मराठवाड्याची वेळ अमोश्या म्हणजे तुमच्या ३१st पेक्षा लै भारी असतंय बे

”तुमच्या थर्टी फर्स्ट पेक्षा भारी असतंय बे ते” जरवर्षी सम्याचा ठरलेला डायलॉग. थर्टी फर्स्टला भाऊचे कधीच प्लॅन नसणार पण कॅलेंडरात वेळ अमावस्या जवळ आलेली दिसली की भाऊ बॅग अडकवून निघालाच गावाकडं.  बरं त्याची एकट्याचीच एवढी लगबग असती तर गोष्ट वेगळीय. त्याच्या गावाकडं जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला एव्हडी गर्दी असायची की सम्या आठवडाभर आधीच बुकिंग करून ठेवयचा.

यंदा मात्र सम्याचा काय प्लॅन दिसत नव्हता. परवा सकाळी उठल्यापासूनच सम्याचा चेहरा पडलेला दिसत होता. नुसतं मोबाईलकडं एकटक बघत होता. आता गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणावं तर सम्या लहानपनापासूनच सिंगल. सीन हाय तरी काय म्हणून मोबाइलमधी डोकावलं तर सम्या शेतातल्या जेवणाचं फोटो बघत बसेलला.

 सम्याला नुसतं काय झालं म्हणोस्तर सम्या चालू झाला. त्यानं जे सांगितलं त्यावरनं कळलं की सम्या म्हणत होता तसं खरंच भारी आहे हा सण.

वेळ आमावस्येच्या चार दिवस अगोदर साधनाची जमवा-जमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी,भुईमूग असा सगळा रानमेवा असतो.

मग अगोदरच्या दिवशी शेतकरी  कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणार्‍या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची पूजा करतात.पूजेनंतर शेतामध्ये चूल करून एका मडक्यामध्ये दूध तापवायला ठेवलं जातं. मग  मडक्यातील दूध ज्या दिशेने ऊतू जाईल, त्या दिशेला चांगला पाऊस पडतो आणि पीक जोमात येतं. असं एवढं  सगळ्या डिटेल्समध्ये सम्या सांगत होता.

आता एवढा सगळं सांगतोय म्हटल्यावर वेळ अमावास्या का म्हणतात असा मुद्दामून डीप प्रश्न सम्यला विचारला.

पण याचं पण उत्तर होतं सम्याकडं. मार्गशीर्ष महिन्यात ज्याला तुम्ही  ‘दर्शवेळ अमावस्या’ म्हणता त्याच  अमावस्येदिवशी आम्ही वेळ आमावश्या साजरी करतो. कन्नड शब्द ‘येळ्ळ अमावस्या’ पासनं हा शब्द आलाय. कानडी शब्द ‘येळ्ळ’ म्हणजे सात. 

कर्नाटकात  पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे ‘येळ्ळ अमावस्या.’  

‘येळ अमोश्या’, ‘एलामास’, ‘येळी अमावस्या’, ‘येळवस’ ही नावं सगळी वेळ अमावस्यालाच आहेत. आता सम्या मागच्या पाच वर्षांपासून एमपीएससी करतोय आणि बॉर्डरवर गाव असल्यामुळं त्याला कन्नड पण येतंय त्यामुळं सम्या जे सांगतोय त्याच्यावर डाउट पण घेता येत नव्हता.

” हिस्टरी राहूदे बे खरी मज्या खायाला येति ” असं म्हणून साम्य पुन्हा चालू झाला. आंबील, भज्जी,उंडे यांची नाव घेताना सम्याच्या तोंडाचा नुसता नळ झाला होता. 

आंबील तुमच्या मठ्याला पण मागं सारतंय.

 ताकत ज्वारीचं पीठ घालून आंबील बनवतेत. त्यात लसणाच्या पातीची पेस्ट आणि कोथिंबीर पण टाकतात. 

भज्जी म्हणजे सर्व भाज्यांपासून बनवलेली भाजी असती

यात गाजर, टोमॅटो, बोरे, वांगी, बटाटे, घेवड्याच्या, शेंगा, कांद्याची पात, हिरवी मिरची असं सगळं एकत्र करून ही भाजी तयार करतेत. भज्जी खाल्ली जाते उंड्याबरोबर. बाजरीच्या पिठाच्या गोळ्यांना शिजवलं की झालं उंडे तयार. 

वेळा अमावस्येला गावात एक माणूस नसतंय. झाडून सगळी शेतात येतेत. दिवसभर मग शेतातच कार्यक्रम चालतोय. शहरात गेलेली पण माणसं या दिवसासाठी गावाला येतेत. सगळ्यांच्या गाठी भेटी होत्यात. दारू,चिकन, मटण असलं काही नसतंय बघ. नुसता शाकाहारी कार्यक्रम लोकं फुल्ल एंजॉय करतेयत.

एवढा सगळं सांगत असताना सम्या मोबाईलवर काहीतरी करत होता. “झालं बुकिंग, निघालो” एवढंच म्हटलं आणि बेणं निघून गेलं. आता दुपारपासनं नुसतं व्हाटसऍपवर शेतातले वेळ आमवस्याचे फोटो टाकतंय आणि मी पण प्रत्येक फोटो उघडून बघतोय.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.