दूसऱ्या महायुद्धाचा एकमेव फायदा म्हणजे ही WILLYS जीप…

जीप म्हणायचं, कमांडर म्हणायचं का Willys म्हणायचं….?

लय मोठ्ठा प्रश्न आहे भिडू. तोंडात येईल ते नाव घेवून आपण रिकामं होतो आणि घोळ होतो. म्हणजे महिंद्रा थार वेगळी, महिंद्रा कमांडर/मेजर वेगळी आणि Willys वेगळी पण दिसायच्या बाबतीत सगळ्या जीपच.

मग या प्रकाराला जीप म्हणायचं का? आणि जीप म्हणायचं झालं तर JEEP कंपनीचं कस करायचं.  

जगात लय घोळ आहेत. आमच्या पातळीवर आम्ही हे घोळ निस्तरण्याचे प्रयत्न करत असतोय. असाच घोळ या गाड्यांचा. कशाला काय म्हणायचं त्याहून महत्वाचं आहे हे Willys गाड्या कशा असतात तो प्रश्न.

आजच्या लेखात आपण याच एकेका प्रश्नांची उत्तर रितसर घेवून कार्यक्रम पार पाडणार आहोत.

तर पहिला चित्रात दिसणाऱ्या गाड्यांचे हे प्रकार नेमके कोणकोणते आहेत.

पहिली आहे W I L L Y S या गाडीकडं पाहील्यानंतर अमेरिका आणि दूसरं महायुद्ध आठवून जाईल. दूसऱ्या महायुद्धात ज्या तीन महत्वाच्या शस्त्रांचा उल्लेख केला जातो त्यात ही WILLYS सामिल होतात.

Screenshot 2020 07 29 at 10.45.58 PM

मुळात जीप या संकल्पनेचा उदयचं या गाडीमुळे झाला. झालेलं अस की अमेरिकेच्या ऑर्डनन्स डिपार्टनेंटचे चीफ इंजिनियर असणाऱ्या विल्यम बिसले यांनी बसल्या बसल्या एक कल्पनाचित्र रंगवलं. युद्धात अशा प्रकारची गाडी आपणाला साकारता येईल. जेणेकरून त्यावर माल लादणं, लोकांना घेवून जाणं, डोंगराळ भागापासून दलदलचीच्या भागातून पटकन सुसाट सुटण्यासाठी त्यांनी हे कल्पनाचित्र रंगवलं.

आत्ता विल्यम बिसले यांनी आपलं कल्पनाचित्र वेगवेगळ्या कंपन्यांना पाठवून युएस आर्मीसाठी अशी गाडी करण्यासाठी १३५ मोटार कंपन्यांकडून प्रस्ताव मागितले. या १३५ कंपन्यांपैकी दोनच कंपन्या अशी टाईपच्या गाड्यांच प्रोटोटाईप मॉडेल करण्यासाठी तयार झाल्या.

त्यापैकी एका कंपनीचं नाव होत अमेरिकन बॅंटम आणि दूसऱ्या कंपनीचं नाव होतं विलीज ओव्हरलॅंड  

इथे गंम्मत अशी होती की हे मॉडेल तयार करण्यासाठी फक्त ४९ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. तेव्हा अमेरिकन बॅंटम ही कंपनी बुडीत निघाली होती. कंपनीत फक्त १५ माणसं काम करायची. विशेष म्हणजे या १५ जणांच्यात एकपण इंजिनियर नव्हता. तरिही कंपनीने ही जबाबदारी घेतली.

Screenshot 2020 07 29 at 10.57.38 PM

त्यांनी डेट्रॉइटहून कार्ल प्रोब्स्ट नावाच्या खास माणसाला बोलवलं. दिवस संपत आले. शेवटच्या अर्ध्या तासात या माणसाने कल्पनाचित्राप्रमाणे गाडी तयार करून दाखवली. सैन्याने मग या गाडीच्या चाचण्या घेतल्या. कल्पनेपेक्षा गाडी भारी होती. गाडीला हिरवा कंदिल मिळाला.

त्याच वेळी या स्पर्धेत व्हिलीज ओव्हरलॅंड आणि फोर्ड मोटरला पहायला मिळालं. त्यांनी काय केलं तर अशाच प्रकारचं मॉडेल तयार केलं. साहजिक तिन्ही मॉडेल दिसायला सारखीच होती. आर्मीने मग तिन्ही कंपन्यांना टेंडर वाटून दिले. हक्क तिन्ही कंपन्याकडे राहिला पण मुळ कल्पना मांडली ती अमेरिकन बॅंटम यांनीच.

