शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या एका पत्रकाराची ही गोष्ट…

शेतकरी आंदोलनादरम्यान वार्तांकन करताना सरकारी कामात अडथळा आणला किंवा अफवा पसरवल्या या वरून पत्रकारांवर गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. नुकतच पत्रकार मनदीप पुनिया आणि धर्मेंद्र सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापूर्वी राजदीप सरदेसाई, सिद्धार्थ वरदराजन यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता.

यानंतर पत्रकार आणि सामान्य नागरिक यांनी सोशल मीडियावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली.

पण या सगळ्या घटनांनंतर इतिहासातील अशाच एका पत्रकाराची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्या पत्रकाराने तर शेतकरी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी आपल्या आयुष्यातील २५ वर्ष खर्ची घातली होती.  त्याच्या लेखणीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. अखेरीस इंग्रजांना शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या होत्या.

आता विचार करा, जर पत्रकाराने हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी २५ वर्ष घालवली असली तर हे आंदोलन किती दिवस चाललं असेल?

तर स्वातंत्र्यपूर्व भारतातील राजस्थानमधील हे शेतकरी आंदोलन तब्बल ४४ वर्ष चालू होतं.

होय! खरंच सांगतोय. आणि ते यशस्वी करण्यासाठी धडपडणाऱ्या पत्रकाराचं नाव,

विजय सिंग ‘पथिक’

विजय सिंग ‘पथिक’ यांचं नावं म्हणजे भूप सिंग राठी. प्राथमिक शिक्षण झालं उत्तर-प्रदेशच्या पालगढमध्ये. पुढच्या शिक्षणासाठी ते आपल्या मोठ्या बहिणीच्या गावी इंदौरला दाखलं झाले. पण इथं शिकतं असतानाच त्यांचा क्रांतिकारकांशी संबंध आला.

यात मुख्य नावं होतं शचिंद्र सन्याल. विजय सिंग यांचे क्रांतिकारी विचार समजायला शचिंद्र यांना अजिबातच वेळ लागला नाही. त्यांनी विजय यांची ओळख थेट रासबिहारी बोस यांच्याशी करुन दिली, आणि इथूनच त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अभिनव भारत समितीच्या माध्यमातुन कार्याला सुरुवात केली.

इथं त्यांची हिंदी, इंग्रजी, बांग्ला, राजस्थानी, मराठी, उर्दू अशा भाषांवर चांगली पकड बसली.

अभिनव भारत समितीचे सशस्त्र उठावाचे नियोजन असतानाच समितीमधील क्रांतिकारकांची नावं इंग्रजांसमोर उघड झाली. परिणारी या योजनाला खीळ बसली. त्याच दरम्यान १९१५ साली झालेल्या लाहोर असेंबली बॉम्ब घटनेत त्यांच नाव समोर आलं.

अशात आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी भूपसिंग नाव बदलून विजय सिंग ‘पथिक’ असं नाव धारण केलं. सोबतच वेशभुषा देखील बदलली, आणि राजस्थानमध्ये जावून मेवाड प्रांतात स्थायिक झाले. पक्के मेवाडीच वाटायचे.

विजय सिंग यांनी नाव आणि वेशभुषा बदलली असली तरी विचार मात्र तेच होते. आपल्या क्रांतिकारी कारवाया चालू ठेवण्यासाठी त्यांनी वीर भारत सभा नावाच्या एका गुप्त संघटनेची स्थापना केली.

मेवाड प्रांतात राहत असताना १९१६ च्या आसपास विजय यांना बिजौलिया आंदोलनाची माहिती मिळाली.

हे आंदोलन मागच्या जवळपास १९ वर्षांपासून म्हणजे १८९७ पासून सुरु होतं. सिंधू सीताराम हे त्यावेळी या आंदोलानचे नेतृत्व करत होते. पण त्यांना यश येतं नव्हतं.

त्यावेळी मेवाड प्रांतातील शासक महाराणा फतेह सिंग आणि त्यांचा सरदार राव कृष्ण सिंग या दोघांनी शेतकऱ्यांकडून अन्यायकारक कर वसुलीला सुरुवात केली होती. एकुण ८४ प्रकारचे कर कृष्ण सिंग शेतकऱ्यांकडून वसुल करत होता. या ८४ करांपैकी एक कर हा मुलींच्या लग्नावर देखील होता, जो वडिलांना मुलीचं लग्न झाल्यानंतर भरावा लागत होता.

सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या विरोधात अनेकदा आवाज उठवला होता. पैसा नसलेल्या गरिब शेतकऱ्यांनी आपल्या मुलींची लग्न देखील थांबवली होती. पण महाराणा फतेह शेतकऱ्यांच्या कोणत्याच मागण्या ऐकुण घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. कृष्णा सिंगच्या निधनानंतर करवसुलीच काम दुसरा सरदार पृथ्वी सिंगने पुढे सुरु ठेवलं होतं.

विजय सिंग पथिक यांनी १९१६ साली या आंदोलनात उडी घेतली. मेवाड प्रांतातील गावोगावी जावून लोकांच संगठन सुरु केलं. शेतकऱ्यांना प्रेरित करुन आंदोलनाशी जोडून घेतलं.

इथूनच त्यांनी आपल्या पत्रकारितेची देखील सुरुवात केली. गणेश शंकर विद्यार्थी यांच्याकडून संपादित आणि प्रकाशित होणाऱ्या ‘प्रताप’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी हे शेतकरी आंदोलन संपूर्ण राजस्थानात आणि देशात चर्चेचा विषय बनवला होता.

