जर तुमची पत्नी सेक्ससाठी नकार देत असेल तर तुम्ही काय कराल..? पुरूषांनी दिलेत ही उत्तरं

लग्न हे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये होतं. पण लग्नानंतरचे या दोघांवर जे परिणाम होतात सारखे नसतात. लग्न दोघांमध्ये होत असलं तरी, दोघांचा दर्जा सामान नसतो… का सामान नसतो हा प्रश्न जरा डोक्याला ताण देऊन स्वतःलाच विचारा…

तुम्ही विचार करत असणार एवढं डीप कोण विचार करतंय. विषयच तसा आहे म्हणल्यावर खोलात जावंच लागेल. 

मुद्द्याला हात घालते. NFHS म्हणजेच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल आलाय. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी अलीकडेच सर्व्हेचा नवीन डेटा सादर केलाय.

देशातील जवळपास एक तृतीयांश महिलांना शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागल्याचे या नवीन अहवालातून समोर आलेय. तसेच देशात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार कमी झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

यावर तुम्ही विचाराल, पुरुषांसाठी असा सर्व्हे नाहीय का?

हाच मुद्दाय की, या अहवालात पुरुषांशी संबंधित आकडेवारी देखील समोर आली आहे. नवीन आकडेवारीनुसार, देशातील ४ टक्के पुरुषांनाही स्त्रियांप्रमाणेच घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो.

थोडक्यात वैवाहिक हिंसा म्हणजे तुमच्या जोडीदाराने केलेली हिंसा मग तो पुरुष असो वा स्त्री असो..हिंसा हिंसाच असते.

आता वळूया मेन मुद्द्यावर तो म्हणजे,

हा सर्व्हे सांगतोय की, भारतात अशा ८२ टक्के स्त्रिया आहेत ज्या त्यांची इच्छा नसल्यास आपल्या नवऱ्याला सेक्स साठी ‘नाही’ म्हणतात. 

अहवालानुसार, असे म्हटले आहे की ५ पैकी ४ पेक्षा जास्त महिला अशा आहेत, जर त्यांना लैंगिक संबंध ठेवायचे नसतील तर त्यांच्या पतीला नकार देऊ शकतात. नकार देण्याबाबतचं प्रमाण पाहायचं तर, गोव्यातलं ८२ टक्के इतकं प्रमाण आहे, अरुणाचल प्रदेशमधील ६३ टक्के आहे तर जम्मू आणि काश्मीरमधील ६५ टक्के इतकं प्रमाण आहे.

या सर्व्हे दरम्यान, पुरुषांची लैंगिक वृत्ती जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारण्यात आले. 

जर तुमची पत्नी सेक्स साठी नकार देत असेल तर तुम्ही काय कराल ?

 हे ४ पर्याय निवडण्याचा तुम्हाला अधिकार आहे का ?

  1. तिचा राग करणे, निंदा करणे, मानसिक छळ करणे.
  2. घरखर्च/पैसे देण्यास नकार देणे.
  3. तिची इच्छा नसतानाही तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे. 
  4. पत्नीने नकार दिला म्हणून दुसऱ्या स्त्रीसोबत लैंगिक संबंध ठेवणे.

यावर ६ टक्के पुरुष असं म्हणतायेत की, या चारही पर्यायांशी सहमत आहोत. जर त्यांच्या पत्नीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर पुरुषांना या चारही प्रकारे वागण्याचा अधिकार आहे.

१९ टक्के पुरुष असं म्हणतायेत की, पत्नीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर पतीला राग येऊन तिला शिवीगाळ करण्याचा अधिकार आहे.

तर ७० टक्के पुरुष असं म्हणतायेत की, चारपैकी कोणत्याही वर्तनाशी आम्ही सहमत नाही.

आता हा सर्व्हे सांगतोय त्याप्रमाणे भारतातील ८२% स्त्रिया पतीला लैंगिक संबंध नाकारण्यास सक्षम आहेत.

मात्र दुसरीकडे हाच अहवाल घरघुती हिंसेचं प्रमाण दर्शवत आहे.

