शिवसेना स्थापनेच्या सात वर्षांपुर्वी मराठाची हेडलाईन होती, अत्रेंची हाक..शिवसेना उभारा..!

शिवसेना नेमकी कोणाची ? महाराष्ट्रात असा प्रश्न विचारणारा माणूस ठार वेडा असण्याची चिन्ह जास्त आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी उभा केलेली शिवसेना गावागावात पोहचली आहे. त्यांचा शिवसैनिक घराघरात आहे तरी देखील शिवसेना कोणाची हा प्रश्न विचारणं म्हणजे ठार वेडेपणा. 

तरीपण महाराष्ट्राचं राजकारण बऱ्यापैकी माहित असणाऱ्यांचाकडून एक प्रश्न हमखास येतो.

अरे शिवसेना तर आचार्य अत्रेंची संकल्पना होती. पुढे बाळासाहेबांनी तशी संघटना काढली. आणि त्याला शिवसेना अस नाव दिलं पण मुळ कल्पना तर आचार्य अत्रे यांचीच. 

तर भिडू लोकांनो हा इतिहास सुरू होतो तो रविवार १९ जुलै १९५९ रोजी. 

त्या दिवशीच्या मराठा वर्तमान पत्राची हेडलाईन होती, 

आचार्य अत्रे यांची महाराष्ट्राला हांक: शिवसेना उभारा ! 

याच अंकात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी आचार्य अत्रे यांनी एक संघटना उभा करण्याची संकल्पना मांडली होती. या वर्तमान पत्रात अत्रे लिहतात, 

“महाराष्ट्रांत आज दोन स्वयंसेवक संघटना प्रामुख्याने कार्य करीत आहेत. एक ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ आणि दुसरें ‘राष्ट्र सेवादल’. संयुक्त महाराष्ट्राच्या कार्यासाठीं अशा तऱ्हेची एक ‘शिवसेना’ उभारण्यात यावी, असे आम्हांला मनापासून वाटते. सार्वत्रिक निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा अवधि आहे.

ह्या दोन वर्षांच्या काळांत जर बारा ते सतरा वर्षांच्या वयाचे एक लाख ‘शिवसैनिक’ आम्हांला अखिल महाराष्ट्रात उभे करता आले तर त्यांच्यामुळे ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’च्या ‘शिवशक्ती’ला अशी काही विलक्षण धार येणार आहे, की ह्या क्षणी त्याची कल्पनाही कोणाला होऊ शकणार नाही. 

Screenshot 2022 06 18 at 10.02.27 PM

‘शिवसेने’ची संघटना बांधणे ही काही सोपी गोष्ट नाही हे आम्ही जाणतो. त्यासाठी निरलस, निष्ठावंत आणि प्रखर महाराष्ट्रप्रेमी संघटकांची आवश्यकता आहे.

पण अशा संघटनाचतुर माणसांची महाराष्ट्रांत वाण आहे असें आम्हांला मुळींच वाटत नाहीं. पण आमच्यासारख्यांनी किंवा दुसऱ्या कोणी त्यांच्या शोधाला जाण्यापेक्षा, स्वयंस्फूर्तीने त्यानी ह्यावेळी पुढें यावयाला पाहिजे आणि ह्या कामाला त्यांनी लगोलग हात घातला पाहिजे. 

शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राची सर्वांत मोठी सेवा ह्या एका कार्याने होणार आहे, असे आम्हांला वाटते. म्हणून ‘शिवसेने’चे आमचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रांतील संयुक्त महाराष्ट्रवादी जनतेला आणि कार्यकर्त्यांना अत्यंत पोटतिडिकेने आवाहन करतो आहोत.”

अशा प्रकारे तमाम संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या युवकांनी शिवसेना संघटनेद्वारे एकत्र उभा रहावं व त्यासाठी शिवसैनिक म्हणून प्रत्येकाने हा लढा उभा करावा असे मत आचार्य अत्रेद्वारे मांडण्यात आलं होतं. 

त्याचसोबत त्यांनी जानेवारी १९६३ च्या आपल्या मराठा दैनिकातून देखील अशाच प्रकारे मत मांडून शिवसेनेची संपुर्ण कल्पना मांडली होती. यासाठी त्यांनी प्रत्यक्षात बैठका देखील घेतल्या होत्या. शिवसेना हि बिगर राजकिय संघटना म्हणून काम करेल त्याचबरोबरीने ती फक्त मराठी माणसांच्या भल्यासाठी काम करणारी संघटना असेल. एक दबावगट म्हणून शिवसेनेची स्थापना करण्यात येईल. 

या काळात प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे यांचे संबध चांगले होते व आचार्य अत्रे यांच्या अगोदरच प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मुलांची संघटना निर्माण करण्याची गरज आहे असे बोलल्याचे दाखले देखील दिले जातात. 

मात्र शिवसेना हे नाव प्रथमत: आचार्य अत्रे यांनीच वापरलं होतं व ते अशी संघटना निर्माण करण्याच्या प्रयत्नात देखील होते हे स्पष्ट आहे. 

पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. या काळात आचार्य अत्रे आणि बाळासाहेब यांचे टोकाचे संबध निर्माण झाले होते. व्यक्तिगत चिखलफेकी पर्यन्त हा विरोध विकोपाला गेला होता. 

१३ जून १९६९ रोजी आचार्य अत्रेंच निधन झालं. त्यानंतर वादांना मुठमाती देत बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये त्यांच्याबद्दल लेख लिहला त्यात ते म्हणतात, 

३० ऑक्टोंबर १९६६ रोजी झालेल्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात आपण त्यांना निमंत्रण दिलं होतं,

“आपण या नवसंघटनेच्या धुरेवर येवून उभा रहा.”

असे बाळासाहेब अत्रेंना म्हणाले होते. 

असा पुरूष होणे नाही या लेखात बाळासाहेबांनी स्पष्ट केलं होतं की शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्यात त्यांना शिवसेनेची जबाबदारी घेण्यासाठी सांगण्यात येत होतं. कदाचित तस झालं असत तर आचार्य अत्रे हे पहिले शिवसेनाप्रमुख झाले देखील असते. 

पण राजकारणात जर तर हा विषय येत नाही.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.