माज्या भुरग्याक फाटी सारपाक हे चल्ला.
गोव्यामध्ये असणारा वाळपई सत्तरीचा डोंगराळ आणि जंगलाचा परिसर असणारा भाग. कधीकाळी येथे राहणाऱ्या लोकांची परिस्थती आदिवासींहून कठीण होती. 1970 च्या दशकापासून या भागाचा कायापालट होण्यास सुरवात झाली याला कारणीभूत केवळ एकचं नाव होतं ते म्हणजे प्रतापसिंह राणे.
होय…
ऑडिओ टेपच्या नावाखाली टीकेच्या गर्तेत अडकलेल्या गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे वडील. आज कोणी वाळपई सत्तरीला भेट दिली तर तेथे असणाऱ्या साधनसुविधा विकासांसह तेथील, रस्ते, चौक आणि अनेक गाष्टी राणे कुटुंबीयांनी केलेल्या कामाची ग्वाही देतात. या पितापुत्रांना या भागात सिनिअर राणे आणि ज्युनिअर राणे म्हणून ओळखले जाते. इथे अनेकांच्या घरात प्रतापसिंह राणे यांचे फोटो आहेत, तर गेल्या काही दिवसांपासून येथील लोक ज्युनिअर राणेंना म्हणजेच विश्वजीत राणेंना नायक चित्रपटातील अनिल कपूर म्हणून संबोधू लागले आहेत.
त्याला कारणही तसेच आहे. बोल भिडू तुम्हाला फिरवून फिरवून गोष्टी सांगणार नाही, तो तिखट बोलेल पण खरं बोलेल. गोव्याच्या राजकीय वर्तुळाचा, ज्युनिअर राणे केलेल्या कामाचा आढावा घेवून आणि तेथील राजकीय जाणकारांशी बोलल्यांनतर भिडू या निकषावर आला आहे की, राणे यांच्याविरोधात चालू असणारी षडयंत्रे त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाद करण्यासाठी तर नाहीत ना….?
वाचा भिडूचा हा स्पेशल रिपोर्ताज.
फेब्रुवारी २०१८ गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी पडले. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे कळताच भाजपच्या साऱ्या राजकीय वर्तुळात हाहाकार मजला. इकडच्या तिकडच्या चिमण्या गोळा करून जसा थवा तयार केला जातो, तसच भाजपच सध्या गोव्यात कार्यरत असणारं सरकार आहे. २०१८ च्या निवडणुकीत भाजपला केवळ १३ जागा मिळाल्या होत्या आणि कॉंग्रेसला १७. मुख्यमंत्री कोण होणार या वादात काँग्रेसने आपला बराच वेळ घालवला आणि याचाच फायदा घेत भाजपने आजूबाजूच्या स्थानिक पक्षांना घेऊन सत्ता स्थापन केली.
कॉंग्रेसच्या वेळकाढू धोरणांना कंटाळून एका कट्टर काँग्रेसवादी नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांच नाव ‘विश्वजित प्रतापसिंह राणे’.
विश्वजित यांच्या आगमनाच भाजपसह सर्व नेत्यांनी स्वागत केलं खर पण कानामागून आलेला हा नेता मुख्यमंत्रीपदासाठी पात्र होण्या इतपत तिखट होईल याची कल्पना तेव्हा कोणालाच नव्हती. विश्वजीतला त्यांच्या आवडीच क्षेत्र देण्यात आलं. आरोग्य, महिला व बालकल्याण आणि अन्न औषध प्रशासन खात्याची सूत्रे हाती घेऊन विश्वजीत राणेंनी त्यांच्या कामाचा वारू स्वैर सोडला.
पर्रीकर आजारी पडल्यानंतर कामाच्या फायली क्लिअर होत नसल्याची करणे सांगणारे मंत्री आजूबाजूला असताना विश्वजीत झपाट्याने काम करीत होते. Regional Cancer Centre नावाखाली केंद्राकडून निधी आणून गोरगरिबांची कर्करोगाची शस्त्रक्रिया मोफत करून देत होते. टू-व्हीलर अॅम्ब्यूलन्स आणि कार्डिआक अॅम्ब्यूलन्सच जाळ राज्यभरात पसरवलं जात होतं. इतकचं नाही तर गोरगरिबांन आरोग्यविषयक मदत करण्यासाठी एक टीम बसवली होती.
