पोर्तुगीजांनी लिहून ठेवलय, “रोमला लाजवेल अस विजयनगरचे साम्राज्य होतं”

पर्शियन राजदूत अब्दुल रझाक लिहितो,

‘‘माझ्या नेत्रांनी विजयानगर इतके अप्रतिम साम्राज्य कुठेही पाहिलेले नाही किंवा त्याच्या तोडीचे दुसऱ्या कोणत्याही नाव ऐकलेले नाही”

हरिहर आणि बुक्क या दोन महा-पराक्रमी भावांनी १३३६ -१३३७ मध्ये तुंगभद्रा नदीच्या काठी स्थापलेले विजयानगरचे साम्राज्य आणि तेवढीच वैभवसंपन्न हंपी ही या राज्याची राजधानी.

इ. स. १३७३ च्या सुमारास विद्यानगरची (विजयानगर) सेना दक्षिण समुद्रापर्यंत पोहोचली. जवळजवळ दक्षिण हिंदुस्थानातील संपूर्ण प्रदेशावर या सेनेने विजय मिळवला. त्या निमीत्ताने पहिल्या बुक्क राजाने ‘विद्यानगर’ या आपल्या नगरीचे नाव बदलून ‘विजयानगर’ असे ठेवले. आज मात्र स्थानिक लोक विजयानगरलाच हंपी म्हणून ओळखता.

अनेक टेकड्यांवर वसलेल्या शहराला एकामागोमाग वर्तुळाकार बांधकाम केलेली सात कोटांची तटबंदी, अतिशय सुंदर आणि प्रशस्त रस्ते, भव्य देवळे, धर्मशाळा, किल्ले, प्रचंड मोठे हमामखाने, कालवे, हस्तीशाळा, घोड्यांचे तबेले, देखणा आणि मालाने तुडुंब भरलेला बाजार, कोरीव कामाचे स्तंभ यांनी नटविलेले हे साम्राज्य.

पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या सर्व वस्तू येथल्या बाजारात मिळतात, अशी याची ऐकेकाळची ख्याती होती.

कस्तुरी, हिरे, मोती, सोने, चांदी, माणके, सिल्क, जर, घोडे अशा अनेक वस्तूंची भर बाजात खरेदी-विक्री येथे केली जात असे. त्यासाठी देशा-परदेशातले व्यापारी येथे येत असत.

पोर्तुगीज प्रवासी डॉमीगो प्रेस आपल्या रोजनिशीमध्ये लिहीतो,

“जगभरात ख्याती असलेल्या रोम साम्राज्याला लाजवेल असे विजयनगरचे डोळे दिपवणारे साम्राज्य होते.”

या साम्राज्याचे सर्वात शक्तिशाली आणि पराक्रमी शासक झाले ते म्हणजे राजा कृष्णदेवराय. आपल्या वडिल आणि भावाच्या राजगादीवरील मृत्युनंतर १५०९ मध्ये ते राजगादीवर बसले. या काळात विजयानगर राज्याला साम्राज्याचे स्वरूप आले.

या साम्राज्याच्या इतिहासातले हे एक सुवर्णयुग होते.

त्याच्या विजयांमुळे, राज्यकारभारांमुळे त्या काळात त्याचा दरारा सार्‍या दक्षिण हिंदुस्थानात पसरला. एवढेच नाही तर उत्तरेकडेही सत्तेतही त्याच्या भरभराटीची ख्याती पसरली होती. आपल्या २१ वर्षांच्या काळात ते जवळपास १४ युद्ध लढले आणि सर्वच्या सर्व जिंकले. राजाजवळ सात ते आठ लाख खडे सैन्य होते.

कृष्णदेवरायच्या काळात परदाओ हे सोन्याचे गोल नाणे चलनात होते. त्याच्या एका बाजूस दोन प्राण्यांची चित्रे व दुसऱ्या बाजूस राजाची मुद्रा असे होते. नाणी पाडणारी टांकसाळ एका भव्य बंदिस्त इमारतीत आहे. आज हा परिसर थडग्यासारखा आहे. एके काळी येथून सोन्याचा धूर शहरावर पसरत होता. थोडक्यात विजयनगर म्हणजे सुवर्णनगरीच होती.

कृष्णदेवराय राजा उत्तम कवी आणि साहित्याचा जाणकार होते.

त्यांचे संस्कृत ग्रंथ उपलब्ध नाहीत पण तेलगु भाषेतील त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध काव्य अमुक्थम्ल्लदा विष्णूचीत्थामू हे आजही प्रचलित आहे. राजानी शांततेच्या काळात काव्य, नृत्य इत्यादी कला यांचा आस्वाद घेण्याबरोबर अजून एक महत्वाचा उपक्रम राबवला त्याची फळे आपण आजही चाखत आहोत.

