आंबेडकर म्हणाले ,”श्रीधर टिळक हाच खरा लोकमान्य”.

 

“केसरी  हातात आला तर महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दाखवून देईन.”

– श्रीधर बळवंत टिळक म्हणजेच लोकमान्यांचे धाकटे चिरंजीव.

लोकमान्य टिळकांना दोन मुले होती. रामराव टिळक आणि श्रीधर टिळक. दोघेही आधीपासून बंडखोर स्वभावाची.  आगरकरांशी टिळकांचा असलेला वैचारिक वाद अख्या महाराष्ट्राला माहित होता त्या काळात आपण आगरकरवादी असल्याचं छातीठोक पणे म्हणणारे असे हे श्रीधर टिळक.

पुरोगामी विचारांचा वारसा या दोन्ही बंधूनी जपला होता.

श्रीधरपंतांच्या लग्नावेळी पुण्याच्या कर्मठ ब्राम्हणांनी परदेशगमन करून आल्याबद्दल लोकमान्यांना पंचगव्यप्राशनाचे प्रायश्चित्त घेण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी टिळक राजी झाले. पण वडील जर अशा मध्ययुगीन परंपरेसाठी प्रायश्चित्त घेणार असतील तर आपण लग्नच करणार नाही अशी भूमिका श्रीधर टिळकांनी घेतली. दोघांचे खटके उडाले पण लोकांच्या समाधानासाठी लोकमान्यांनी प्रायश्चित्त घेतलेच.

श्रीधरपंताना लिखाणाची आवड महाविद्यालयीन जीवनापासून होती. स्वतः लोकमान्य त्यांच्याकडून कवितांचे अनुवाद करून घेत असत. त्यांनी श्रीधरपंताना लिखाणासाठी कायम उत्तेजनच दिले. मराठी शाकुंतलाचे परीक्षण, बादरायण संबंध, कलमबहादुराचे फटके असे त्यांचे लेख प्रसिद्ध होते.

लेखातून जातीयता, अस्पृश्यता ,अंधश्रद्धा , ब्राम्हण्यवाद यावर नेहमी कोरडे ओढण्याच काम श्रीधर टिळक यांनी केलं.

केसरी हे टिळकांनी सुरु केलेलं वर्तमानपत्र. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असे ज्वलंत अग्रलेख लिहून केसरीच नाव लोकमान्यांनी घराघरापर्यंत पोहचवल होत. मात्र टिळकांच्या निधनानंतर टिळक बंधूना स्वतःला टिळकवादी म्हणवून घेणाऱ्यानी केसरीत पाय ठेवू दिले नाही.

श्रीधर टिळकांचे प्रागतिक विचार हे त्याकाळात लोकांना झेपणारे नव्हते. केसरीत जरी लिखाणास बंदी होती तरी मराठी पत्रकार संघाचे पहिले अध्यक्ष काकासाहेब लिमये यांनी आपल्या ज्ञानसाधना या नियतकालिकात श्रीधर टिळकांचे लेख छापून आणले.

याचकाळात ब्राम्हणेतर चळवळ जोर धरत होती. महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज याचा श्रीधरपंत टिळकांवर प्रभाव होता. ब्राम्हणेतर चळवळीतले नेते केशवराव जेधे, जवळकर,प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी त्यांची मैत्री जमली. आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग नोंदवला.

८ एप्रिल १९२८ साली टिळक बंधूंनी आज ज्याला केसरीवाडा म्हणून ओळखले जाते त्या गायकवाड वाडा मध्ये समता संघाची स्थापना केली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

याच कार्यक्रमाच्यावेळी गायकवाड वाड्याच्या ग्रंथालयामध्ये सहभोजन ठेवले. टिळकांच्या वाड्यात अस्पृश्य उच्चवर्णीयां पंक्तीला मांडीला मांडी लावून सहभोजन करणार हे कर्मठ टिळकवाद्यांना रुचले नाही. वीजपुरवठा तोडून कार्यक्रमात विघ्न आणण्यात आले. पण गोडाचे दिवे पेटवून टिळकांनी सहभोजन पार पाडले.

लोकमान्य टिळकांनी समाजाने एकत्र यावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. या गणेशोत्सवावेळी मनोरंजनातून समाजप्रबोधन व्हावे यासाठी मेळ्यांचे आयोजन व्हायचे. टिळक बंधूनी केसरीवाड्यामधल्या गणपतीसमोर पांडोबा राजभोज यांच्या अस्पृश्यांचा श्रीकृष्ण या मेळ्याचे आयोजन केले. 