माध्यमांना खरी तीच माहिती मिळावी म्हणून सोशल मिडियाचा वापर केला जात होता. इतर सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याची कारणे देत असताना ज्युनिअर राणे झटत राहिले. एफडीएच्या अंतर्गत त्यांनी किनारपट्टी भागात चाललेल्या अनेक बेकायदेशीर भागांवर स्वतः मध्यरात्री जाऊन धाडी टाकल्या.
त्यांच्या या ‘नायक’ स्टाईलच्या कामाच्या बातम्या येऊ लागल्या. राष्ट्रीय पातळीवर त्याचं नाव इतमामात घेतलं जाऊ लागलं. मुख्यमंत्री पर्रीकरांनी आजारी असतानाही त्यांच्या कामाचं कौतुक करण थांबवलं नाही आणि त्यांच्या युतीमध्ये असणाऱ्या स्थानिक घटक पक्षांतील महत्वाकांक्षी नेत्यांच्या पोटात दुखू लागलं. एकामागून एक डावपेच आपोआप होवू लागले.
ऑगस्ट महिन्यात पर्रीकरांची तब्येत गंभीर झाल्यानं त्यांना अमेरिकेत नेण्यात आले. ते अमेरिकेला गेले आणि इकडे सत्ताबदलाचे वारे जोरजोरात वाहू लागले. पर्रीकरांच्या खुर्चीवर बसण्यासाठी भाजपकडे स्वतःचा असणारा दुसरा मंत्रीच नव्हता. राज्याचे अर्धे मंत्रिमंडळ रुग्णशय्येवर होते. अशातच स्वच्छ प्रतिमा असणारं लोकप्रिय, बिनधास्त आणि पर्रीकरांसारखी निर्णयक्षमता बाळगणारे विश्वजीत राणे याचं नाव पुढ आलं. राणे यांनी स्वतः कोठेही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली नसली तरी माध्यमांनी आणि जनतेने राणे यांनाच मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून प्रमोट केलं आणि इथूनच त्यांच्यावर अडचणींचा एकामागोमाग एक सपाटा सुरु झाला.
हे सगळ कोणी मुद्दाम करीत होत की तो राणेंच्या नशिबाचा भाग होता कोण जाणे. पण भिडूच्या मते या सगळ्या राजकीय षडयंत्राचा फायदा राणेंच्या विरोधकांना झाला.
सप्टेंबर महिन्यात त्यांच्यावर पहिला आघात झाला. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागृहात ठेवलेले जानुस गोन्साल्विस नावाच्या २३ वर्षीय तरुणाचे प्रेत गायब झाले. बेवारस समजून त्याला अग्नी देण्यात आल्याचे कारण व्यवस्थापनाने दिले मात्र असे कसे प्रेत गायब झाले या प्रश्नासह ‘गायब झाले की मुद्दाम गायब करण्यात आले’ हा प्रश्न राजकीय जाणकारांना पडल्याचे ते सांगतात. याचे कारणही देखील तसेच आहे.
१९६१ साली या महाविद्यालयाची स्थापना झाली मात्र आजवर असं काहीच घडलं नव्हत, झालं तेही राणे याचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आल्यावरच. राणे यांच्यावर अवयव विक्री केल्याचे आरोप होवू लागले. या सगळ्याची तमा न बाळगता राणे यांनी जाहीरपणे गोन्साल्विस कुटुंबियांची माफी मागितली. आणि एका झटक्यात तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले. राणे यांच्या निर्णयक्षमतेचं गोवेकरांनी यावेळी भरपूर कौतुक केलं. पण या प्रकरणाचा पुरेपूर फायदा काँग्रेससह राणेंच्या पक्षांतर्गत असणाऱ्या विरोधकांनी त्यांची बदनामी करण्यासाठी घेतला. या प्रकरणानंतर राणे यांनी इलेक्ट्रॉनिक शवागृहाचे प्रपोझल लोकांसमोर आणलं, ज्याचे काम सध्या जोरात सुरु आहे.
