दोन वर्ष झाली शतक नाही, त्यात झिरोवर आऊट होतोय, सगळेच म्हणतायत कोहली संपलाय, पण…

२२ नोव्हेंबर २०१९. भारत विरुद्ध बांगलादेश पिंक बॉल टेस्ट, कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेली ही टेस्ट मॅच लक्षात राहण्याचं कारण म्हणजे, विराट कोहलीचं शतक. आता कोहलीनं त्याआधी आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ६९ शतकं मारली होती. पण ईडन्सवरचं हे शतक खास ठरलं, कारण आता अडीच वर्ष उलटत आली, तरी कोहलीच्या बॅटमधून ७१ वं शतक आलेलं नाही.

फॉर्म गंडलेला कोहली बघून कित्येक जण म्हणतायत, “हे त्याचं शेवटचं शतक होतं.”

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘रनमशिन’ अशी ओळख मिरवणाऱ्या कोहलीच्या बॅटचा ओघ आटलाय. २०१९ च्या त्या शतकानंतर त्यानं २२ हाफ सेंच्युरीज मारल्या, पण शतकाला काय गवसणी घालता आली नाही. टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये त्याचा जलवा दिसला खरा, पण कोहली स्टाईल धमाका काय आला नाही.

आधी टेस्ट मग वनडे मग टी२० आणि आता आयपीएल, सगळीकडे कोहलीच्या फॉर्मचा आलेख खाली खाली येत गेलाय. म्हणूनच लोकं म्हणतायत… कोहली संपला.

यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली ९ इनिंग्स खेळला, त्यात त्याला फक्त चारदा दुहेरी धावसंख्या गाठता आली. सलग दोन वेळा तर तो पहिल्या बॉलवर आऊट झालाय. दिनेश कार्तिक, शहाबाज अहमद आणि अधूनमधून फाफ डू प्लेसिस यांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची नौका तरुन आहे.

एकदा ४८ आणि एकदा ४१ नॉटआऊट करणारा कोहली मात्र अजूनही फॉर्मच शोधतोय.

२०१६ च्या आयपीएलमध्ये चार शतकांसह ९७३ रन्स मारणाऱ्या कोहलीला यंदाच्या आयपीएलमध्ये अजून तरी एक फिफ्टीही मारता आली नाही. जगातला सगळ्यात बाप बॅट्समन ओळख असणारा कोहली असा चाचपडतोय म्हणल्यावर त्या मागची कारणंही समजून घेतली पाहिजेच.

पहिलं कारण म्हणजे अतिक्रिकेट-

कोविडमुळं घ्यावा लागलेला आणि आपल्या मुलीच्या जन्मासाठी घेतलेला ब्रेक सोडला, तर कोहली सातत्यानं क्रिकेट खेळतोय. त्यात फॉरमॅट्स बदलले पण त्याच्यावरची जबाबदारी कायम राहिली. साहजिकच एकामागोमाग मॅचेस, दौरे आणि क्रिकेटमुळे येणारा ताण मॅनेज करताना कोहलीला अपयश येतंय हे नक्की.

दुसरा मुद्दा म्हणजे मानसिकता-

कोविडनंतरचं क्रिकेट होतंय बायोबबलमध्ये. इथं खेळाडूंचा बाहेरच्या दुनियेशी आणि बाहेरच्या माणसांशी असलेला संपर्क तुटतो. त्यामुळं येणारा तणाव हाताळणं कोहलीला अवघड जातंय. त्यात सततचं अपयश त्याच्या माईंडसेटवर परिणाम करत असणार. कारण कोहली ज्या किरकोळ प्रकारे आऊट होतो, ते बघून हा तोच बॉलर्सवर राज्य गाजवणारा कोहली आहे का? असा प्रश्न पडतो. त्यामुळं या अपयशाच्या मानसिकतेवर कोहली विजय मिळवत नाही, तोवर गणित गंडणं साहजिकच आहे.

तिसरा मुद्दा म्हणजे जबाबदारी आणि राजकारण-

कोहली हा असा प्लेअर आहे, जो प्रेशर असलं की अधिक खुलून खेळतो. टीम इंडियाचा किंवा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कॅप्टन असताना तो ज्या टशनमध्ये खेळायचा, मैदानावरच्या कुठल्याही प्लेअरला नडायचा ते आता दिसेना झालंय. त्यातच ज्या प्रकारे कोहलीची कॅप्टन्सी गेली, ते नक्कीच सरळसोपं नव्हतं. याचाही परिणाम कोहलीवर झाला असू शकतो असं स्कोअरबोर्ड बघून वाटतं.

पण मेन मुद्दा असा राहतो, की फॉर्म गंडल्यानं कोहली संपलाय का?

बघायला गेलं, तर काही मॅचेस किंवा काही वर्ष बॅटमधून रन्स आले नाहीत म्हणजे प्लेअर संपला असं फार क्वचित होतं. बॅड पॅच तर सचिन तेंडुलकरपासून राहुल द्रविडपर्यंत कुणालाच चुकलेला नाही. त्यामुळं कोहलीलाही पुन्हा फॉर्ममध्ये यायची संधी आहेच.

मात्र कोहली संपलाय, अशा चर्चा होण्यामागं आणखीही कारणं आहेत-

भारतीय संघात सध्या जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. एखाद्या प्लेअरचा फॉर्म काही मॅचेसमध्ये गंडला की, त्याची जागा घेणारा दुसरा भिडू तयारच आहे. साहजिकच, बीसीसीआयनं कोहलीलाच संघाबाहेर ठेवलं तर हा फक्त फॅन्ससाठीच नाही, तर स्वतः कोहलीसाठीही मोठा धक्का असेल.

असं झालंच, तर ते स्वाभिमानी कोहलीला दुखावणारं ठरेल.

दुसऱ्या बाजूला कोहलीनं विश्रांती घ्यावी असा सल्ला रवी शास्त्रीपासून अनेक दिग्गज देतायत. पण आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना कोहली म्हणाला होता, ”मी स्वतःचं आणि अनुष्काचं मत वगळता इतर कुणाच्या मताला फारसं मनावर घेत नाही.” त्यामुळं त्याच्या लाडक्या रवीभाईंचं तरी तो ऐकतो का हे पाहावं लागेल.

कितीही म्हणलं, तरी…

आयपीएलमध्ये अजून कमीतकमी ६ इनिंग्स बाकी आहेत, आयपीएलनंतर साऊथ आफ्रिका भारत दौऱ्यावर आहे आणि त्यानंतर आहे भारताचा इंग्लंड दौरा. त्यामुळं कोहलीपुढं आपला फॉर्म परत मिळवण्याच्या आणि पुन्हा एकदा रनमशिन हे बिरुद मिरवण्याच्या संधी तर आहेत, त्याला फक्त त्याचं सोनं करता यायला पाहिजे.

कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया जिंकलेली टीम इंडिया त्याला गृहीत धरत नसेल, त्यामुळं संघातलं स्थान टिकवण्यासाठी आणि आपलं राजेपण कायम ठेवण्यासाठी, किंग कोहलीला आयपीएलमध्ये उरलेल्या मॅचेस, आफ्रिका आणि इंग्लंड दौरा… हे अटेम्प्ट क्लिअर करावे लागतीलच.

संपलाय, संपलाय म्हणणाऱ्या लोकांना त्यानं आपल्या बॅटनं उत्तर दिलं नाही, तर कोहली आणि त्याचे फॅन्स या दोघांसाठी नेमाडेंनी लिहिलेली ओळ आहेच…

शेवटचे राजे असतात बुरजावरुन खिन्नपणे क्षितीज न्याहाळत…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.