विनोद सोडा, अत्रेंच्या या 7 गोष्टी पहा मग समजेल आचार्य अत्रे किती ग्रेट होते..

बाळासाहेब आपल्या मुलाखतीत सांगतात अत्र्यांसोबत असणारा वाद कधीच संपला. अत्र्यांच नाव निघतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर उभा राहते.

ते भूतकाळात रमतात आणि अत्रे ठाकरे वादाची गोष्ट सांगू लागतात. ते सांगतात, अत्रेंनी लिहलं होतं की, 

“जेव्हा प्रबोधनकार लिहू लागतात तेव्हा सरस्वतीनं तोंडात शंख धरलाय आणि हातात ताषा घेतलाय अस वाटतं.” 

अत्र्यांच एक एक वाक्य म्हणजे हास्याची कारंजी असायची. इतकी की अशाच वाक्यांमुळे अत्रे फक्त आणि फक्त विनोदच करायचे का ? असा प्रश्न पडतो. अत्र्यांनी लेख लिहले. या लेखांमधून कधी त्यांनी एखाद्याच्या मर्मावर बोट ठेवलं तर कधी एखाद्याचं मन देखील दुखावलं. निसंशयपणे अत्र्यांची लेखणी निर्भिड होती अत्रे देखील निर्भीड होते. अत्रे मुळातच अष्टपैलू होत. ऑलराऊंडर. 

याच ऑलराउंडर आचार्य अत्रेंच्या त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त थोडसं.

१) चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक 

अत्र्यांनी नवयुग फिल्म लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. अत्र्यांना फिल्म कंपनीची स्थापना केली ती त्यांच्या नाटकांच्या प्रेमामधून सिनेमाकडे वळले.  ४० च्या दशकात त्यांनी बाबुराव पेंढारकर आणि मास्टर विनायक यांच्याहंस पिक्चर्सकरता हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहल्या.

प्रेमवीर, बेगुनाह. बॉण्डीची बाटली, अर्धांगी या सिनेमांच्या पटकथा अत्र्यांनीच लिहल्या. नवयुग नावाची त्यांनी फिल्म कंपनी काढली होती त्यातूनच बाहेर पडणारे ते पहिले व्यक्ती होते. पुढे अत्रे फिल्म कंपनीची त्यांनी स्थापना केली ती १९४० साली करण्यात आली. 

अत्रे फिल्ममार्फत श्यामची आई आणि महात्मा फुले असे दर्जेदार सिनेमे काढण्यात आले. या दोन्ही सिनेमांनी सुवर्णकमळ आणि रौप्य पदक मिळवलं. तत्कालीन संदर्भांचा विचार करायचा झाल्यास महात्मा फुल्यांवर पिक्चर काढण्याची त्यांनी रिस्कच घेतली होती अस म्हणलं तर चुकिचं ठरणार नाही. याच फिल्म कंपनीमार्फत वसंतसेना नावाचा सिनेमा काढला. हा सिनेमा निर्मात्यांच्या लहरीपणामुळे बारगळ्याचं सांगितलं जातं.

२) साहित्यिक

अत्रे आणि साहित्याचा संबध हा त्यांच्या लहानपणापासूनच. शालेय वयातच त्यांनी महाराष्ट्र मोहरा नावाची कादंबरी लिहली होती. त्याच काळात त्यांचे लेख प्रेमोद्यान नावाच्या मासिकामधून देखील छापले जात असत. अत्रेंना साहित्याची आवड निर्माण होण्याच कारण त्यांची आणि गोविंदाग्रजांच्या नात्यांमध्ये आपणाला सापडतं. अत्रे हे गोविंदाग्रजांना आपले गुरू मानत. गोविंदाग्रजांचे लहान भाऊ अत्रांचे वर्गमित्र होते. यातूनत अत्रे आणि गोविंदाग्रज हे गुरूशिष्याचं नात निर्माण झालं. 

केशवसुत- गोविदाग्रज- बालकवी यांसारख्या कवींच्या प्रभावातूनच त्यांनी मकरंद या टोपण नावाने कॉलेजच्या त्रैमासिकात लिहण्यास सुरवात केली.  त्याकाळातल्या मासिक मनोरंजन, उद्यान या मासिकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्धच झाल्या नाहित तर त्या लोकप्रिय देखील ठरल्या. पंडीत जवाहरलाल नेहरुं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अब्राहम लिंकन, विनोबा अशा थोरामोठ्यांची लिहलेली चरित्र जशी महत्वाची वाटतात तसच त्यांनी लिहलेलं स्वतच अस मी कसा झालो आणि कर्हेच पाणी हे  सहा खंडात प्रसिद्ध झालेलं त्यांच आत्मचरित्र आज देखील महत्वाच ठरतं. 