या प्रकरणापूर्वी जुलै २०१८ रोजी मडगावमधील एका मासळी बाजारपेठेवर एफडीएन रेड घातली होती, ते शांत झालेलं प्रकरण काँग्रेसन आणि विरोधकांनी ऑक्टोबरमध्ये अधिक प्रमाणात उकरून काढलं. राज्याबाहेरून येणाऱ्या आणि राज्यातील मासळीविक्रेत्यांनी एफडीएच्या सर्व कायद्यांचे आणि नियमांचे पालन करायला हवे असा तगादा राणेंनी लावला. राज्यात येणारी मासळी अवैध नसावी हा या मागचा हेतू होता. अनेकांकडे याबाबतीतले परवाने नव्हते कारण आजवर स्थानिक नेत्यांचे खिसे भरत हा व्यवसाय त्यांनी चालवला होता. गोव्याच्या इतिहासात सर्वप्रथम राणेंनीच बाहेरून राज्यात आणल्या जाणाऱ्या विनापरवाना मासळीच्या गाड्या बोर्डरवर जावून अडवल्या. स्थानिक नेत्यांना जाणारे हप्ते बंद झाले, मासळीविक्रेते चिडू लागले. महाराष्ट्रातील मासळी गोव्यात यावी म्हणून महाराष्ट्रातील मंत्र्यांचे राणेंना फोन येवू लागले. सिंधुदुर्गातील निलेश राणेंनी तर त्यांना खुलेआम धमकी दिली पण विश्वजीत राणे डगमगले नाहीत. राज्यात मासळी इन्सुलेटेड वाहनातून येवू लागली.
जुलै पासून थैमानणारं हे प्रकरण आता कोठे शांत होतय तोवर ही क्लिप बाहेर आलीय.
‘भाजप’चं नाव बदनाम असलं तरी पक्षात काम करणारा व्यक्ती प्रत्येकवेळी नक्कीच चुकीचा नसतो. मी भाजपचा मंत्री असून येथून पुढे याच पक्षात कार्यरत राहणार असल्याचे सांगत काल राणे यांनी पक्ष बदलाच्या अफवांना पूर्णविराम दिला.
या क्लिपमधला आवाज माझा नसून मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याची तयारी राणे यांनी जाहीरपणे बोलतानाही दाखवली. राणे यांच्या समर्थकाचा अद्यापही त्यांच्या नेत्यावर विश्वास आहे.
या प्रकरणात वाळपईमधील ७० वर्षीय आजी म्हणाल्या,
“माज्या भुरग्याक फाटी सारपाक हे चल्ला”
म्हणजे माझ्या मुलाला मागे पाडण्यासाठी हे सगळ सुरु आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्री विश्वजीतच आहे.
मुख्यमंत्रीपदावरून बाद करण्यासाठी राणे यांच्यावर कटकारस्थाने होवू लागली तरी काम बोलते, ऑडियो क्लिप नाही. आजच नाही तर पुढेही राणे कधीच निवडणुकीत पराजित होणार नाहीत याची प्रचीती समस्त गोव्याला आहे पण त्याचं काय ज्यांनी ही कारस्थान आता केली आहेत मात्र पुढील हंगामात काठावर निवडून येण्याचीही शाश्वती नाही. बाकी जनता कुछ देर बाद सबकुछ भूलती है, हमेभी भुलना चाहिए सिर्फ काम देखना चाहिए.
हे ही वाचा.
- या पाच फोटोंनी गोव्याच्या राजकारणात फोटो राजकारणाला जन्म दिलाय.
- टीका करणारे विरोधक अनेक असले तरी पर्रीकरांना खुलं आव्हान देण्याची टाप कोणाच्यातच नाही !