आपला समाज लिव्ह-इन रिलेशनशिप स्विकारण्याचं धाडस दाखवेल का ?

फार पूर्वीपासूनच आपल्या चित्रपटांचा समाज मनावर सकारात्मक असो किंव्हा नकारात्मक असो परिणाम होत आलाय. 

बहुतेक वेळा तर आपल्याकडचे चित्रपट हे आपल्याच समाजाचे प्रतिबिंब असते. बॉलिवूडमध्ये तसेच मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये असे बरेच प्रयोग झालेत ज्यात आपल्याकडील काही संवेदनशील मुद्द्यांचे  चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे.

 त्यातलाच एक संवेदनशील मुद्दा म्हणजे लिव्ह-इन रिलेशनशिप !

खरं तर भारतामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपवर फारसं उघडपणे बोललंही जात नाही, कारण इथल्या  समाजव्यवस्थेला ते झेपणारं नाहीये. तरीही काही जण असतात जे जाहिरीत्या ‘आम्ही लिव्ह-इन रिलेशनशिप’ मध्ये आहोत असं सांगतात.

अलीकडे बिनधास्तपणे लिव्ह-इन रिलेशनशिप वर आधारित असलेले  बॉलिवूड मुव्ही एकामागून एक धडाधड येत आहेत.

मला तरी आठवतय २००५ मध्ये ‘सलाम नमस्ते’ हा मुव्ही आलेला,  त्यात प्रीती झिंटा आणि सैफ अली खान ने लिव्ह इन जोडप्याचं आयुष्य इतक्या छान पद्धतीने साकार केलं तेंव्हा आपल्या पिढीला कळलं कि, हि संकल्पना इतकी साधी-सरळ-स्वच्छ-प्रामाणिक आहे.

बरं हा एकच नव्हे तर असे अनेक चित्रपट आलेत, २००८ मध्ये बचना ये हसीनो आला, त्याच वर्षांत फॅशन आला जो मुव्ही बराच गाजला होता, त्यानंतर २०११ मध्ये प्यार का पंचनामा, २०१२ मध्ये कॉकटेल चित्रपट आला, २०१३ मध्ये आशिकी-२, शुद्ध देसी रोमांस आला. २०१५ मध्ये कट्टी-बट्टी आला. २०१५-१६ मध्ये प्यार का पंचनामा २ आला, बेफिक्रे आणि २०१७ मध्ये ओके जानू असे अनेक चित्रपट येऊन गेले या पुढेही येतील.

असो, हे झालं चित्रपटामधील …परंतु वास्तवात जेंव्हा एखादे जोडपे लिव्ह इन मध्ये राहतात त्यांना समाज स्वीकारतो का ?

आपल्या आजूबाजूला एखादं लिव्ह इन रेलेशनशिपमध्ये राहणारे जोडपं पाहिलं कि समाज कुजबुज करतो. समाज म्हणजे कोण? तुम्ही -आम्हीच कि…

आपल्या पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेच्या प्रभावाखाली तयार झालेले कायदे लग्न व लग्नसंस्थांना झुकते माप देऊनच त्या संदर्भातील घटनांकडे बघतात. आपला समाज असंच मानतो कि, एक जोडपं लग्न केल्याशिवाय एकत्र राहू शकत नाही. जर एकत्र राहायचं असेल तर त्यासाठी ‘लग्नाचा’ परवाना लागतो.

लग्न करणे किंवा न करणे हा प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, हेच मुळात आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रेम, आदर, मैत्री आणि सहवासाची गरज सर्वांनाच असते त्यात गैर असं काही नाही.

पण चांगली गोष्ट अशी आहे की, कायदा हा लिव्ह इन रेलेशनशिपकडे संकुचितपणाने पाहत नाही.  थोडक्यात कायदा लाव्ह इन रिलेशनशिप ला नागरिकांचा जगण्याचा अधिकार म्हणूनच मानतो.

 या संदर्भात भारतातील कायदेशीर बाबी काय आहेत?

लिव्ह-इन रिलेशनशन्सबाबत वेगवेगळ्या कोर्टाने वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय दिलेली कोणती प्रकरणे आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना कोणत्या अडचणी येत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपशीलवार जाणून घेऊया ..१८ वर्ष पुढील मुलगा-मुलीला त्यांच्या दोघांची समंती असतांना लग्न न करताही सोबत राहण्याचा अधिकार आहे त्याला कायदा विरोध करत नाही.

लग्न करून सोबत राहणारे जोडपे चांगले आणि लग्न न करताही अगदी आनंदाने सोबत राहणारे जोडपे वाईट अशी पद्धतशीर धारणा निर्माण केली गेली आणि त्यामुळे लग्न आणि लग्नसंस्थेला प्रोत्साहन देणारे कायदे व तशा तरतुदीच कायद्यात आणल्या गेल्या.

लग्न न करता सोबत राहणा-यांना भारतात अशा काही ठराविक किंवा ठोस कायद्याचा आधार नाही.

समाजात लिव्ह-इन संबंध अनैतिक मानले जातात परंतु कायदा त्यांना हा हक्क देऊ करतो.

भारतीय घटनेअंतर्गत कलम १९ म्हणते कि, प्रत्येक नागरिकाला त्याच्या निवडीनुसार आणि इच्छेनुसार  जगण्याचा अधिकार आहे. म्हणजेच दोघेही सज्ञान व कायद्याने  सक्षम आहात; पण विवाह न करता एकत्र सहजीवनाचा निर्णय घेण्यासही तुम्हाला कायद्याने कुठलीही आडकाठी नसते. शिवाय समाजातील इतर घटकांन देखील त्यांच्यामध्ये दखल घेण्याचा अधिकार नसतो.

लिव्ह इन रेलेशनशिप साठी हे एक कलम १९ पुरेसं आहे

त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा विचार असेल तर त्यासाठी कसल्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन, करार किंवा इतर काही करावे लागत नाही. 

जरी शासन,समाज, नातेवाइक किंवा इतरांकडून काहीही उपद्रव होत असेल तर तुम्ही कलम १९ अंतर्गत आम्हाला सोबत राहण्याचा अधिकार आहे हे बजावून सांगू शकता.

याबाबतीत न्यायमूर्ती मल्लीमठ कमिटीने लॉ कमिशनला सादर केलेल्या सूचनांमध्ये देखील मांडले आहे.

१५ जानेवारी २००८ न्या. अजीत पसायत व न्या. पी. सनथाशिवम् यांनी सर्वोच्च न्यायालयात हे स्पष्ट केले की, लग्न न करता एकत्र राहणा-यांनी गुन्हा केलाय, असं म्हणता येत नाही. तसेच ४ मार्च २०१२ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने पायल कटारा विरुद्ध अधीक्षक नारी निकेतन आग्रा या केसमध्ये लग्न न करता नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहणे हा गुन्हा नाही, असं स्पष्ट केलं होतं. 

आणि जर त्या जोडप्यांना असं वाटत असेल की एखाद्याकडून आपला धोका आहे तर ते कायदेशीर मदत घेऊ शकतात तसेच पोलिस संरक्षणाची मागणीही करू शकतात. 

प्रत्येकाला आयुष्यात कुणाची ना कुणाची तरी सोबत गरजेची असते, त्यामुळे जरी कुणी ‘लिव्ह-इन’ मध्ये राहिलेच तर त्यांना नावे न ठेवता त्यांना मोकळेपणाने स्वीकारणे हेच भारतीय कायद्यांना अपेक्षित आहे तसेच आपल्या सामाजिक मानसिकतेला ही ते महत्वाचे आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.