हणून ओळखलं जातं. देशाच्या कानाकोपऱ्यात इथून वस्तू पोहचतात. कपडे, साड्या, स्टेशनरी वस्तू, गॉगल असे कित्येक प्रकार इथे तयार होतात ते पण अगदी स्वस्तात. किरकोळ किंमतीत हा ब्रॅण्ड देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचतो तेव्हा विक्रेता सांगतो,
मेड इन उल्हासनगर.
उल्हासनगर हे महानगरपालिका असणारं मोठ्ठ शहर. साडेपाच सहा लाख लोकसंख्या असणारं शहर. आणि ठरवून स्थापन केलेलं महाराष्ट्रातील हे तिसरं शहर. पहिली दोन शहरे म्हणजे किर्लोस्करवाडी आणि वालचंदनगर. ही दोन्ही गावे एकाच उद्योगाभोवती तयार झाली होती. आजही ही दोन्ही शहर वास्तवात गावेच आहेत. पण उल्हासनगर वाढलं त्याला कारण होतं लोकांनी मोठ्या जिद्दीने उभा केलेलं उद्योगाचं जाळ.
भारताची फाळणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानहून हिंदू नागरिक भारतात स्थलांतरित झाले. आपण त्यांना सिंधी लोक म्हणून ओळखतो. निर्वासीत या शब्दावरून त्यांना “निर्वाशी” नावाचा नवा धर्म देखील लोकांनी देवू केला. भारतात फाळणीनंतर आलेल्या लोकांची संख्या ७२ लाखाहून अधिक होती. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांना जागा करुन देणं त्यांना पोटापाण्याला लावणं हे स्वतंत्र भारतासमोरच सर्वात मोठ्ठ आव्हान होतं.
दूसरीकडे उल्हासनदीपासून जवळच आणि कल्याण शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर लष्करासाठी कॅंप उभा करण्यात आला होता.
दूसऱ्या महायुद्धाच्या काळात इथल्या १३ स्केअर किलोमीटर एरियातमध्ये या ट्रान्झिट कॅम्पची रचना ब्रिटीश राजवटीत करण्यात आलेली होती. कल्याण कॅम्प नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कॅम्पमध्ये ६००० हजार सैनिक व ३०००० लोकांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. २,१२६ बराकी या ठिकाणी बांधण्यात आल्या असल्याची माहिती मिळते. सोबतच याच ठिकाणी १,१७३ घरे बांधण्यात आली होती.
ब्रिटीशांनी लष्करासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता होती अशा सर्व गोष्टींची तरतूद कल्याण कॅम्प येथे केलेली होती. कल्याण कॅम्पमध्ये एकूण पाच विभाग होते. ए,बी, सी असे तीन प्रकारचे ब्लॉक चाळी सदृश बराकी व निवासस्थाने होती..
भारताची फाळणी झाल्यानंतर आलेल्या निर्वासितांच्या लोंढ्याचे नियोजन करणे हे सर्वात मोठ्ठे आव्हान होते. त्यावेळी एक लाखाहून अधिक निर्वासितांची सोय या लष्करी कॅम्पमध्ये करण्यात आली. दूसरे महायुद्ध झाल्यानंतर हा कॅम्प निर्मनूष्य झाला होता. निर्वासित लोकांपैकी कराचीतून आलेले मराठी बांधव मराठा सेक्शनमध्ये वसले. सिंध मधील सिंधी, गुजराती लोक इथेच स्थायिक होवू लागले. त्या काळात सुमारे एक लाख लोकं इथे राहण्यासाठी आले.
८ ऑगस्ट १९४९.
या दिवशी लष्करी कॅम्पचे रुपांतर शहरात करण्यात आले. भारताचे दूसरे आणि पहिले भारतीय गव्हर्नर सी. राजगोपालचारी यांनी या शहराचे नाव “उल्हासनगर” केले. शेजारीच असणारी उल्हास नदी आणि मोठ्या संकटाचा सामना कराव्या लागणाऱ्या या लोकांच्या आयुष्यात उल्हास यावा यामुळे त्यांनी या शहराचे नाव उल्हासनगर असे केले. या दिवशी मोठ्ठा कार्यक्रम घेवून शहराचा पाया घालण्यात आला.
काही काळावधीतच इथे नगरपालिकेची स्थापना झाली. रुग्णालये, शाळा उभारण्यात आला. निर्वासित लोक सेटल होवू लागले. उद्योग व्यवसायाच्या शोधात न फिरता त्यांनी स्वत:चे उद्योग उभारले. छोट्या मोठ्या गोष्टी तयार करुन विकण्यासाठी ते सज्ज होते. कुणी गोळ्या बिस्किटांचा कारखाना काढला तर कोणी कपडे तयार करण्यास सुरवात केली. देशभर विखुरलेले निर्वासित बांधव हे त्यांचे मुख्य वितरक होते. ठिकठिकाणी विखूरलेल्या निर्वासित सिंधी लोकांना ते माल पुरवू लागले.
काही काळांपुर्वी अंबरनाथ विठ्ठलवाडी प्रवासात लोक रेल्वेची चेन ओढून उतरण्याचा प्रयत्न करत अशा ठिकाणी काळाची गरज म्हणून रेल्वे स्टेशन उभा राहिले तेच हे उल्हासनगर रेल्वे स्टेशन. १९५६ साली त्याची स्थापना करण्यात आली.
आज उल्हासनगर मध्ये काय आहे तर १३ स्केअर किलोमीटरच्या या कक्षा कधीच रुंदावल्या आहेत. २८५ ब्लॉक्समध्ये रेयॉन सिल्क, डाय, रेडीमेड गारर्मेंट्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्स अशा वेगवेगळ्या गोष्टी तयार होत आहेत. इथे एकूण ६० हून अधिक हॉस्पीटल्स् आहेत. इथल्या जीन्स जगभरात खपल्या जातायत. इथे कोणती गोष्ट मिळत नाही असं नाही. भारतातली सर्वात मोठ्ठी सिंधी लोकांची वसाहतपासून या शहराने स्वत:चा ब्रॅण्ड विकसित करण्यापर्यन्त मजल मारली आहे.
“मेड इन उल्हासनगर”
हे ही वाच भिडू.
- किर्लोस्करवाडी खऱ्या अर्थानं भारताची मेक इन इंडिया होती.
- वालचंदनगरवाले वालचंद हिराचंद ! – भाग २
- उल्हासनगरचा डॉन : पप्पू कलानी