टाटांनी बदला म्हणून जग्वार कंपनी घेतली तसच छत्रेंनी बदला म्हणून विल्सनची सर्कस घेतली

टाटा मोटर्स आर्थिक पातळ्यांवर डबघाईला आली होती. टाटा मोटर्स विकून टाकावी म्हणून रतन टाटा फोर्ड कंपनीसोबत व्यवहार करण्यासाठी गेले. तिथे त्यांचा अपमान करण्यात आला. समजत नाही तर ऑटो सेक्टरमध्ये का उतरलात अशी विचारणा करण्यात आली.

त्यांनतर टाटांनी टाटा मोटर्स विकण्याचा प्लॅन गुंडाळला व टाटा मोटर्स फायद्यात येण्यासाठी प्लॅन आखण्यास सुरवात केली. 

काळ सरला. काही वर्षांनंतर फोर्ड संकटात आली. फोर्डने आपले जग्वार आणि लॅण्ड रोव्हर ह्या उपकंपन्या विकायला काढल्या, आणि त्या कंपन्या टाटांनी विकत घेतल्या. बिझनेसच्या दूनियेतला हा किस्सा आजही प्रत्येकाला माहित आहे. 

पण असाच एक किस्सा भारतीय सर्कसची मुहूर्तमेढ रोवू शकला हे बऱ्याचजणांना माहित नसेल. 

हा किस्सा आहे, भारतीय सर्कस सुरू करणाऱ्या विष्णुपंत छत्रे यांचा.

सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप येथे १८४६ साली विष्णुपंत छत्रे यांचा जन्म झाला. शालेय शिक्षणातच त्यांना गायनाची आवड निर्माण झाली. मात्र गायन सुरू केल्यानंतर त्यांच्या नशिबी मानअपमानाच नाट्य आलं. शास्त्रीय शिक्षण घ्यावं हा निर्धार त्यांनी याच अपमानातून केला. त्या काळात बनारस, आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर अशी शास्त्रीय संगीताची घराणी होती. ही सर्व घराणी उत्तर भारतातील. शिक्षण घ्यायचं असेल तर उत्तर भारतात जायला हवं हे त्यांनी जाणलं. 

याच काळात विष्णुपंताच लग्न झालं. रामदुर्ग संस्थानात त्यांनी चाबुकस्वारांची नोकरी पकडली. महिना तीन रुपये पगारातून ते पैसै साठवू लागले. त्या काळात २० रुपये गाठीला पडल्यानंतर संगीत शिक्षणासाठी उत्तर भारतात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 

ग्वाल्हेर संस्थानात सरदार बाबासाहेब आपटे हे अश्वविद्या म्हणजेच घोड्यांच्या ट्रेनिंगसाठी त्या काळी प्रसिद्ध होते. अश्वविद्या शिकावी व सोबतच गायनाचे धडे घ्यावेत म्हणून ते ग्वाल्हेर संस्थानात पोहचले. ठरल्याप्रमाणे आबासाहेब आपट्यांकडे अश्वविद्या शिकण्यास सुरवात झाली. 

पुढे ग्वाल्हेर संस्थानातील हद्दूखॉं यांच्याकडे थांबून गायन शिकण्यास सुरवात केली. हद्दूखॉं यांचे वेळोंवेळी दौरे असत. या दौऱ्यांमध्ये विष्णूपंत छत्रे जावू लागले. असेच एकदा यमुना नदी ओलांडत असताना यमुनेस मोठा पूर आला. पूरामध्ये हदूखॉं याचा सारा लवाजमा वाहून जाणार होता. तेव्हा विष्णुपंतांनी त्या पूरात उडी मारून सर्वांचे प्राण वाचवले. हदूखॉं विष्णुपंतांच्या या कामगिरीवर खूष झाले व त्यांना गायन शिकवू लागले. 

एकीकडे अश्वविद्या आणि दूसरीकडे शास्त्रीय गायन, काही काळातच विष्णूपंत छत्रे दोन्ही कलांमध्ये पारंगत झाले. आपल्याकडे सेट होण्याची जी कल्पना आहे त्याचप्रमाणे विष्णूपंत ग्वाल्हेर संस्थानात सेट झाले होते. 

पण या माणसाच्या नशिबात काहीतरी वेगळच लिहलं होतं. 

