इंदिरा गांधींकडून आलेली मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारणारे यशवंतराव मोहिते एकमेव नेते होते.

एक दिवस यशवंतराव मोहित्यांना इंदिरा गांधी यांनी सांगितले, “तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा”. वास्तविक  मोहित्यांना मुख्यमंत्री पदावर बसवून यशवंतराव चव्हाण यांना शह दयायचा इंदिरा गांधी यांचा हेतू होता.

मात्र शेतकरी कामगार पक्षात जडणघडण झालेले मोहिते इंदिरा गांधींना म्हणाले,

“महाराष्ट्रात एकदा धनाजी संताजीची दुही झाली.त्याचे परिणाम सगळ्या मराठी मुलुखाला भोगावे लागले. आता तसं होणार नाही.”

मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून दिल्लीतल्या चहावाल्याकडे सुद्धा वशिला लावण्याचा प्रयत्न करणारे अनेक नेते यमुनेच्या दिशेने गेले. अनेकदा त्याना गंडवले गेलं. पण यमुनेच्या काळ्या डोहाचा तळ भल्या भल्याना लागला नाही. पक्षाने मुख्यमंत्रीपद नाकारले गेलेले नेते अनेकजण भेटतील. जिल्ह्याजिल्ह्यात भेटतील.

पण पक्षाकडून म्हणजे खुद्द इंदिरा गांधी यांच्याकडून आलेली ऑफर नाकारणारे यशवंतराव मोहिते मात्र एकमेव होते.

कराडजवळील रेठऱ्यात इंजिनवाल्याच घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरात यशवंतराव मोहिते यांचा जन्म झाला. आता त्या घराला इंजिनवाल्याचे घर का म्हणायचं? तर पूर्वी मोटेने पाणी उपसलं जात होत. पण त्या गावात मोहित्यांनी डिझेलवर चालणार इंजिन आणलं. त्याच लोकांना कौतुक होत.

सुरुवातीला मोहित्यांच्या मळ्यात गावातील लोक इंजिनातून पाणी कसं वर येतंय हे बघायला जात होती. मग या घराचं नाव ‘इंजिनवाल्याचं घर ‘असच पडलं.

गावाच्या चार पावलं पुढं असलेल्या या घराला शिक्षणाच महत्व समजलं असल्यानं त्यांच्या वडिलांनी त्याना चांगलं शिक्षण दिल. अगदी त्याकाळातसुद्धा यशवंतराव शिकायला कोल्हापूरला होते. याच काळात त्यांच्यातला राजकीय सामाजिक कार्यकर्ता जागा झाला. तालीम संघाचे ते अध्यक्ष झाले.

त्यासोबत त्यांनी कोल्हापुरात द्रष्टया नावाचे वृत्तपत्र सुरु केले.

मोहित्यांना लोक भाऊ म्हणायचे. भाऊ पुढे शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत अग्रभागी राहिले. याच पक्षाकडून त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून विधानसभा लढवून विजयी झाले. विधिमंडळात अभ्यासू भाषणे करणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा दबदबा तयार झाला.

कार्ल मार्क्स, महात्मा फुले यांच्या विचारावर त्यांची निष्ठा होती. त्याच भूमिकेतून ते आपली भूमिका मांडत होते. सरकारला धारेवर धरणारा आमदार अशी त्यांची काही कालावधीत ओळख झाली.

काँग्रेस पक्ष बळकट व्हावा असा प्रयत्न तत्कालीन काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण करत होते, त्याचवेळी त्यांच्याच शेजारच्या मतदारसंघात मात्र मोहिते हे विरोधी पक्षाचे आमदार होते. राज्यभर काँग्रेस मजबूत असताना कराडच्या राजकारणात मात्र काँग्रेस आणि शेकाप बरोबरीत होते. काटा कुस्ती होती.

मग चव्हाण यांनी पंडित नेहरूंच्या मार्फत मोहिते यांना आग्रह करून काँग्रेसमध्ये नेले.

काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांना गृह, अर्थ ,सहकार यासारख्या महत्वाच्या खात्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली . त्यांनी मंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयाची सुस्ती पंडित नेहरू यांच्यानंतर राजकारणात सक्रिय झालेल्या इंदिरा गांधी यांनीही केली होती. काही काळानंतर इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात मतभेद व्हायला लागले  . त्यावेळी इंदिराजींनी चव्हाणांच्या यशवंतरावांना शह दयायला त्यांच्याच बांधाला बांध असलेल्या मोहित्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली.

मात्र मोहिते यांनी ‘विचार करून सांगतो. ‘असं उत्तर न देता तिथेच ,”महाराष्ट्रात एकदा धनाजी आणि संताजीत दुही झाली होती. त्याची फळ महाराष्ट्राला भोगावी लागली होती. आता तसं होणार नाही. “असं सांगून चालून आलेलं मुख्यमंत्रीपद नाकारल होतं. ही गोष्ट आता खूप जुनी झाली आहे.

(संपत मोरे यांच्या फेसबुकवरून साभार)

हे ही वाच भिडू.