मित्र गेल्यानंतर त्याचं राहिलेलं संभाजी महाराजांवरचं पुस्तक त्याच्या दोस्ताने पुर्ण केलं

 २०२० चा डिसेंबर महिना होता. त्या दिवशी मित्राचा फोन आला. फोन करणाऱ्या मित्रानं सांगितलं की त्याने लिहलेल्या मुकद्दर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडतोय. 

आठवणीनं ये.. 

पुण्याच्या पत्रकार भवनात मुकद्दर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

स्वप्नील कोलते पाटील हा मित्र. हा मित्र तसा इतिहासात रमणारा. गडकिल्ले फिरणारा. पण पोटापाण्यासाठी मोबाईलच्या वितरणासारखं काहीतरी करायचा. तो नेमकं काय करायचा हे विचारण्याच्या फंद्यात मी तर कधीच पडलो नव्हतो. कारण आमच्या मैत्रीचा मुद्दा होता तो दुनियादारीचा.. 

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेलो. पुस्तक औरंगजेबावर लिहलेलं. औरंगजेबावरच का लिहलं हे विचारल्यानंतर त्याचं उत्तर होतं अरे समोरचा माणूस किती मोठ्ठा होता ते तर आपल्या लोकांना कळूदे की. इतक्या मोठ्ठ्या माणसाची कबर मराठ्यांनी महाराष्ट्रात खोदलेय, पण ते कळलं तर आपला पराक्रम काय होता ते सांगता येईल.. 

मुद्दा करेक्ट होता. दोन चार दिवसांनी पून्हा भेट झाली. तेव्हा स्वप्नीला म्हणाला आत्ता भव्यदिव्य करतोय. काय करतोय विचारल्यावर म्हणाला, 

संभाजी महाराजांवर पुस्तक लिहतोय… 

भारी वाटलं..स्वप्नील संभाजी महाराजांवर पुस्तक लिहण्याच्या ध्येयाने झपाटून गेला होता..डिसेंबर गेला आणि जानेवारी २०२१ उजाडलं. तेव्हा स्वप्नील कोलतेला फोन करुन पुस्तक कुठवर आलं हे विचारलं. तासभर पुस्तकावरच बोलत होता. संभाजी महाराजांवर भारी पुस्तक लिहणार, लोकांपर्यन्त पोहचवणार..एखाद्या पोराला एखादी दिशा सापडते तसा प्रकार होता…

एकंदरीत सगळ चांगल चाललेलं..

अशातच एक दिवस फोन आला. स्वप्नील गेला… 

एका अपघातात स्वप्नील कोलते पाटील गेला.तो गेला आणि त्याच्यासोबत संभाजी महाराजांवर लिहीत असणारं त्याचं स्वप्नही गेलं.. काही महिने गेले आणि सर्वांप्रमाणे मी देखील विसरून गेलो.. 

अचानक दूसरा मित्र केतन पुरी याचा फोन आला.

त्याने फोनवर सांगितलं स्वप्नीलचं पुस्तक पुर्ण होत आलय. कसं तर त्याचं अपूर्ण पुस्तक मी पुर्ण करतोय म्हणून त्यानं सांगितलं. 

केतन पुरी उस्मानाबादचा. बोलभिडूवर त्याचे इतिहासाचा धांडोळा घेणारे अनेक लेख आहेतच. त्याच मऱ्हाटा पातशाह हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. ते देखील लोकप्रिय झालय. लिखाण अन् त्याचसोबत अभ्यास, काम हे त्याच्यापण पाचवीला पुजलेलं आहे.

पण इतक्या सगळ्या राड्यातून या मित्राने आपल्या मित्रासाठी काय केलं तर त्याचं अर्धवट राहिलेलं काम पुर्ण केलं. त्याचं निम्म्यावर आलेलं पुस्तक केतनने पुर्ण केलं..

या पुस्तकाचं नाव आहे, शेर ए दख्खन 

छत्रपती संभाजी राजांवर लिहण्यात आलेलं हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक देखील मुकद्दर आणि मऱ्हाटा पातशहा प्रमाणे तुफान लोकप्रिय होईल. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांनी अखेरपर्यन्त व मृत्यूनंतरही लढण्याची जी प्रेरणा दिली तिच प्रेरणा या मित्रांनी जगवली.

पण त्याचसोबत लोकांना एक गोष्ट समजून सांगेल की आपला कोणताही जवळचा माणूस अचानक गेलाच तर त्याचं स्वप्न मात्र जगवलं पाहीजे, ते पूर्ण केल पाहीजे…इतिहासातून आपण काय शिकलं पाहीजे तर ही गोष्ट, आपल्या माणसांसाठी आपण उभं राहायचं, भले ती असतील नसतील पण उभं राहिलं पाहीजे. हे एकदा शिकून घेतलं तर बाकी जग सोप्प होवून जातय.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.