कोरा चेक मिळाला आणि दगडी चाळीसमोर साळसकरांनी पोलिस चौकी उभारली..
मुंबई अंडरवर्ल्ड आणि मुंबई पोलीस यांचा पाठशिवणीचा खेळ 90 च्या दशकात सगळया भारताने पाहिला. फोफावत जाणारं गुन्हेगारी विश्व आणि त्यांना वेसण घालण्यासाठी रानोमाळ हिंडणारे मुंबई पोलीस.
खून खराबा, मारामाऱ्या, टोळीयुद्ध यामुळे सगळी मुंबईचं हैराण झाली होती मग हे सगळं थांबवण्यासाठी काही धडाडीचे ऑफिसर आले आणि त्यांनी भल्या भल्या डॉन लोकांच्या बत्त्या गुल केल्या.त्यापैकीच एक म्हणजे एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर.
भायखळा ते बँकॉक या पुस्तकात हुसैन झैदी यांनी एक जबरदस्त किस्सा लिहीलाय. मुंबईत गुन्हेगारी वेगाने पुढे जात असताना साळसकर यांनी एंट्री केली आणि सगळ्याच दादा लोकांचे धाबे दणाणले.
एखाद्या उच्च पदस्थ मंत्र्याने पोलीस अधिकाऱ्याला बोलावून घेण्याची वेळ फारच क्वचित येते. असच एका मंत्र्याने साळसकर यांना बोलावून घेतलं. अंगावर कायम तीन मोबाईल आणि एक.
38 ची रिव्हॉल्व्हर साळसकरांकडे असायची पण मंत्र्यांनी बोलावून घेतल्याने त्यांच्याकडे त्यापैकी काहीही नव्हतं. मंत्र्यांनी साळसकर यांचं स्वागत केलं.
मादक पदार्थांविरोधी कामाचं कौतुक केलं. इकडच्या तिकडच्या बऱ्याच गप्पा झाल्या मग मंत्री मोहदयानी मेन विषयाला हात घातला.
मंत्री म्हणाले तुम्ही ते काम तसचं चालू ठेवाव असं मला वाटतं. साळसकरांना यात काहीतरी गडबड वाटली. मंत्री एकदम गंभीरपणे बोलत होते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मोठमोठ्या गुन्हेगारांना डोळ्याला डोळा भिडवून साळसकरांनी त्यांचा गेम केला होता पण मंत्री महोदयांच्या डोळ्यातला भाव नेमका काय याचा अर्थ साळसकरांना लागत नव्हता. हो सर एवढच ते बोलले. साळसकरांची अस्वस्थता पाहून मंत्री महोदयांनी एकदम आदेशच दिला,
तुम्ही पुर्ण ताकदीनिशी गवळी टोळीच्या मागे लागावं असं मला वाटतं. अमर नाईकच्या मागे जसे लागला होता तसं. मी प्रदीप शर्माना छोटा राजन आणि दाऊद टोळीच्या मागें लागायला सांगतो.
साळसकर यांनी फक्त मान डोलावली. मग एक कोरा चेक मंत्री महोदयांनी साळसकर यांना दिला आणि फक्त डोळ्यातून इशारा केला.
साळसकरांनी निरोप घेतला, बाहेर आल्यावर त्यांना हसावे की ही बातमी आपल्या सहकाऱ्यांना सांगावी याचा पेच पडला. एका अर्थाने साळसकर सुखावले होते की मंत्री महोदयांनी कुठल्याही वरिष्ठांना न बोलवता थेट मला बोलावून हे काम सोपवल. मंत्री महोदयांनी दिलेल्या कोऱ्या चेकचे मोल मोठे होते आणि त्याचा पुरेपूर वापर करून घेण्याचं साळसकरांनी ठरवलं. गवळी आणि नाईक टोळ्यांनी त्यांची लक्ष्मणरेषा ओलांडली होती आणि त्यामुळेच मंत्री महोदयांनी हा डाव टाकला होता.
याच काळात अरुण गवळीने राजकारणात प्रचंड मोठी खळबळ उडवून दिली होती. गवळीने दादर, परळ आणि भायखळा या भागात अखिल भारतीय सेनेचे उमेदवार उभे केले होते. शिवसेना आमदारांना तो धमकावू लागला होता प्रसंगी हाणामारीही तो करू लागला.
गवळीने सत्ताधारी पक्षाला मुळापासून हालवून टाकण्याचा विचार केला होता. निवडणुकीत मात्र गवळी पराभूत झाला. गवळीला राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली पण 25 हजारांचा दंड भरून तो सुटला.
पूर्व घाटकोपर मध्ये दलीत निदर्षकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ 18 जुलै 1997 रोजी गवळीने हुतात्मा चौकावर मोठा मोर्चा काढला, जवळपास 2 लाख लोक यात सामील झाले होते. गवळीची लोकांमध्ये प्रसिध्दी वाढत होती पण एक मोठा गेम झाला. 18 ऑगस्ट 1997 रोजी गवळीने बांधकाम व्यावसायिक देसाईचा नरिमन पॉइंट परिसरात भरदिवसा खून केला. पोलिस वाटच पाहून होते की गवळी असं काही तरी करेल. थेट दगडी चाळीत धाड पडली आणि गवळी सहित बरेच जण यात पोलिसांनी ताब्यात घेतले.
पण टोळी कायमची संपवण्याची जबाबदारी आली होती विजय साळसकर यांच्या खांद्यावर. नरिमन पॉइंटच्या खुनाला 3 दिवस उलटले असतील साळसकरांनी गवळी गँगचा शूटर गणेश भोसले उर्फ वकील याला शूट आऊट मध्ये उडवलं.
याचा मोठा धक्का गवळीला बसला पण साळसकरांनी अजून एक डेंजर झटका दिला तो म्हणजे 26सप्टेंबर रोजी घाटकोपर मध्ये गवळी गँगचे दोन महत्वाचे खांब, शूटर असलेले विजय तांडेल आणि सदा पावले यांचाही गेम केला. यामुळे गवळी टोळी खिळखिळी झाली.
साळसकर आपल्याला कधीही ठोकू शकतो या भितिखाली गवळी राहू लागला. एन्काऊंटर पद्धत बंद करा म्हणून त्याने न्यायालयात याचिका सुद्धा केली होती.
पण अरुण गवळीचं जगणं मुश्किल करायचं असा पणचं साळसकरांनी घेतला होता त्यामुळे त्यांनी एका विशेष आदेशा खाली थेट दगडी चाळी समोरच पोलिस चौकी टाकली आणि दगडी चाळीच्या समोरच ते खुर्ची टाकून बसू लागले. जोवर ही चौकी तिथं होती तोवर गवळीने कुठलाही गुन्हा केला नाही कारण साळसकर आपलाही गेम करेल याची धास्ती त्याला होती.
असं म्हणतात की जेव्हा साळसकर तिथे बसत असतं तेव्हां दगडी चाळीच्या बाहेर अरुण गवळी पडत नसे.
हे ही वाच भिडू :
- मुंबईत दहशत पसरवणारी माकडवाला गॅंग विजय साळस्करांनी एका रात्रीत संपवली होती.
- खतरनाक अमर नाईकला विजय साळसकरांनी वन ऑन वन चकमकीत मारलं होतं
- आमचा गवळी म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या विरोधात अरुण गवळी नेमका का गेला होता..?
- शिवसेना-मनसेच्या आधी “घाटी विरूद्ध भय्या” या वादाची सुरवात अरुण गवळीने केली होती…