भारतीयांच्या हातात आलेलं पहिलं रॉकेट यामाहा RX 100 होतं..!  

मॅच कोण जिंकणार ? निवडणूकीत सीट कुणाची येणार ? 

अरे !! कोणीही जिंकेना आणि कोणीही का येईना. आव्वाज फक्त एकच…

पुंगळी काढलेल्या RX100 चा.

पुंगळी काढली की पोलीस धरणार हे फिक्स. तरी भिडू लोकं गाड्या पळवायला ऐकत नाहीत. एक दिवसाचा जल्लोष म्हणत १९८५ पासूनच्या खासदार, आमदार, झेडपी, पंचायत, ग्रामपंचायत असलं काहीही मारल तरी एकच आवाज आसमंतात घुमायला सुरू होतो. तो

आवाज RX100. 

तसही पुंगळी काढलेल्या गाड्या पोलीसांनी पकडायच्या ठरवल्या तरिही गाडीचा आव्वाज जबराटच. बुलेटसारखा ठोका नाही की, एझडी सारखं बुदूकबुदूक नाही. 

एक ऱ्हिदम.. एक आवाज… 

RX100 भारतात आली तेव्हा भारतात राजीव गांधी पंतप्रधान होते. नव्या स्वप्नांच्या दिशेने भारत पाऊल टाकत होता. रॉकेट सायन्स असल्यासारख कॉम्प्युटर बद्दल संपादकिय लेख येत होते. भारताच्या मार्केटमध्ये बुलेट, एझडी देखील सेट होती. आत्ता भारतं नवं शोधत होता. पोरं खेड्यातून वकिली, डॉक्टरी, मास्तरकी करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी सेट होत होते. त्याच काळात बजाजच्या स्कुटरनं त्यांना व्यवस्थित हेरलेलं. चौकोनी कुटूंबासाठी स्कुटर परफेक्ट होती.

नव्या पिढीकडे तेव्हा गावसकर होता. विडींजच्या प्लेअरच्या काळातून ती पिढीं बाहेर आलेली होती. याच गावसकरच्या वेगाचं रॉकेट आपल्या पब्लिकला हवं होतं.

अशा वातावरणात जपानवरुन थेट आपल्या देशात एक रॉकेट पडलेलं. RX100 अस त्याचं नाव. प्रत्येक गोष्टीला इतिहास असतो. या रॉकेटला देखील प्लॉफ असण्याचा एक इतिहास होता.

1973 साली जगामध्ये एक जबरदस्त बाईक लॉन्च झालेली. RD350. यामाहा RD350 या बाईकने तेव्हा रॉकेटचा किताब मिळवलेला. पुढच्या दहा वर्षांनंतर त्यांनी आपल्या गाड्या भारताच्या दिशेन वळवल्या होत्या. पण मुळात भविष्याकडे पाहणारा भारत तसा गरिबच होता. भारताच्या एस्कॉर्ट ग्रुपबरोबर भारतात आलेली RD350 सुपर प्लॉप ठरली. किंमत आणि वेग हे तेव्हाच्या काळात न जुळणारं गणित आरडीमध्ये होते. भारतात येताना ती राजदूत 350 या नावाने दाखल झालेली. 

दोन वर्षांच्या सुपर प्लॉफ अनुभवानंतर यामाहाने भारतात RX100 लॉन्च करण्याचा निर्णय धेतला. 1985 साली भारतात जपानवरुन खास 5000 गाड्या मागवण्यात आल्या. 

या गाडीचं वजन होतं 98 किलो. इंजिन 100 CC, 11 BHH टुस्ट्रोक एअर कुल्ड सिंगल सिलेंडर, 7,500 चा RPM… 

या गाडीचा स्पीड जायचा 100. 

100 हा आकडा तेव्हा अशक्य होता. भविष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींची चर्चा होत होती पण त्या भविष्याकडे 100 च्या स्पीडनं घेवून जाण्याचा दम या गाडीत होता. 

RX100 न मार्केटमध्ये धुरळा उठवलां. तेव्हा या गाडीची किंमत होती 19,000 च्या दरम्यान. 85-90 सालचे सुमारे वीस हजार म्हणजे माळावरचे सहज दोन एकर असतील. या किंमतीला देखील माणसांनी त्याच्यावर उड्या मारल्या. गाडीने मार्केट पकडलं. 

गाडीच्या वेगाची चर्चा देशभर होती. यामाहाने 100 CC सांगून मोठ्ठं इंजिन दिल्याचे आरोप होत होते. या गाड्यांचं इंजिन खोलून नक्की किती सीसी ते देखील तपासण्यात आलं. सुरवातीला तीन कलरमध्ये असणारी गाडी हळुहळु इतर रंगात देखील मिळू लागली. 

Screen Shot 2018 11 29 at 12.48.42 PM
facebook

गाडीच्या वेगामुळ ती नव्याने गुंड झालेल्या तरुण पोरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू होती.

मुंबईच्या क्राईममध्ये देखील गोळ्या घालून पळून जाण्यासाठी RX सर्वात जवळची गाडी होती. कॉलेजच्या मुलांच्यात गाडी फेमस होती. सगळ्या निवडणुका RX 100 च्या आवाजावरच घुमू लागल्या होत्या. 

दरम्यानच्या काळात भारत रांगायचं सोडून उभा राहू लागला होता. राजीव गांधींच्या नंतरच्या काळात राव आणि मनमोहन सिंग यांच खाऊजा धोरण आलेलं. जगासाठी भारताचं मार्केट मोकळं होतं होतं. आणि नवनवं तंत्रज्ञान भारतात पोहचल होतं आणि त्याच बरोबर जागतिक पर्यावरणाचे नियम देखील. अशाच नियमांच उल्लंघन केल्याचा फटका RX100 ला बसू लागला. 

1996 च्या सुमारास भारत जागतिकीकरणात सेट झाला होता, आणि तेव्हाचं RX100 न भारताला विदाई दिली. कंपनीने गाडी बंद केली. आत्ता अधूनमधून गाडीच्या पुंगळ्या निघाव्यात तश्या नवी RX 100 मार्केटमध्ये येण्याच्या अफवा येत असतात पण अजूनतरी ते काही खरं नाही..

असो कितीही गाड्या आल्या तरी जोपर्यन्त भारतात लोकशाही पद्धतीवर इलेक्शन होतं राहतील तोपर्यन्त RX100 च्या आवाजावर तो विजय साजरा करण्यात येईल हा विश्वास आम्हाला आहे.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.