झालं अस की विष्णूपंत एकदा मुंबईत आले. ते सालं होतं १८८२ चं. त्या काळात सी व्हिल्सन या ब्रिटीश व्यक्तीची सर्कस मुंबईत आली होती. विष्णूपंतांनी ही सर्कस पाहिली. ते सी. व्हिल्सन यांना भेटले. सर्कस कशी चालू करता येवू शकते अस त्यांनी व्हिल्सन यांना विचारलं तेव्हा,

व्हिल्सन म्हणाला, 

सर्कस चालवणं भारतीयांना कधीच जमणार नाही. 

आपल्याकडचे ज्ञान न वाटता उलट त्यांना अवहेलना झेलावी लागली. तिथेच विष्णुपंतांनी स्वत:ची सर्कस उभारण्याचा निर्णय घेतला. दसऱ्याच्या मुहूर्तावर इसवी सन १८८२ रोजी विष्णुपंतांनी चार घोड्यांसह आपली पहिली सर्कस सुरू केली. या सर्कशीचं नाव ठेवलं द ग्रेट इंडियन सर्कस. 

विष्णूपंतांनी सी व्हिल्सन यांच्या तंबूशेजारीच आपला तंबू लावला. काही काळातच व्हिल्सनच्या सर्कशीची गर्दी ग्रेट इंडियन सर्कसीकडे वळली.

व्हिल्सनला आपली सर्कस लिलावात काढावी लागली आणि व्हिल्सनची सर्कस विकत घेणाऱ्यांच नाव होतं विष्णुपंत छत्रे. 

कुर्डवाडीच्या राजांसमोर सर्कशीचा पहिला प्रयोग करण्यात आला. काही काळातच सर्कस भरभराटीला आली. देशभर प्रयोग होवू लागले. सर्कशीचं स्वरूप वाढू लागलं. पाळीव प्राण्यांसोबत जंगली प्राण्यांचा समावेश झाला आणि सर्कशीचं नाव संपूर्ण भारतात गाजू लागलं. 

त्यानंतरचा काळ हा भारतीय स्वातंत्रलढ्याचा, समाजसुधारणांचा होता. छत्रेंची सर्कस या दोन्ही कामांमध्ये अग्रेसर होती. जे क्रांन्तीकारक ब्रिटीश सत्तेच्या विरोधात उठाव करत ते भूमिगत राहण्यासाठी सर्कशीमध्ये येत असत. छत्रे त्यांना लपवून ठेवत असत. त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करत असत. त्याच सोबत ज्या गावात सर्कस जाईल तिथे जागा विकत घेवून पुढे ती शिक्षणसंस्थेला दान देण्याचा पायंडा त्यांनी पाडला. 

सर्कशीचा व्याप वाढला, पैसे वाढले. छत्रे आत्ता गर्भश्रीमंतांच्या यादीत गणले जावू लागले. या काळात संगीताकडे दूर्लक्ष होवू लागले. एके दिवशी त्यांचा दौरा काशी येथे पडला होता. त्यांना समजलं की इथे एक अवलिया गायक राहतो. तो उदरनिर्वाहासाठी गाणं म्हणतो आणि प्रसंगी भिक देखील मागतो. गायकाची अशी परवड होते म्हणून छत्रे या गायकाच्या भेटीसाठी गेले.

समोर पाहतात तर आपल्या गुरूंचा अर्थात हद्दूखॉं साहेबांचा मुलगा रहिमतखॉं गात होता. छत्रे गहिरवले. ते रहितमतखॉं यांना महाराष्ट्रात घेवून आले. त्यांचे गायन छत्रेंनी खऱ्या अर्थाने लोकांसमोर पोहचवे. लोकांनी त्यांना भूगंधर्व किताबाने गौरवले. आयुष्याच्या अखेरपर्यन्त आपल्या गुरूच्या मुलाचा संभाळ त्यांनी केला. 

२० फेब्रुवारी १९०५ रोजी विष्णुपंताचं निधन झालं. या नंतरच्या काळात सांगली, मिरज, तासगाव भागातून अनेक सर्कस विकसित झाल्या. लोक पोटापाण्याला लागली याचं संपूर्ण श्रेय जातं ते विष्णुपंत छत्रे यांना. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.