त्यानुसार, १८ ते ४९ वयोगटातील ३२% विवाहित महिला शारीरिक, लैंगिक किंवा भावनिक हिंसाचाराला बळी पडल्या आहेत. वैवाहिक हिंसाचाराची सर्वाधिक प्रकरणे शारीरिक हिंसाचाराची आहेत.

राज्यनिहाय हे प्रमाण बघायचं तर, सर्वाधिक प्रकरणे म्हणजेच ४८ टक्के इतके प्रकरणं कर्नाटकातील आहेत. त्यापाठोपाठ बिहार, तेलंगणा, मणिपूर आणि तामिळनाडूचा नंबर लागतो. लक्षद्वीपमध्ये घरगुती हिंसाचाराची सर्वात कमी म्हणजेच २.१ टक्के इतकी प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

या तक्रारींमध्ये सर्वात जास्त प्रमाण लैंगिक हिंसेचं असतं मात्र त्याबाबत काही कायदाच नाही.

कारण, भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत बलात्काराची व्याख्या निश्चित करण्यात आली आहे, परंतु वैवाहिक बलात्काराबाबत कुठलेही उल्लेख नाहीत. मात्र पत्नीवर बलात्कार करणाऱ्या पतीला शिक्षेची तरतूद आहे, जर पत्नीचे वय १२ वर्षांपेक्षा कमी असेल तर.

याच अर्थ, जर पतीने १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या पत्नीवर बलात्कार केला तर त्याला दंड किंवा दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. 

लैंगिक हिंसा होतेच कशी काय ?

याला खोल जाऊन विचार केला तर, स्त्रियांवर विवाह लादला जातो तो २ कारणांसाठी – एक म्हणजे, समाज टिकवून ठेवण्यासाठी तिने पुनरुत्पादन करावं अन दुसरं म्हणजे, पुरुषाच्या भौतिक गरज भागवणे ! यात त्याचे कपडे धुण्यापासून ते त्याच्या लैंगिक गरज भागविण्यापर्यंतच्या सगळ्याच गरजा येतात.

लग्न नावाच्या कंसेप्टमध्ये स्त्रीने पुरुषाला त्याच्या इच्छेनुसार संभोगसुख देणं हे तिच्या ड्युटीचा भाग असतो. मग यात तिचा ‘होकार-नकार’ ग्राह्य धरलाच जात नाही. मग या संभोगसुख देण्याच्या बदल्यात पुरुष तिला सामाजिक सुरक्षा देतो, तिच्या ऐहिक गरज भागवतो. 

हे सांगण्याचं प्रयोजन म्हणजे, या सर्व्हेत असे आढळून आले की विवाहित महिलांमध्ये रोजगाराचे प्रमाण ३२ टक्के इतकंच आहे. यात फारशी प्रगती आपण केलीच नाही कारण २०१५-१६ NFHS च्या सर्व्हेमध्ये हे प्रमाण ३१ टक्के होतं. म्हणजेच गेल्या ७ वर्षांत एकच टक्क्याने हे प्रमाण वाढलं. 

तेच दुसरीकडे पुरुषांचं प्रमाण ९८ टक्के इतकं आहे. 

घरखर्च आणि पैशांच्या गरजेसाठी महिलांना पुरुषांवर अवलंबून राहावं लागतं. कारण नोकरी करणाऱ्या विवाहित महिलांपैकी १५ टक्के महिलांना पगारही मिळत नाही आणि १४ टक्के महिलांना त्यांच्या कमाईचा खर्च कसा करावा यावर नियंत्रण नसते आणि जरी चांगला पगार कमवत असेल तर तिच्या पगारबाबतचे निर्णय त्यांचे पतीच घेत असतात.

थोडक्यात लग्नानंतर स्त्रीवर तिच्या नवऱ्याचा ऑफिशियली मालकी हक्क प्रस्थापित होतो. स्त्रियांच्या लैंगिकी संबंधांबद्दलचा हा प्रश्न पहिल्यांदाच विचारण्यात आला होतं आणि त्यातून अशी इंटरेस्टिंग माहिती बाहेर आली आहे. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.