एबीपी माझाची जाहिरात बंद करणारे कॉटन किंगचे प्रदीप मराठे आहेत तरी कोण?

गेल्या दोन दिवसापासून एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे कॉटन किंग या कपड्यांच्या ब्रँडचे मालक प्रदीप मराठे हे एबीपी माझा ही वृत्तवाहिनीवर सुरु असलेल्या आपल्या कंपनीच्या जाहिराती बंद करत असल्याचे सांगत आहेत.

काय आहे नेमका वाद? कोण आहेत प्रदीप मराठे आणि त्यांचा कॉटन किंग ब्रँड?

पुण्याच्या सुप्रसिध्द कर्वे रोडवरच्या नळस्टॉप चौकात १९९६ साली एक दुकान सुरु झाले. या दुकानाचे मालक होते मुळचे मिरजेचे प्रदीप मराठे. सांगलीच्या वालचंद मधून पास आउट झालेले मेकॅनिकल इंजिनीअर शिवाय एमबीए मार्केटिंग. पण किर्लोस्करसारख्या मोठ्या कंपनीमधली  मोठ्या पगाराची नोकरी मन न रमल्यामुळे सोडली आणि हे कॉटनच्या कपड्यांचं दुकानं सुरु केलं.

प्रदीप मराठे यांना स्वतःला कॉटन कपड्यांची आवड होती पण त्याकाळी पुण्यात त्यात व्हरायटी मिळायची नाही. त्यामुळे त्यांनी  सुरवातीला देशभरातल्या वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे तिथे विकायला ठेवले. पण वेगवेगळे ब्रँड असल्यामुळे किंमतीमध्ये देखील बरीच तफावत असायची. यामुळे मराठे यांना मनाजोगत्या किंमतीने कपडे विकता येत नव्हते.

अखेर त्यांनी स्वतःच्या ब्रँडखाली कपडे बनवण्यास सुरवात केली. त्याला आपल्या दुकानाचं नाव दिलं ‘कॉटन किंग’ !!

१९९८ साली एका शिलाई मशीनवर कॉटन किंगचा प्रवास सुरु झाला.  मध्यमवर्गीयांना खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये उत्कृष्ट दर्जाचे कपडे या ख्यातीमुळे अल्पावधीतच हे दुकान पुण्यामध्ये प्रसिद्ध झाले. ग्राहकांची आवडनिवड यानुसार बदल करत गेल्यामुळे आधी फक्त फॉर्मल कपडे बनवणारे कॉटन किंग कॅज्युअल शर्ट, टीशर्ट जीन्स देखील बनवू लागले.

प्रदीप मराठे एवढ्यावरच थांबले नाहीत.आमची शाखा कोठेही नाही याचा वृथा अभिमान बाळगणाऱ्या मराठी बाण्याला त्यांनी बाजूला ठेवले आणि  तर आपल्या दुकानाच्या फ्रँचाइजी देण्यास सुरवात केली. २००४ साली लक्ष्मी रोडला पहिले कॉटन किंग फ्रँचाइजी दुकान सुरु झाले. पाठोपाठ पुण्यात अनेक जागी ही दुकाने दिसू लागली.

या सगळ्या दुकानांना पुरवठा करता यावा म्हणून पुण्याजवळील बारामती येथे ८४००० स्क्वेअर फुटाच प्रचंड मोठ मॅन्यूफॅक्चरिंग युनिट सुरु करण्यात आलं. सगळे कपडे एकाच छताखाली एकाच दर्जाचे बनू लागले. 

कॉटन किंग सुरु होऊन वीसच्या वर वर्षे झाली.आज कॉटन किंग हा ब्रँड परदेशी ब्रँडशी स्पर्धा करताना दिसतोय. त्यांचे शेकडो फ्रँचाइजी दुकाने फक्त महाराष्ट्रातचं नव्हे तर गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश,मध्यप्रदेश इथेही पसरलेले आहेत. शिवाय ऑनलाइनक्षेत्रात ही विक्रीचे अनेक विक्रम या ब्रँडने केले आहेत. वेगवेगळ्या टीव्ही सिरीयल, कार्यक्रम, इव्हेंट्स यांना कॉटन किंग स्पोन्सर करते.

असे हे सुप्रसिध्द उद्योजक प्रदीप मराठे दोन दिवसापासून व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलेत. त्यांनी या व्हिडीओ मध्ये एबीपीमाझा चॅनलने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीला घेतलेल्या “सावरकर नायक की खलनायक” या कार्यक्रमाबद्दल आपत्ती दर्शवली. आणि त्या चॅनलला सुरु असलेल्या कॉटन किंगच्या जाहिराती बंद करत असल्याचे सांगितले.

ABP माझाला पहिला दणका..कॉटन किंगने ABP माझाची जाहिरात केली बंद.सावरकरांची बदनामी करणारा कार्यक्रम सादर केल्याबद्दल ABP माझाच्या आर्थिक मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्या जाहिरातदारांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्याच्या कॉटन किंग या कंपनीच्या श्री.प्रदीप मराठे यांनी ABP माझाला जाहिरात देणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ABP माझाच्या इतर जाहिरातदारांशीही संपर्क साधण्यात आला असून त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.ABP Majha ABP Live

सावरकरी ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಜೂನ್ 12, 2019

प्रदीप मराठे यांची भूमिका बरोबर चूक याबद्दल अनेक उहापोह झाले आहेत. अनेकांनी त्यावर टीकाही केली आहे. मात्र त्यांची भूमिका घेण्यास त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.

त्यातील राजकीय बाजूकडे काही काळ दुर्लक्ष केले तर एका छोट्याशा दुकानातून सुरु झालेला कॉटन किंग आज आपण एखाद्या चॅनलला जाहिरात लावायची की नाही हे ठरवण्याइतपत मोठा झालाय हे नक्कीच. त्यांचा हा प्रवास स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या नवउद्योजकांना प्रेरणादायी आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.