आजच्या युगाचा चेतक अशी ओळख असणाऱ्या विराटला राष्ट्रपतींच्या बॉडीगार्ड चार्जरचा मान मिळालाय…

भारताचा इतिहास इतका समृद्ध आहे की इथे माणसांबरोबरच प्राण्यांच्याही कथा आहेत. या प्राण्यांपैकी एक प्रामाणिक आणि ‘घोडा’ आहे जो आपल्या धन्यासाठी जीव देतो. महाराणा प्रतापच्या चेतकपासून राणी लक्ष्मीबाईच्या पवन आणि बादलपर्यंत तर अण्णाभाऊ साठेंच्या फकिरातील फकिराचा गबऱ्या अशा स्वामीभक्त घोड्यांनी आपल्या भक्तीचे आणि पराक्रमाचे दर्शन घडवले आहे. म्हणजे प्राण्यांवर जीव असणारी माणसे आपल्याकडे आहेत आणि प्रसंगी मालकासाठी जीव देणारे प्राणीही आपल्याकडे आहेत.

आजच्या युगातला ‘विराट’ देखील चेतक, पवन, बादल आणि गबऱ्यासारखा विश्वासार्ह आणि एकनिष्ठ घोडा आहे. विराटला त्याच्या या गुणांमुळे भारतीय लष्कराने राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा चार्जर म्हणून सन्मानित केले आहे. विराट आता प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या निमित्ताने देशाच्या राष्ट्रपतींभोवती फिरताना दिसणार आहे. या परेडदरम्यान देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद राजपथावर पोहोचतील तेव्हा त्यांच्यासोबत एक अंगरक्षक असेल. हे अंगरक्षक मोठ्या उंचीच्या घोड्यांवर स्वार होतील. या अंगरक्षकांच्या घोड्यांमध्ये विराट हा सर्वात खास मानला जातो.

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांचा चार्जरचा सन्मान स्वीकारला

विराटबद्दल आणखी एक गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे त्याच्या गुणवत्तेसाठी आणि केलेल्या सेवांसाठी त्याला चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्ड देण्यात आले आहे. विराटला त्याच्या शिस्त आणि कर्तव्यदक्षतेसाठी हा सन्मान देण्यात आला आहे.

देशाच्या राष्ट्रपतींच्या अंगरक्षक कुटुंबात समाविष्ट असलेल्या विराटला राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा चार्जर देखील म्हटले जाते. 2003 मध्ये, विराटला हेमपूरच्या रिमाउंट ट्रेनिंग स्कूलमधून राष्ट्रपतींच्या अंगरक्षक कुटुंबात सामील करण्यात आले. होनोव्हेरियन जातीचा हा घोडा अतिशय ज्येष्ठ, शिस्तप्रिय आणि आकर्षक उंचीचा आहे.

13 वर्षांपासून अंगरक्षक कुटुंबाचा भाग

सुरुवातीला जंपिंग टीमचा भाग असलेल्या विराटने अनेक विक्रम केले. आता ही क्षमता आणि विशेष गुण पाहून त्यांची कमांडंट चार्जर म्हणून निवड झाली. विशेष म्हणजे हा मान प्रत्येक घोड्याला मिळत नाही तर काही घोड्यांनाच मिळतो. विराट गेल्या 13 वर्षांपासून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशाच्या राष्ट्रपतींसोबत चार्जरच्या रुपात दिसला आहे. यासोबतच त्यानी राष्ट्रपतींसोबत बीटिंग द रिट्रीट सेरेमनी आणि विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागत समारंभालाही हजेरी लावली आहे. या गुणांमुळे आता विराटला चार्जर म्हणून नवी आणि वेगळी ओळख आणि सन्मान मिळाला आहे.

आपल्या देशांत निष्ठावंत असणाऱ्या लोकांना त्रास होतो खरा पण प्राण्यांच्या बाबतीत तसं नाही इथं विषय वेगळा आहे. मुक्या प्राण्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा म्हणजे हा सन्मान मानला जातोय…!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.