पथिक यांच्या ‘प्रताप’ मधील लिखाणाची दखल घेत ब्रिटीश सरकारने अन्यायकारक करांच्या चौकशीसाठी न्यायाधीश बिंदु लाल भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एका चौकशी समितीची स्थापना केली.

त्यांच्या लेखणीची महती अगदी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्यापर्यंत देखील येऊन पोहचली होती.

त्यावेळी टिळकांनी महाराणा फतेह सिंग यांना शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती करणारे पत्र देखील लिहिले. तर महात्मा गांधी यांनी मुंबई एका सभेचं आयोजन केलं होत त्या सभेला देखील स्वतः गांधीजींनी त्यांना आमंत्रण दिल होतं.

गांधीजींच्या या सभेत निर्णय घेण्यात आला की, राजस्थानमध्ये या चळवळीबद्दल जनजागृती करण्यासाठी वर्ध्यामधून एक वृत्तपत्र काढले जाईल आणि त्याची जबाबदारी विजयसिंग यांना दिली, त्यासाठी ते वर्धेत दाखल झाले. इथून त्यांनी ‘राजस्थान केसरी‘ नावाचे एक साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केलं, त्याचा खर्च जमनालाल बजाज यांनी उचलला होता.

राजस्थान केसरी मध्ये मांडलेल्या राष्ट्रीय विचारांनी आणि सरकारी दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे राजस्थान आणि मध्य-प्रदेशमध्ये हे प्रचंड लोकप्रिय होऊ लागलं होतं. सरकार विरोधातील जनजागृतीमुळे इंग्रजांनी काही दिवसातच या वृत्तपत्रावर बंदी आणली. पुढे बजाज आणि  पथिक यांच्यातील वैचारिक मतभेदांमुळे बंद पडले.

यानंतर विजय अजमेरमध्ये आले. पूर्वानुभवामुळे विचलित न होता चळवळीच नेतृत्व त्यांनी अजून देखील सोडलं नव्हतं. महाराणा फतेह सिंग आणि इंग्रजांच्या विरोधात लिहिण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली. आणि अजमेर मधून ‘नवीन राजस्थान’ नावाच्या साप्ताहिकाची सुरुवात केली.

‘नवीन राजस्थान’ मुळे शेतकरी आंदोलनाला इतकं बळ मिळालं की, ते महाराणा आणि सरकारसाठी हे आंदोलन दडपण अवघड होत होतं. अखेरीस आंदोलनाला बळ देणाऱ्या ‘नवीन राजस्थान’ वरच बंदी आणली.

सरकारने आपल्या राजपत्रामध्ये घोषणा केली की, या वृत्तपत्राचं वाचन करणं, स्वतःजवळ ठेवणं, किंवा त्यातील प्रसार-प्रचार करणं गुन्हा मानला जाईल. सरकारच्या या घोषणेमुळे ‘नवीन राजस्थान’च प्रकाशन पडलं. सोबतच त्यांना काही काळ तुरुंगात देखील घालवावा लागला होता.

पण विजयसिंह थांबणाऱ्यातील कुठे होते. त्यांनी तेच वृत्तपत्र नाव बदलून ‘तरूण राजस्थान’ नावं सुरु केलं.

इथं मुकुट बिहारी वर्मा, रामनाथ गुप्त यांसारखे पत्रकार त्यांच्या सोबतीला होते. जे पुढे जावून नामी संपादक झाले. २ वृत्तपत्रांवर सरकारने गदा आणल्यामुळे विजय यांच्या शेतकऱ्यांप्रतीच्या लेखणीला अधिकच धार चढली होती. आता तर अनुभव पण बोलू लागला होता. यात ते ‘राष्ट्रीय पथिक’ नावानं लिहायचे. आज देखील लोक त्यांना ‘राष्ट्रीय पथिक’ याच नावानं ओळखतात.

जवळपास ४ दशक चालेल्या या आंदोलनाचे विजय यांनी अडीच दशकांहून अधिक काळ नेतृत्व करतं होते. त्यांच्या नेतृत्वातील चालेल्या या शेतकरी आंदोलनांला अखेरीस १९४१ मध्ये यश आले. शेतकऱ्यांच्या २ पिढ्यांच्या एकजुटीने आणि विजय यांच्या लेखणीने इंग्रजांना झुकवलं होतं. त्यावेळी सरकारने मेवाड प्रांतातील हे अन्यायकारक कर मागे घेतले.

त्यांच्या या आंदोलनाच्या यशस्वीतेनं त्यांना संपूर्ण देशात प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या या कार्याचं कौतुक करताना महात्मा गांधी म्हणाले होते,

“बाकी सभी केवल बातें करते हैं पर पथिक कर्मठ व्यक्ति है। वह एक सैनिक की भांति साहसी है, तेज़ है, और साथ ही ज़िद्दी भी है।”

विजय सिंग यांनी पत्रकारितेशिवाय लेखक म्हणून देखील नाव मिळवलं आहे. तरुण मेरु, पथिक प्रमोद यासारखी जवळपास तीस पेक्षा अधिक पुस्तक लिहिली आहेत. १९५४ मध्ये मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतीमध्ये भारत सरकारने पोस्ट टिकीट देखील प्रकाशित केलं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.