चौकशी राहूद्या.. ईडी ऑफिसरने जॅकलिन, नोराकडून इंस्टाग्रामला फॉलोबॅक करून घेतले

सुकेश चंद्रशेखर प्रकरणाचं नाव घेतलं कि, आणखी दोन नावं हमखास चर्चेत येतात. ते म्हणजे नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस. सुकेश चंद्रशेखरकडून महागडे गिफ्ट घेतल्याप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसपासून नोरा फतेहीपर्यंत चौकशी करण्यात आली आहे. यात अजून अनेक अभिनेत्रींना चौकशीसाठी बोलाविले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास ईडी कडून चालू आहे. 

गेले काही महिने हे प्रकरण चर्चेत यायचं थांबत नाही.  जॅकलिनचे सुकेशसोबतच्या नात्याचे पुरावे असलेले काही रोमँटिक फोटो व्हायरल झाल्यामुळे जॅकलिन देखील या प्रकरणात अडकली असल्याचे फिक्स दिसतंय. 

अगदी कालच सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीनचा आणखी एक फोटो लीक झाला अन पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. असो या फोटोंवर आणि त्यांच्या खाजगी गोष्टींवर आपल्याला चर्चा करायची नाही तर आज आपण बोलणार आहोत जे या प्रकरणाच्या चौकशीच्या दरम्यान नोरा फतेही आणि जॅकलिन सोबत एक घटना घडली त्याबद्दल…

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आता ईडीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होत आहेत.  एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की,  प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडी अधिकाऱ्याने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांनाआपल्या दोन मुलींचे इन्स्टाग्राम अकाउंट फॉलो बॅक करायला लावले.

नोरा फतेही आणि जॅकलिन वर ईडी ऑफिसने दबाव आणून अकॉउंट फॉलो करून घेतलॆ आणि फोटो देखील काढून घेतले होते असा आरोप या अहवालात केला गेला आहे.

दैनिक भास्करच्या मीडिया रिपोर्टमध्ये असे काही दावे करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, ईडी अधिकाऱ्याने दबावाखाली आणत जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना दोन मुलींचे इन्स्टाग्राम अकाउंट फॉलो करण्यास सांगितले. जर का हा दावा सिद्ध झाला तर हे प्रकरण गंभीर वळण घेऊ शकतं कारण जर का हे खरं असेल तर संबंधित अधिकारी आपल्या पदाचा सर्रास दुरुपयोग केला म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई देखील केली जाऊ शकते.

या अधिकाऱ्यांच्या मुलीनींच नाही तर त्यांच्या जवळच्या मित्रांनी देखील नोरा आणि जॅकलिनसोबत  फोटो काढले असं यात म्हणलं आहे. 

‘दैनिक भास्कर’ने आपल्या अहवालात ईडी अधिकारी राहुल वर्मा यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यात म्हटले आहे की, चौकशीदरम्यान राहुल वर्माने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यावर दबाव आणला आणि त्यांच्या जवळच्या मित्रांसोबत फोटो काढण्यासाठी पोज द्यायला लावली. एवढेच नाही तर राहुल वर्मा यांनी त्यांच्या ओळखीच्या दोन मुलींचे इन्स्टाग्राम अकाउंटही या दोन्ही ऐक्ट्रेसकडून फॉलो करवून घेतले आहे, असंही त्या अहवालात लिहिलं आहे. 

आश्चर्य म्हणजे, नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या चौकशीदरम्यानही ‘त्या’ दोन्ही मुली तिथे हजर होत्या असं सांगण्यात येतंय….आता काय खरं काय खोटं तपासानंतर  येईलच.  

सुकेश चंद्रशेखर फसवणूक प्रकरणात नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघांनाही ईडीने गेल्या वर्षी चौकशीसाठी बोलावले होते. या अहवालात म्हटले आहे की, जेव्हा दोन अभिनेत्रींची अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशी केली जात होती, तेव्हा या दोन मुलीही तेथे उपस्थित होत्या.

 मोनिका पांडे आणि अनामिका पांडे अशी त्यांची नावे आहेत. या दोन्ही मुली ईडी अधिकारी राहुल वर्मा यांच्या जवळच्या असल्याचं सांगण्यात येत आहे. 

ईडीच्या अधिकाऱ्याने आधी या दोन्ही अभिनेत्रींसोबत फोटो काढले. यामध्ये त्यांच्या कार्यालयातील मित्रांचाही समावेश होता. यानंतर जॅकलिन आणि नोरा फतेही यांनी दोन्ही मुलींचे इन्स्टाग्राम अकाउंट फॉलो करण्यासाठी दबाव आणला. मात्र, आता दोघांनीही अकाऊंट अनफॉलो केल्याचेही सांगितले जात आहे.

या प्रकरणाबाबत दिल्लीचे वकील विक्रम चौहान यांनी पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री आणि ईडीला टॅग करत ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये संबंधित ईडी अधिकाऱ्याचे नाव लिहिताना त्यांनी हा पदाचा दुरुपयोग असल्याचे म्हटले आहे. याबाबत अनेकदा कारवाईची मागणी देखील होती असेही विक्रम चौहान सांगतात.

पण या चालू असलेल्या प्रकरणावर ईडीच्या त्या अधिकाऱ्याने त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर मौन बाळगलेय. 

दुसरीकडे, राहुल वर्मा नावाच्या ईडी अधिकाऱ्याने आपल्यावरील या आरोपांवर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. अहवालात म्हटले आहे की, जेव्हा त्यांना या आरोपांबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, मला यावर काहीही बोलण्याचा अधिकार नाही त्यामुळे मी कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आले, त्यादरम्यान ज्यावेळी २०२१ च्या जानेवारी महिन्यात सुकेश तुरुंगात होता, तरीही तो जॅकलिनशी बोलत असायचा, जेलमध्ये बसून तो जॅकलिन ला करोडो रुपयांच्या भेटवस्तू पाठवायचा असं ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. यामध्ये ५२ लाख किमतीचे अरबी घोडे, ९ लाख किमतीच्या ३ पर्शियन मांजरी, डायमंड नेकलेस सेट आणि महागड्या आलिशान गाड्यांचा त्यात समावेश आहे. इतकेच नाही तर सुकेशने जॅकलीनसाठी चार्टर्ड फ्लाइटही बुक केली होती. सुकेशने जॅकलिनच्या भावासोबत पैशांचे व्यवहारही केले आहेत. सुकेशने त्याच्या वकिलाचा हवाला देत दावा केला आहे की, तो आणि जॅकलिन एकमेकांना डेट करत होते.

बरं नोरा फतेहीसोबत देखील त्याचे संबंध होते असंही मध्यंतरी समोर आलेलं, त्याने नोराला देखील महागड्या भेटवस्तू पाठवल्या होत्या. सुकेशने नोराला सुमारे एक कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन गिफ्ट केला होता. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री या प्रकरणाशी जोडल्या गेल्या आणि त्यांना चौकशी ला सामोरे जावे लागतेय.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.