वडिलांचं ऐकलं असतं तर कपिल शर्मा आज BSF मध्ये असता…

आजारी माणसाला लवकर बरं करण्याचं साधन म्हणजे हसणं. हसण्याने लोकं जास्त दिवस जगतात असं म्हणतात. त्यातही लोकं कामधंदे करुन दमून भागून येतात आणि थकवा घालवण्यासाठी टिव्ही चालू करतात ,आता फोन उघडतात तेव्हा कॉमेडी काहीतरी त्यांना पाहायचं असतं आणि आपसूक कपिल शर्मा शो लावण्याकडे लोकांचा कल असतो. म्हणजे आता कपिल शर्मा शो माहिती नाही असा व्यक्ती सापडणं तसं अवघडच. टॉप इंडियन कॉमेडियनमध्ये म्हणा किंवा जागतिक पातळीवर म्हणा पण कपिल शर्मा हा कॉमेडीच्या बाबतीत सगळ्यांनाच जड जाणारा भिडू आहे.

पण हा कपिल शर्मा एके काळी वडिलांच्या सांगण्यावरून बीएसएफ मध्ये जाणार होता त्याबद्दलचा हा किस्सा.

कपिल शर्मा मुंबईत येण्याअगोदर पंजाबमध्ये स्ट्रगल करत होता. अंगात टॅलेंट होतं पण त्या टॅलेंटला तशी पुरेपूर संधी मिळत नव्हती. त्यात भरीस भर म्हणून कपिल शर्माचे फादर हे पोलिसात होते. ज्यांचे वडील पोलिसात असतात त्यांनाच त्यांचं दुःख माहिती असतं. जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे म्हणतात ते उगाच नाही. कपिल शर्माचे वडील पोलिसात होते तर काका आर्मिमध्ये होते आता अशी दोन तगडी मंडळी घरात असताना कपिल शर्माची कॉमेडी करण्याची डाळ काय घरात शिजणारी नव्हती.

कपिल शर्माने घरात आपला हा प्रस्ताव बोलून दाखवला की मला मुंबईत जाऊन काम मिळवायची आहेत आणि बॉलिवूड मध्ये काम करायचं आहे, कॉमेडियन, अभिनेता व्हायचं आहे. यावर जस सगळ्यांच्या घरचे रिॲक्ट होतात तसेच कपिल शर्माच्या घरचे लोक रीॲक्ट झाले की गप आपला दुसरा कामधंदा शोध, उगाच हे नसले लफडे करू नको. सुखाचे दोन घास खाता येईल अशी नोकरी धर. मग कपिल शर्माचे वडील म्हणाले की ,

बाळा तू एक काम कर बीएसएफ जॉईन कर , पोलीस हो किंवा मिलिटरीमध्ये जा. कपिल शर्माने घरच्यांचा हा प्रस्ताव मान्य केला आणि त्याने BSF ची परीक्षा दिली, पोलीस भरतीसुध्दा दिली.

पण जे काम आवडत ते केलं पाहिजे या आपल्या निर्णयावर कपिल शर्मा ठाम होता. मोठ्या हिंमतीने तो मुंबईत आला. स्ट्रगल करू लागला. कॉमेडी सर्कस सारख्या शोने त्याला डोक्यावर घेतलं आणि कपिल शर्मा सेलिब्रिटी बनला. कृष्णा अभिषेक, सुदेश लाहिरी, भारती अशा तगड्या विनोदी लोकांना तो भारी पडत गेला. विनोद करणे म्हणजे तगडा कंटेंट लोकांना उपलब्ध करून देणे याचं गणित कपिल शर्माला कळल होत. मोठ्या हुशारीने त्याने आपलं आगमन धडाक्यात असणार आहे याची कल्पना लोकांना दिली होती. पुढे कॉमेडी सर्कस आणि बऱ्याच इतर शो मधून कपिल शर्मा स्ट्रगल करत राहिला, बक्षीसं मारत राहिला आणि याचं स्ट्रगलमधून एक जब्र्या कपिल शर्मा देशाला पाहायला मिळाला.

अशा स्ट्रगल मधून शिकत शिकत कपिल शर्माने स्वतच्या नावाचा द कपिल शर्मा शो सुरू केला आणि त्याने लोकांच्या काळजात जागा मिळवली. आजही कपिल शर्मा शो लोकं आवर्जून पाहतात. आता कपिल शर्मा बॉलिवूडमध्ये हिरोसुध्दा आहे. पण एके काळी वडिलांच्या सांगण्यावरून बीएसएफ जॉईन करणारा कपिल शर्मा आज देशाला हसवणारा कॉमेडियन म्हणून देशाला पाहायला मिळाला ही भारी गोष्ट.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.