पुण्याच्या कर्मठवाद्यांमध्ये खळबळ उडाली. टिळकबंधूंची बंडखोरी त्यांना माहित होती. अस्पृश्यांची सावली टिळकांच्या गणपतीवर पडू नये म्हणून त्यामूर्तीला पिंजऱ्यात कोंडण्यात आलं. कोर्टाचे समन्स काढण्यात आले. गायकवाडवाड्याच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या कचेरीहून वाजतगाजत महारांचा मेळा आणि त्यांच्यासोबत रामराव टिळक श्रीधर टिळक ही मिरवणूक निघाली. पेठेमध्ये लोक हा अजबप्रकार पाहण्यासाठी गर्दी करून होते. वाड्याच्या दाराशी मेळ्याला गोऱ्या पोलिसांनी अडवले. टिळक बंधूंची त्यांच्याशी हमरीतुमरी झाली. प्रकरण हातघाईवर आले. त्यांच्या जोरापुढे पोलिसांची ताकद कमी पडली. मेळा वाड्यामध्ये घुसला.

जेष्ठ बंधू रामराव टिळकांनी कोर्टाचे समन्स फाडून टाकले आणि स्वतः पिंजऱ्याच्या कुलुपावर हातोड्याचे घाव घालून टिळकांच्या गणपतीला कर्मठतेच्या बंधनातून मुक्त केले.

त्यांच्या कायम पाठीशी राहणाऱ्या प्रबोधनकार ठाकरेनी आपल्या लोकहितवादी या साप्ताहिकाची हेडलाईन ठेवली होती,

” गायकवाड वाड्यावर अस्पृश्य मेळ्याची स्वारी.”

टिळकांच्या मुलांचे हे उपदव्याप केसरीचे ट्रस्टी न.चि.केळकर आणि सनातनी टिळकभक्तांना आवडले नाही. त्यांनी त्यांच्या मागे कोर्टकचेऱ्यांचे लचांड लावून दिले. श्रीधर टिळकाना वडिलांचा केसरी आपल्या हातात मिळवण्याची खूप इच्छा होती. ती त्यांनी पुरी होऊ दिली नाही. या सगळ्यामुळे श्रीधर टिळक कायम निराशेच्या गर्तेत अडकले जाऊ लागले.

श्रीधर टिळकांना आपलं मन मोकळं करण्यासाठी पुण्यात प्रबोधनकार ठाकरेंच घर हे एकमेव ठिकाण होते. पण ब्राम्हणवाद्यांच्या त्रासाला कंटाळून स्वतः ठाकरे पुण्याहून मुंबईला गेले. पुण्यातला टिळकांचा शेवटचा आधार ही निघून गेला होता.  श्रीधर टिळक यांच्या मनाचा कोंडमारा होऊन अखेर त्यांनी भाम्बुर्डा येथे रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली.

ही आत्महत्या करण्याच्या काही तासापूर्वी त्यांनी एका वृत्तपत्राला, पुण्याच्या कलेक्टरला आणि बाबासाहेब आंबेडकराना असे तीन पत्रे लिहिले होते.

त्यात त्यांनी लिहिलं होत,

” मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची, समाजाची, भाषेची सेवा करण्याकरिता झाला आहे. माझ्या मात्यापित्यांची याहून भिन्न कल्पना नव्हती. माझा जन्म कोर्टकचेरयांचे असहाय खेळणे बनण्याकरिता झाला नव्हता. एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या पोटी माझे जीवितकार्य करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो, अशी मी आशा बाळगतो. “

आंबेडकराना हे पत्र वाचून धक्का बसला. त्यांनी दुनिया या साप्ताहिकाच्या टिळक विशेषांकामध्ये आपल्या लेखात ते म्हणतात ,

“केवळ टिळकांचा मुलगा म्हणून नाही तर एक भारदस्त लेखक म्हणून श्रीधर टिळकांना केसरीमध्ये स्थान दिले गेले पाहिजे होते. कोणी काहीही म्हणो टिळक घराण्यातील कोणाला लोकमान्य ही पदवी खरी शोभत असेल तर ते म्हणजे श्रीधरपंत टिळक !! “

हे ही वाच भिडू.

7 Comments
  1. Chaitanya says

    लेखच्या खाली माहितीचा स्रोत नमूद केल्यास बरे होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.