भारती पवार यांच्या म्हणण्यानुसार खरचं सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या आहेत का ?

केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील या चार नवनियुक्त मंत्र्यांची १६ ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून जनआशीर्वाद यात्रा निघणार आहे. ही यात्रा जनतेशी संवाद साधण्यासाठी काढण्यात आल्याचं म्हंटल जातंय.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज पालघरमधून सुरुवात झाली. त्यांची ही यात्रा मोदी सरकारच्या कामाची, महत्त्वाच्या निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील त्रुटी दाखवण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

माध्यमांशी बोलताना भारती पवार म्हंटल्या,

केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे.

महाराष्ट्र कोरोना रुग्ण वाढीत आघाडीवर आहे. लोकांना लसींचा पुरवठा होत नाहीये. आणि अशातच केंद्रीय मंत्री भरती पवार असं म्हणत असतील तर दिलेल्या लसी आहेत कुठं ? हे शोधलं पाहिजे.

कोव्हीड प्रतिबंधक सार्वत्रिक लसीकरणाच्या नवीन टप्प्याला २१ जून २०२१ पासून सुरुवात झाली. यात आत्तापर्यत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविडच्या ५१ कोटी ४५ लाखाहून अधिक लसी पुरवल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

एप्रिल २०२१ चा विचार करता 

राज्याला केंद्रानं फक्त साडे सात लाख लसीचे डोस दिले होते. त्याचवेळी उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झालं आहे.

एप्रिल मध्ये महाराष्ट्राची कोरोना रुग्ण संख्या – ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४.५ लाख, मृतांची संख्या ५७ हजार, एकूण बाधितांची संख्या ३० लाख होती. त्या तुलनेत साडे सात लाख डोस ही संख्या खूपच कमी होती. यावर राज्यात आठवड्याला ४० लाख आणि महिन्याला १ कोटी ६० लाख डोस मिळायला हवेत. तरच, राज्यातील लसीकरण मोहिम व्यवस्थित सुरु राहिलं. असं राजेश टोपे यांनी म्हटलं होत.

मे संपेपर्यंत गुजरातला १ कोटी डोस देण्यात आले होते. तर महाराष्ट्राला १ कोटी ४ लाख डोस मिळाले. गुजरातची एकूण लोकसंख्या ६ कोटी आहे. तर महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या महाराष्ट्राला मे पर्यंतही कमीच डोस मिळाले.

जूनचा लशींचा पुरवठा पाहता, 

३० जून अखेरीस सात-साडेसात लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं होत. केंद्राकडून ३० जून पर्यंत लसीचा पुरवठा न झाल्याने लसीची उपलब्धता जवळपासू शून्य झाली होती. त्यामुळे जुलै दोन तारखेपर्यंत लस मिळणार नाही किंवा कमी प्रमाणात मिळेल असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते.

केंद्र सरकारने जुलै महिन्यात महाराष्ट्रासाठी १ कोटी १५ लाख लसींचे डोस दिले होते. पण आत्ताची १० ऑगस्ट अखेरची आकडेवारी पाहता, केंद्र सरकारने ५१ कोटी ४५ लाखाहून अधिक लसींचा पुरवठा केला होता. यात १० ऑगस्ट, सकाळी ७ पर्यंत, भारताने कोविड लसीचे ५१,४५,००,२६८ एकूण डोस दिले आहेत. ज्यात ४०,०१,५८,०५७ हे पहिले लसीकरण डोस तर ११,४३,४२,२११ दुसऱ्या लसीकरणाचे डोस आहेत.

राज्यांच्या बाबतीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात एकूण डोस मिळण्याच्या बाबतीत पुढे आहेत.

आतापर्यंत उत्तरप्रदेशला ५,४४,९४,५५२  डोस, त्यानंतर महाराष्ट्रात ४,७१,५८,२१२ डोस आणि गुजरातला ३,७१,६८,३१७ डोस देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात आजअखेर ६३,९२,६६० कन्फर्म केसेस आहेत. तर ६४,२१९ ऍक्टिव्ह केसेस आहेत. आणि ४,७१,५८,२१२ डोस मिळाले आहेत.

आता याची तुलना गुजरातशी करायची झाल्यास ८,२५,५८२ कन्फर्म केसेस आहेत. तर १८३ ऍक्टिव्ह केसेस आहेत.आणि डोस मिळालेत ३,७१,६८,३१७

या सर्व पार्श्वभूमीवर बोल भिडूने पुण्याचे उद्योजक आणि माहिती अधिकाराचे जाणकार प्रफुल्ल सारडा यांच्याशी लशींच्या पुरवठ्यासंबंधी बातचीत केली, यावर ते म्हंटले 

हे असे घडते जेव्हा खासदार, पहिल्यांदा चुकून आरोग्य मंत्री बनतात. आणि त्यांना कोव्हिडचं लसीकरण आणि त्याच्या पुरवठ्याबद्दल मूलभूत तथ्यच माहित नसतात.

जर आपण तथ्ये तपासली तर महाराष्ट्र हे कोविडमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांपैकी एक आहे. राज्य सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही काही नेते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे गोंधळ निर्माण होतो.

आता हे ऑन रेकॉर्ड आहे की राज्याचे मुख्यमंत्री कोरोना लसीकरणासाठी जास्तीच्या पुरवठ्याबद्दल केंद्राला विनंती करत आहेत. आणि तरीही राज्याला कमी लसी मिळत आहेत.

डॉ. सायरस पूनावाला यांनी सांगितले, की ते महाराष्ट्राला लस पुरवण्यास तयार आहेत परंतु केंद्रीय मंत्रालय परवानगी देत ​​नाही. आणि दुर्दैवाने डॉ.भारती पवार त्याच विभागाच्या राज्यमंत्री आहेत. आशा आहे की राजकीय ब्लेमगेम पेक्षा त्या डॉक्टर आणि जबाबदार मंत्री म्हणून लसीच्या पुरवठ्यावर अधिक भर देतील.

आता जर टक्केवारीचा काढायची झाल्यास, केंद्राने पुरविलेल्या एकूण लसींपैकी महाराष्ट्राला ९.१६ टक्के तर गुजरातला ७.२२ टक्के लसी मिळाल्या. म्हणजे भारती पवार या आकडेवारीच्या दृष्टिकोनातून योग्यच बोलत आहेत. पण तात्विकदृष्ट्या बघायचं झाल्यास महाराष्ट्राची रुग्णसंख्या खूपच आहे. म्हणजे ६४ हजार ऍक्टिव्ह रुग्ण कुठे आणि गुजरातचे १८३ रुग्ण कुठे. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.