सुरवातीला महाराष्ट्र राज्यासाठी वेगळंच नाव फायनल झालं होतं…

धगधगता स्वाभिमान ही महाराष्ट्राची आजवरची ओळख राहिलेली आहे. इतिहास जरी काढला तरी मराठी रक्त पूर्वीपासून बंडखोर म्हणून प्रसिद्ध आहे. परकीय आक्रमकांना तोंड देऊन देशात पहिल्या स्वराज्याची स्थापना देखील महाराष्ट्रातच झाली.

आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला नेहमीच वाचा फोडण्याचं काम इथल्या मातीने आजवर केलंय. पूर्वी महाराष्ट्र हे राज्य नव्हतंच. इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी बॉम्बे प्रेसिडेन्सी नावाचा प्रांत बनवला यात आजच्या महाराष्ट्रासह गुजरातचा देखील समावेश होता.

स्वातंत्र्यानंतर देखील ही गुजरातशी बांधलेली गाठ सुटली नाही. मुख्यमंत्री  मोरारजी देसाई यांच्या काळात अन्याय वाढत गेला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी झाली. 

ही चळवळ उभी राहिली त्यामध्ये आचार्य अत्रे यांचा सिंहाचा वाटा होता.

त्यांचं व्यक्तिमत्व अफाट होत. रोखठोकपणा हा त्यांचा स्वभाव गुण होता. आपल्या लेखणीने आणि आपल्या भाषणांनी विरोधकांना घायाळ कस करायचं हे अत्रेंकडे पाहून कळायचं.

अगोदर साप्ताहिक ‘नवयुग’ आणि नंतर ‘दैनिक मराठा’ या वृत्तपत्रांतून ज्याला रान पेटवणे म्हणतात ते काम आपल्या लेखणीने आणि वाणीने या महाराष्ट्रात ६० वर्षापूर्वी कुणी केले असेल तर ते आचार्य अत्रे यांनी केले.

मोरारजी देसाई यांच्या हट्टीपणामुळे या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेकांच रक्त सांडलं. १०९ जण हुतात्मा झाले. अखेर नेहरूंनी त्यांना केंद्रात बोलावून घेतलं आणि त्यांच्या जागी यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री केलं. काँग्रेसला वाटलं कि हि नियुक्ती झाल्यावर महाराष्ट्र शांत होईल पण तस झालं नाही. संयुक्त महाराष्ट्र समितीने आपला लढा सुरूच ठेवला.

१९५७ सालच्या विधानसभा निवडणुकीत आचार्य अत्रेंनी आपला धडाकेबाज प्रचार केला. वेगळा महाराष्ट्र न देणाऱ्या काँग्रेसचे झाडून सगळे उमेदवार पडले. पश्चिम महाराष्ट्रात फक्त मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण निवडून आले. भाषावार प्रांतरचना करून स्वतंत्र महाराष्ट्र दिला पाहिजे याची जाणीव केंद्राला झाली.

अखेर १ मे १९६० रोजी जवाहरलाल नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाणांकडे सोपवला.

संयुक्त महाराष्ट्राच्या श्रेयाचे वाटेकरी यशवंतराव असतील किंवा ‘मंगल कलश’ त्यांनी आणला असे सांगण्यात आले तरी प्रत्यक्षात या लढयासाठी पेटून उठलेली मराठी जनता आणि त्या मराठी जनतेला घणाघाती लेख आणि आपल्या अमोघ वाणीने रस्त्यावर उतरायला लावणारी आचार्य अत्रे यांची धमक याखेरीज महाराष्ट्राची निर्मिती झालीच नसती.

इतकेच काय तर महाराष्ट्र राज्याचे नाव मुंबई असेच ठेवायचे असाही डाव रचण्यात आला होता.

खुद्द मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची या बाबतीत दिल्लीकरांना संमती होती असं म्हटलं जातं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे काही मवाळ नेते देखील आता जे मिळतंय ते आधी पदरात पाडून घेऊ या विचारांचे झाले होते. या नावामुळे मुंबईवरचा आपला दावा अधिक पक्का होईल असाही काही जणांनाच समज होता.

याला सर्वात प्रखर विरोध केला तो आचार्य अत्रेंनी.

काहीही झालं तरी राज्याचं नाव महाराष्ट्रच असलं पाहिजे हे त्यांनी आग्रहाने मांडलं. फक्त इतकंच नाही तर आपल्या वर्तमानपत्रातून आचार्य अत्रे यांनी जनतेसमोर हा डाव उघडकीस आणला.

‘याद राखा, महाराष्ट्राचे नाव बदलाल तर’ या आपल्या अग्रलेखात दणदणीत शीर्षकापासूनच त्यांनी सरकारला इशारा दिला.

ते म्हणाले होते,

 “आम्ही त्यांना कडाडून सांगतो, महाराष्ट्र या नावात ब्रह्मांड सामावलेलं आहे. या नावासाठी मराठी जनता आकाश पाताळ एक करेल. मराठी राज्याचे नाव महाराष्ट्र नसेल तर मराठी माणसांना जगता येणार नाही, नव्हे श्वासही घेता येणार नाही.”

अत्रेंच्या या महाराष्ट्र प्रेम ओसंडून वाहणाऱ्या अग्रलेखानंतर संपूर्ण राज्यभरात वादळ उठलं. शांत झालेली संयुक्त महाराष्ट्र चळवळ पुन्हा उभी राहते कि काय अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटू लागली. सर्वसामान्यांकडूनही यावर तिखट प्रतिक्रिया यायला लागल्यावर मुख्यमंत्र्यानी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी स्वतंत्र राज्याचा विधेयक प्रस्ताव मांडल त्यात मुंबई राज्य असे राज्याचे नाव ठेवून कंसात (महाराष्ट्र) शब्द घालण्यात आलं.

त्यावर शांत बसतील ते आचार्य अत्रे कसले ? त्यांनी ‘दैनिक मराठा’तून यशवंतरावांची खरडपट्टी काढली. ते म्हणाले,

‘आईच्या पोटात मुलगी की, मुलीच्या पोटात आई..?’

हा वाद चिघळू लागल्यावर मार्च १९६० मध्ये  मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक बसली. मुख्य विषय राज्याच्या नावाचाच होता. बरीच चर्चा झाली, मतमतांतरे मांडण्यात आली. अखेर जनक्षोभाची भावना लक्षात घेऊन नाव नाईलाजाने का होईना महाराष्ट्र हेच ठेवण्यात आलं.

राज्यपुर्नरचनेचा कायदा मंजूर झाला तोच महाराष्ट्र या नावानेच. त्यावेळी कायदा मंत्री शांतीलाल शाह यांनी हि सुधारणा सुचवली होती. 

आचार्य अत्रेंनी हट्टाने एकाकी लढा दिला म्हणूनच गेली हजारो वर्षे  चालत आलेलं महाराष्ट्र हेच नाव राज्याला कायम राहिलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.