३) संपादक  

अत्रे साहित्याच्या ओढीतून राजकारणात आले आणि राजकारणाच्या ओढीतून संपादक झाले. नेमका कोणत्या क्षेत्रामुळे त्यांच्यावर कोणत्या क्षेत्राचा प्रभाव पडला हे सांगण कठिण असलं तरी त्यांच्या संपादक होण्याचं मुळ हे त्यांच्या कॉंग्रेसच्या राजकारणातच सापडतं. कॉंग्रेसच्या राजकारणाचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी नवयुग साप्ताहिकाचा पाया घातला. त्यातील अत्रे उवाच या अग्रलेखांमुळे ते अनेकांच्या परिचयाचे झाले. पुढे त्यांनी जय हिंद नावाचे सायंदैनिक देखील चालवलं. मात्र पुढे भारत- पाकिस्तान अशी फाळणी झाली आणि या फाळणीसाठी कॉंग्रेसच कारणीभूत असल्याच सांगत त्यांनी कॉंग्रेस सोडली. हाच कॉंग्रेस विरोध त्यांनी आयुष्यभर जपला. 

संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी मराठा दैनिकाची स्थापना केली. हेच दैनिक पुढे त्यांची ओळख बनलं किंवा या दैनिकाची ओळख अत्रेमुळ झाली असं देखील म्हणता येईल. मात्र या दैनिकातून अत्रेंनी जे लिहलं ते इतिहास निर्माण करणार होतं.  

४) राजकिय नेते  

अत्रेच्या राजकारणाचा श्रीगणेशा कॉंग्रेस पक्षातून झाला. अत्रेंनी कॉंग्रेसवर केलेली टिका पाहिली तर कोणेएके काळी अत्रे हे कॉंग्रेसमध्ये होते हे पचवणं जड जातं. १९३७ साली अत्रे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले. १९३८ ते १९३९ या काळात पुण्याच्या स्थायी समितीचे ते अध्यक्ष देखील राहिले. पुढे फाळणीच्या रागातून त्यांनी कॉंग्रेस सोडली. १९५५ साली सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच नेतृत्व त्यांनी केलं. निवडणुकांच्या रिंगणात उतरून ते विधानसभेवर दोनदा आमदार देखील झाले. मात्र १९६७ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभव त्यांना सहन झाला नाही. त्यानंतर ते राजकारणापासून अलिप्त राहिले ते राहिलेच. 

५) नाटक 

राम गणेश गडकरींच्या सहवासाने अत्र्यांनी नाटकाचे प्राथमिक धडे गिरवल्यांच सांगितलं जातं. त्यांनी नुसती नाटकं लिहलीच नाहीत तर नाटकांमध्ये त्यांनी भूमिका देखील केल्या. 

गुरूदक्षिणा, विरवचन, प्रल्हाद यांसारख्या शालेय जीवनात लिहलेली नाटकं. पण त्यांचा नाटकामधला प्रवास सुरू झाला तो साष्टांग नमस्कार या विनोदी नाटकापासून. पुढे पराचा कावळा, वंदे मातरम्, मी उभा आहे, जग काय म्हणेल, तो मी नव्हेच, मोरूची मावशी, बुवा तेथे बाया अशी एकसे एक दर्जेदार नाटक त्यांनी आणली.  नुसती नाटकं रंगमंचावर आणलीच नाहीत तर ती यशस्वी देखील केली. 

६) शिक्षक

पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये हेडमास्तर म्हणून सुरवात करणारे अत्रे. त्यांनीच हि शाळा नावारुपाला आणली. इतकी की या शाळेस अत्रे शाळा म्हणूनच ओळखलं जावू लागलं. अध्यापनशास्त्रातलं शिक्षण मिळवून त्यांनी शिक्षणाचा प्रचार केला. प्राथमिक शाळांसाठी नवयुग वाचनमाला आणि माध्यमिक शाळांसाठी अरुण वाचनमाला त्यांनी घाटे आणि कवी गिरीश यांच्या सहकार्यातून उभा केल्या.

वाचनमालांच्या गुणवत्तेमुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना अधिकृत मान्यता दिली. पुढे हीच क्रमिक पुस्तकं शाळांतून शिकवली जाऊ लागली. अत्र्यांनीच पुण्यात धनराज गिरी हायस्कूल आणि मुलींचं आगरकर हायस्कूल स्थापन केले. 

७) कवी

अत्रे केशवकुमार या टोपन नावाने कविता लिहीत. कॉलेजच्या जीवनात त्यांनी मकरंद या टोपण नावाने लिहण्यास सुरवात केली होती.  सुरवातील अत्रे यांनी माधव ज्युलियन आणि त्यांच्या मंडळातील इतर कविंच्या कवितांची विडंबन लिहण्यास सुरवात केली.  झेंडूची फुले हा विंडबनपर कविता असणारा संग्रह याच काळातला. खरतर मराठीत विडंबन करणाऱ्या कविता आणण्याचं श्रेय अत्रेंनाच दिल जातं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.