काळ दूसऱ्या महायुद्धाचा होता. अशा गाड्यांची आवश्यकता तर मोठ्या प्रमाणात होती. मोठ्या प्रमाणात मिळालेली ऑर्डर पूर्ण करण्याची क्षमता फक्त व्हिलीज ओव्हरलॅंड आणि फोर्ड यांच्याकडेच होती. त्यामुळे ऑर्डर मिळून देखील उत्पादन वाढवता न आल्याने अमेरिकन बॅंटम कंपनी स्पर्धेतून बाहेर होत गेली.

दूसरीकडे व्हिलीज कंपनीने आपल्या मिळालेला सर्वात मोठ्ठा चान्स म्हणून गाड्यांचे उत्पादन सुरू ठेवले. अमेरिकेने आपल्यासोबतच मित्र राष्ट्रांना या गाड्या वाटण्याचा सपाटा सुरू ठेवला आणि १९४० ते ४५ या पाच वर्षात सुमारे ६ लाख ५० हजार गाड्यांच उत्पादन घेण्यात आलं.

सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे कोणत्याही चारचाकी गाडीचं जगभरात सर्वात जास्त उत्पादन हे WILLYS चं झालं होतं.

तेव्हा भारत देखील ब्रिटीश छत्रछायेखाली असल्यामुळे सैन्याकडे या WILLYS आल्या. पुढे या सैन्यातून खाजगी व्यक्तींकडे आल्या. आजही एखाद्या गावात एखादा माणूस तूम्हाला LEFT HAND DRIVE लिहलेली व्हिलीज चालवताना दिसतो. कमांडर, थार या नंतर आलेल्या गोष्टी या व्हीलीज सारख्या तयार करण्यात आल्या पण खरी जाण तर व्हिलीज आहे. पंजाब सारख्या भागात मॉडिफाय करुन आजही व्हिलीज वापरल्या जातात.

आत्ता प्रश्न पडतो व्हिलीज् ने अशा प्रकारची पहिली गाडी आणली असताना जीप हे नाव कस पडलं.

तर जीप या नावाबद्दल वेगवेगळ्या थियरी आहेत. त्यातली जवळची थेअरी म्हणजे ई.सी. सेगर यांच्या थिंबल थिएटर आणि पॉपेय द सेलर या कॉमिक्समध्ये युजीन द जीप नावाचे पात्र होते. या पात्राकडे जादूई ताकद होती. ते कुठूनही कुठे जावू शकत असे. व्हिलीज् , फोर्ड यांच्या असणाऱ्या या प्रोटोटाईपच्या गाड्या देखील अशाच होत्या.

१९४१ साली व्हिलीज् कंपनीचा ड्रायव्हर आयर्विन हाऊजमान यांने पत्रकारांना या गाडीचा डेमो दाखवला होता. तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी या गाडीचं नाव जीप अस सांगितलं.

दूसऱ्या दिवशी कॅथरीन हिलीयर यांनी वॉशिंग्टन डेली न्यूज मध्ये या गाडीवर एक लिहला. या लेखात गाडीचा उल्लेख जीप असा करण्यात आला. लेखाची जगभरात चर्चा झाली आणि जीप हेच नाव फेमस झालं.

पुढे व्हिलीज् कंपनीने जीप हे नाव रजिस्टर करून घेतलं आणि आपली कंपनी जीप या नावानेच सुरू केली. कंपनीच्या पुढच्या सर्व मॉडेलवर जीप हे नाव चिटकल ते कायमचं.

आत्ता महिंद्रा मेजर, थार, कमांडर या गाड्यांना जीप का म्हणतात हा मुळ प्रश्न?

तर महिंद्रा कंपनीची स्थापना आत्ताच्या आनंद महिंद्रांचे आजोबा जगदिश चंद्र महिंद्रा आणि मलिक गुलाम महमंद यांनी १९४५ साली केली. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि मलिक गुलाम महमंद पाकिस्तानात गेले. ते पुढे पाकिस्तानचे फायनान्स मिनिस्टर झाले. इकडे जगदिशचंद्र महिंद्रा यांनी कंपनीच नाव महिंद्रा ॲण्ड महिंद्रा केलं.

Screenshot 2020 07 29 at 10.49.23 PM

सुरवातीच्या काळात ही कंपनी स्टील बिझनेसमध्ये होती. तिथे जम बसल्यानंतर कंपनीने व्हिलीज/जीप कडून भारतासाठी प्रोटोटाईप विकत घेतलं आणि भारतीय मार्केटसाठी जीप सारख्या गाड्यांच उत्पादन करण्यास सुरवात केली.

त्यामुळे जून्या काळातल्या जीप असो किंवा आजच्या बलेरो किंवा स्कॉर्पिओ या जीप च्या प्रोटोटाईपमध्येच दिसतात. हा करार फक्त भारतासाठी होता त्यामुळेच थर अमेरिकेत लॉन्च झाल्यानंतर महिंद्रा कंपनीला माघार घ्यावी लागली. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.