तो म्हणजे उध्वस्त देवळांच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रम. पडलेली देवळे त्यांनी बांधायला घेतली व यासाठी निधीची कमतरता भासू दिली नाही.

दक्षिण भारतात बहुतेक सगळ्या देवळांना जी मोठमोठी गोपूरे बांधलेली आहे यांना रायगोपूरम असे संबोधले जाते.

इथले विरुपाक्ष शिवमंदिर आठव्या शतकापासून १६ व्या शतकापर्यंत या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. राज्याचा उदय आणि अस्त याच्या साक्षीने झाला. राज्याचा विध्वंस झाला, पण मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले हा एक योगायोगच. आज ते पंपातीर्थ स्वामीस्थल या नावाने ते प्रसिद्ध आहे.

विठ्ठल मंदिर हे इथले सर्वात भव्य दिव्य शिल्प आहे. जगातील एक महान शिल्प म्हणून याची गणना होते. विठोबा हे मराठी लोकांचे कुलदैवत. ते महाराष्ट्राच्या बाहेर सहसा दिसत नाही. विठोबा हा कृष्णाचा अवतार त्यामुळे पुरातन कालापासून पुजले जाणारे दैवत. इ. स. १५१३ ते १५६४ पर्यंत या मंदिराचा जीर्णोद्धार २३ वेळा झाल्याची नोंद आहे

सोबतच विजय चौक येथील राज्याभिषेक चौथरा, राजाचे स्नानकुंड, सासवकेलु गणपती मूर्ती, दगडातील रथ, राजाचा महाल, राणीचा हमामखाना (झेनाना तटबंदी), कमल महाल, पुष्कर्णी, हजराराम मंदिर, लक्ष्मी नरसिंह मंदिर, गणेश प्रतिमा, हत्ती महाल, हेमकुटा टेकडीवरील जैन मंदिर, कमलापुरा म्युझियम हे सर्व अगदीच नेत्रदिपक आहे.

१५६० नंतर विजयानगर साम्राज्याची शोकांतिका :

१५६० नंतर विजयानगर साम्राज्याची शोकांतिका सुरू झाली. निजामशाही, वर्‍हाडातील इमादशाही, बिदर येथील बरिदशाही, विजापुरातील आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही या बहामनी राज्यातुन फुटून १४९० मध्ये वेगळ्या झालेल्या सत्ता.

पण १५६० नंतर विजयानगरचा तत्कालिन राजा रामराजा हा आपल्यातील दुहीचा फायदा उठवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि ते एकत्र आले. पुढे १५६५ साली तालीकोट येथील या बहामनी राज्य विरुद्ध विजयानगर साम्राज्य यांच्यामधील युद्धात विजयानगर राज्याचा दारुण पराभव झाला.

यानंतर बहामनी राज्याने शहरातील अनेक प्रासाद, देवळे, पुतळे, आलिशान घरे यांचा नाश केला गेला. जवळपास तीन महिने साम्राज्य लुटले. आगी लावून राजवाडे भस्मसात केले गेले. सगळे साम्राज्य लयास नेले. पण ज्या काही वास्तु शिल्लक राहिल्या त्या मात्र आजही त्या शुर आणि पराक्रमी इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.

ब्रिटीशांनी पुन्हा उजेडात आणले साम्राज्य :

पुढे १८५६ मध्ये ब्रिटिश अभ्यासक ग्रॅहम ग्रीनलॉ यांनी विजयानगरचे प्रथम उत्खनन केले. पण पुढील १०० वर्षे या सर्व कामाकडे दुर्लक्ष झाले. यानंतर पुढे १९७६ सालात भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे हंपीसाठी राष्ट्रीय प्रकल्प आखला गेला. अनेक तज्ज्ञ व विजयानगर साम्राज्याचे अभ्यासक यांच्या मदतीने युद्ध पातळीवर काम सुरू झाले.

४० ते ५० किमी परिसरात एकाच वेळी उत्खनन चालू होते. काही वास्तू उत्तम स्थितीत होत्या, तर काहींची आधुनिक पद्धतीने डागडुजी केली गेली.

१९८८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा असलेले ऐतिहासिक साम्राज्य म्हणून मान्यता दिली व तेंव्हापासून हंपी हे जगात एक महत्त्वाचे वारसा स्थान म्हणून नोंदले गेलेले आहे. इथे अनेक परदेशी व देशातील अभ्यासक भेट देतात, यावर अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.