अहो ७०० कवींचं काय घेऊन बसलात, एका साहित्य संमेलनात थेट अत्रेंचा माईक बंद पाडलेला

मराठी भाषा आणि मराठी साहित्य यावर चर्चा घडावी, त्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने अखिल भारतीय पातळीवर दरवर्षी एका उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. आपण सर्वजण या उत्सवाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने ओळखतो.

संमेलन गाजवण्यासाठी असतात असं म्हणतात बरं. पण आपली मराठी साहित्य संमेलन गाजतात ती वादामुळंच.

आता यावर्षी होणार संमेलन पण गाजतयं. नाशिक मधील साहित्य संमेलनातील कविकट्ट्यावर महाराष्ट्रातील तब्बल ७००…किती ७०० कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.

प्रत्येकाला कमीतकमी २ मिनिट वेळ दिला तर एकूण सगळ्या कवींना कविता सादर करायला      ७००x२ = १४०० मिनिटे लागतील. १४०० मिनिटे म्हणजे जवळजवळ २३ हून अधिक तास. म्हणजे हा कविकट्टा चालणार २३ ते २४ तास. जवळपास एक दिवस एक रात्र.

मग माझ्या डोक्यात आलं आता पाऊस चालू आहे. इथं माईक बंद वैगरे पडला तर ? कवी कविता कशा सादर करणार ?

याच पार्श्वभूमीवर एका साहित्य संमेलनात अत्रेंचा माईक बंद पडलेला किस्सा आठवतो.

१९३२ सालचं मराठी साहित्य संमेलन कोल्हापुरात पार पडलं होतं. हे संमेलन त्यावेळच्या आयर्विन म्युझियममध्ये म्हणजे आत्ताचं जे कलेक्टर ऑफिस आहे तिथं घेण्याचं ठरलं होतं. या अठराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे होते. मात्र संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सयाजीराव गायकवाड संमेलनाला हजरच राहू शकले नाहीत.

या संमेलनासाठी महाराज लंडनहून पॅरिसमार्गे भारतात आले. त्यांनी परदेशात असताना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होईन म्हणून मान्य केले होते. पण भारतात परतल्यावर त्यांना कळले, की कोल्हापुरात प्लेगची साथ फैलावली आहे. म्हणून ते कोल्हापूरला न जाता तडक बडोद्याला रवाना झाले. सयाजीरावांनी माने नावाच्या त्यांच्या खासगी कारभाऱ्याला कोल्हापूरला पाठवले. त्या खासगी कारभाऱ्याने संमेलनात सयाजीरावांचे भाषण वाचून दाखवले. त्यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले, की

विशिष्ट वर्गाकडून पुस्तके लिहिली गेल्यामुळे सर्व मराठी पुस्तके एकांगी झाली आहेत. वाङ्मयात सर्व धंद्यांच्या, सर्व वर्गांच्या, सर्व स्थळांच्या लोकांनी लिहिलेला ग्रंथसंग्रह असला पाहिजे, तर भिन्न भिन्न वर्गांच्या आकांक्षांचे, भावनांचे, विचारांचे सुख-दु:खांचे चित्र त्यात उमटलेले दिसते व राष्ट्रीय ऐक्यास ते संवर्धक होते आणि भाषेतील शब्दसंग्रह वाढतो.

या संमेलन आयोजनामागे संस्थानी थाटमाट होता.

संमेलनादिवशी सैन्यदलाच्या तुकड्या तसेच प्रवेशद्वाराजवळ पिंजऱ्यात चित्ते ठेवले होते. चार हत्तीही बांधून ठेवण्यात आले होते. स्वागताध्यक्ष छत्रपती राजाराम महाराज होते.

आजवर जसे संमेलनात वाद चुकले नाहीत तसेच वाद त्याही संमेलनात चुकले नव्हते. काही वाद झालेच होते.

या वादांना त्या काळातील ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादाची किनार होती. केसरी, राष्ट्रवीर या नियतकालिकातून या वादाचे पडसाद उमटत होते. आयोजक, साहित्यिक, वर्गरचना आणि संस्थानी वर्ग यांच्यातील प्रत्यक्षाप्रत्यक्ष तणाव संमेलनकाळात होता.

असं म्हंटल जातं की, प्रत्यक्ष संमेलनाचे अध्यक्ष सयाजीराव यांनी संमेलनाला येऊ नयेत, असे प्रयत्न झाले होते.

भास्करराव जाधव व इंदौरचे सरदार माधवराव किबे यांच्यात जोरात खडाजंगी झाली होती. या संमेलनात कविसंमेलनाचे अध्यक्ष होते भा. रा. तांबे. संमेलन रात्री ३ पर्यंत सुरुच होतं. ठरावावेळी प्र. के. अत्रे कविता म्हणत असताना माईक बंद पडला व गोंधळ सुरू झाला. कविता ऐकून घेण्याच्या मनस्थिती कोणीच नव्हते. तशा अवस्थेतही अत्रे यांनी परिटास ही विडंबन कविता वाचली होती. तत्कालीन वर्तमानपत्रांनी या वादांची मोठ्या प्रमाणात दखल घेतली होती.

त्यावेळी तर असं म्हंटल की मुद्दामहुन अत्रेंचा माईक बंद पाडला होता. मग आता परत माझ्या डोक्यात आला की अत्रे तर एकटे होते.

असाच माईक बंद पडला तर या ७०० कवींचा कुठं निभाव लागायचा.

असो एकंदरीत संमेलने आणि वाद हे यापुढील काळातही झडत राहतील आणि माध्यम आणि लोक याचा आनंद घेत राहतीलच.

हे ही वाच भिडू. 

 

English Summary : Acharya atre’s mic turned off in sahitya sammelan.

Leave A Reply

Your email address will not be published.